कळा, उत्तम बंडू तुपे.(भाग ५)

कळा, उत्तम बंडू तुपे..

“ लेंगऱ्याला काय इचरायचंय ; त्याची हामी मी घेतो . “ वामन! लेंगऱ्या पोरीला करून घेत आसला तर बघ ; लग्नाचं जेवान ; आणखी नवऱ्याचा पोशाख तेवढा माझ्याकडं लागला . ” संतू ! हाजार रुपयं हुंडा देतूच का बोल . ” दिला आसता हुंडा ; त्या घरी तरी मंगलला काय सुख लाभणार हाय वामन ? “ संतू ! तू मंगलला काय पलंगावर बसवून झोका देतुस काय आता ! तुझ्या घरीबी ती कष्ट करतीया नव्ह ! ” पाय चालत हुतं . मन घोड्यागत चौखुर उधळत हुतं .

https://play.google.com/store/apps/details?id=nxtgen.mycity

देहीचं दोन भाग झाल्यागत वाटत हुतं . मंगल माझ्या दुबळ्याच्या पोटाला आली ; दैवानं घात केल्यागत . एकादया वान्या , बामनाच्या घरात शोभली आसती . आसलं रूप घेऊन ती माझ्या दुबळ्याच्या पोटाला का आली ? तिच्याच शिनच्या पोरी लग्न हून गेल्या ; नांदून माहेराला आल्या त्या गाड्यागत पोट घेवून आल्यात. तिच्याच शिनच्या पोरी आयपन भोगत्यात; माझी मंगल ! देव आसल्या सदगुणी पोरीसनी आमच्या पोटी का जलमाला घालतो ? पायानंच ओढत चालवल्यागत निघालो हुतो . चौफुल्यांच्या टेकाडांवर आलू तवा बाजारतळ दिसत हुता . जिकडं बघावं तिकडं माणसं . लई बाजार बघितलं ; पर ह्यो आसला बाजार कवा बघितला नव्हता . कुणी खेचून चालवल्यागत मनानं पुढं पुढं ढकलत चाललो हुतो.

लांबनं आल्यागत दमून म्हादू वान्याच्या भिंतीला खेटून बसलो . म्हसके म्हाताऱ्याची सुण बाजार करून आली हुती . ह्या दांडगी केलं . आख्खी फणीच्या फणी ; केळाच्या फणीला केळं लोंबकाळंत हुती . पिकूनश्यान झालेली केळं . “ कसी डझन घावली ? ” ” तीन रुपयानं आणली . ‘ “ बरं केलं; म्हाताऱ्याला खायाजोगी हायती . ‘ “ तर , तर मामाजीसाठी तर घिटल्यात . ” बोलता बोलता तिनं एक केळं सोलून मटकावलं . दुसऱ्याचं घास माझ्याकडं बघत बघत करायला लागली ; तवर यादवाचा पोरगा आला . त्यानं तिच्या हातांत कशाचा तरी पुडा दिला. त्याच्याकडं बघत हुतो . तवर म्हसक्याच्या सुणनं हातातला पुडा सोडला . पुड्यात लाडू हुतं . म्हसक्याची सुण केळं , लाडू खात बसली हुती . तिच्या बगलंत यादवांचं पोरंग बसलेलं ; खाता खाता म्हसकेची मण खदखदत हुती . तिच्याकडं बघून किळसवानी वाटायला लागलं . “आयला ह्या लोकांच्या ! कमया करायला जात्यात ; या बघा म्हणावं ; तुमच्या बायका मागं काय करत्यात . चटावल्यात ह्या खाजाळ्या . घरात आंदळा सासरा ; कुबडी सासू . ह्या खड्याळपन करत हिंडायला मोकळ्या . पाताळ गू दिसल्यागत उठलो . निघालो लोची – मंगलचा शोध घेत . टकूर घण घातल्यागत झालं हुतं . काय , सुदिक सुचत नव्हतं . एक एक मनातनं उठायला लागलं. नजर घार झाली. काय घ्या ; मंगलबी कुणाच्या नादाला लागली आसली तर ? पावसाळ्यातलं ढग नि क्यात आलेली बाय कुठवर थांबनार हाय ; तिलाबी मन हाय ; भावना हायत्या. पुराचं पाणी काय आडवून थांबनार हाय ; का लागलेली आग कुंकर घालून विझणार हाय ? आसंच कुठं तरी मन थंड करून घेत आसलं .

आपल्या मागं ह्या आस्या बारा नडी ; ह्यो नासका किराणा वास सुटायच्या आधीच कुठं तरी खपवायला पायजे . वारं झालेलं मन कायबी उडवत पळायला लागलं. आखिरीला दोघीबी मायलेकी दिसल्या . लांबनंच नजर ठेवली . कुणी त्यांच्याजवळ येतंय, बोलतंय का बघाया लागलो. जुंधळं, त्याल, मीठ घेऊस्तवर त्यांच्या मागावर राहिलो . तापलेलं टकूर थंड झालं. कुठं काय दिसलं न्हाय . आसं हुणार न्हाय . रात – ध्याड लोची सोबतीला हाय नव्ह ! भाजीच्या पेढला गेल्यावर त्यांसनी गाठलं . ” लोचे ! लुगडं घिटलं का ? ” ” बापू ! लुगड्यांचं काय नडून पडलं न्हाय . दुर्व्याच्या वह्या , पोटाचं आदी बघा . घरातलं जुन्यार , हे अंगावरचं जोडून मी वापरीन . ” ” मंगल , आज तुला लुगडं घिया पायजी .

