दिनांक १४ नोव्हेंबर, मढेवडगाव श्रीगोंदा:
आदर्श गावाच्या दिशेने वाटचाल करीत असलेलं श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव हे गाव, फक्त प्रसिद्धीसाठी हपापलेलं दिसत आहे.अन त्याचे कारण देखील तसेच आहे.

ग्रामपंचायतीचा श्वास असणारे व रात्रंदिवस गावच्या कामात स्वताला झोकून देणारे. वेळ प्रसंगी पदाधिकाऱ्यांच्या चुकीमुळे लोकांच्या शिव्या खाणारे, अन तरी देखील गावाला खऱ्या अर्थाने घर पट्टी, पाणी पट्टी व इतर कर गोळा करून, ग्रामपंचायतीस आर्थिक हात भार लावणारे ,कोरोना सारख्या महामारीत स्वतःचा जीव धोक्यात घालून संपूर्ण गाव, वाड्या वस्त्यांवर जाऊन औषध फवारणी सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याची योग्य ती खबरदारी घेणारे, कारण ज्यांच्याकडून आपण ग्रामपंचायत कर आकारतो त्यांना योग्य त्या सुख सोयी पुरवल्या पाहिजे. हे समीकरण मानून ग्रामपंचायतीमध्ये काम घेऊन येणाऱ्या प्रत्येक नागरिकास आस्थेनं विचारपूस करून, त्यांचे असणारे काम कमी वेळेत कसं करून देता येईल, यासाठी प्रयत्नशिल असणारे व गावातील प्रत्येक सार्वजनिक कामात पाहुणे, व सर्वाचेंच आदरातिथ्य करणारे, या गावगाड्याच्या राजकारणात प्रत्येकाच्या रागाचे धनी असणाऱ्या व तरी देखील सर्व मान अपमान सहन करून, सर्वांच्या हाकेला ओ देऊन काम गोड हसुन आपलं कर्तव्य पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आज पदाधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आली. ही बाब अतिशय खेदजनक व संताप आणणारी आहे. त्या कर्मचाऱ्यांना ना दिवाळीचा बोनस, ना त्यांना पगार अशी वाईट अवस्था कर्मचाऱ्यांची झालीय.कायम त्यांच्यावर अधिकार गाजवणारे पदाधिकारी स्वतः दिवाळी गोड करून आनंदात व रुबाबात फिरतात व आदर्श गावचे स्वप्न पाहतात.
कर्मचाऱ्यांना उपाशी ठेवून आनंद साजरा करणे म्हणजे ” रोम जळत असताना पियानो वाजवत बसणाऱ्या पोप सारख, मनाला चीड आणणारे कृत्य झालं.बाकी काही असो पण आज त्या कर्मचाऱ्यांच्या घरी आपण गावकरी मिळून दिवे लावू, अन ज्यांनी आपली कोरोनाच्या काळात काळजी घेतली, त्यांची काळजी आपण दिवे लावून घेऊ. मग ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी काय दिवे लावले ते पाहू.
स्रोत:(राहुल साळवे,मढेवडगाव)