” ” आता कशानं लुगडं घेता ? इस रुपयं राहिलेत . आजून त्याल आन् दुर्व्याच्या वह्या घियाच्या हायत्या . ” म्या अंगावर रुपयं आणलेतं . ‘ “ कुणाचं आणलं व ? ” “ वामन्याचं ! उद्यापासनं त्याच्यात कामाला जायाचं. रानमळ्यात हिर घिटलीय त्यानं. जय काढायची हाय.’आण नारायण चव्हाणाला काय सांगणार वं ? ” ” त्याचं काय लागतोय मी ? ” ” तसं नव्हं , त्याच्यात कवाबी कामाला जावं लागतं . हीर काय रोज , बारा महिनं चालणार न्हाय . ‘ आऽग ! रोजगार दाबून मिळतोय . चार पैसं मागं पडलं तर मंगलचं लगीन करायला व्हतेलं. ” तेबी तुमचं म्हणनं खरं हाय म्हणा . पर आसं त्याच्या कामांच्या वक्ताला गेला न्हाय . त्याच्यात राबला न्हाय ; तर उद्या हिरीची जय काढायचं झालं तर वामन्या काय काम देणार हाय काय ?

” ” नारायण चव्हाणाचा देव मला पुन्हा रोजगारानं ठिवल . ” ” तेवं कसं ? ” ‘ आत्ता ह्या आपल्या सुधारलेल्या गावात कोण हाय रोजगारी ? ” ‘ बघा बया. न्हायतर आगीतनं उठून पाण्यात पडल्यागत व्हयाचं ?’ बोलता बोलता बाजार उरकला. दुर्व्याच्या वह्या घिटल्या . मंग कापडांच्या आळीला गेलो . लई खळखळ करून साठ रुपयांचं सहावारी पातळ नि एकटू बाय टूचं झपराला कपडा घिटला . आता घरला निघायचं; तर वामन भेटला . त्यानं उदया लवकर कामावर येण्याबद्दल बजावलं. वामनसंग आलेलं पोरगं सारखं मंगलच्या तोंडाकडं टकामका बघत हुतं . मंगलबी कावरीबावरी झाली हुती . लोचीच्या मागं दडून तोंड लपवत हुती. मला काय दम धरवना

. तवा वामनलाच इचारलं , “ वामन ! पावना कोण ह्यो ? ” ” लेंगऱ्याचा पावना हो . ” मंग आसा का बघतोय ? वामन ! आमी गरीब आसलो तरी आमाला आब्रू हाय . आसं बोललो तवा पावना वरमला . गप झाला . बाजार फुटल्यावर घरच्या वडीनं निघालो . वाटनं चालता चालता लोचीला बोललो ” लोचे , वामनबर हुता तो पोरगा कसा वाटला ? ” ” का ? ” ‘ नव्ह ; वामन म्हणत हुता- मंगलला त्याला यावी .

https://play.google.com/store/apps/details?id=nxtgen.mycity

‘ ” आवं, त्यानं रांड ठिवलीया. दहीवडीच्या त्या रामाच्या पोरीसंग हाय त्यो भाड्या . लोची बोलली आन् तळपायाची आग मस्तकात गेली. आता काय बोलायचं ? पुढं लोची. तिच्या मागं मंगल. ह्या दोघीच्या मागनं चालत हुतो. आपला तपास आपून घेत हुतो. लहाणपणापासनं चाकरी करत आलेला माझ्यातला मी हुडकत हुतो. वढ्यावर अंघोळीला बसलेल्या बायका दगडानं उर घासताना झाडाआडणं बघितल्या की तापतेला. लोकांची गुरं राखताना गुरांच्या मागनं धावणाऱ्या पोरीचं उर चेंडूगत कसं उडतेतं बघून पोरी मागनं धावणारा. ह्या दुनियेत धुतल्या तांदळासारखं कोण हाय ? वाण्याच्या पोरीची कालवड वाफवर आली हुती. तिच्या मागनं खोंडाचं हुरूळं लागलं तवा तिला कबूल करून घिटल्यावर तिच्या कालवडीमागचं हुरूळ तोडून तिला तालआड नेली. ढोराच्या आबीला वढ्यात बळजबरीनं धरली. काय केलं न्हाय. माणसाचं ; नव्हं सगळ्याच जिवाचं मन काय नुसत्या अन्नावर समाधान मानतंय ? आपलाच तपास आपून घितला ; तवा मैलभर चालून झालं हुतं . ‘ लोचे ! लगीन झाल्यावर त्याला रांडा करायची गरज न्हाय ; पोरगा चांगला हाय . लोची तोंड बांधल्यागत चालत हुती . डोळ्यापुढं भोगलेल्या काळ्या, गोऱ्या, नकट्या, वकट्या पोरी उभ्या रहात हुत्या. लोची कायबी बोलत नव्हती . बोलकी वाट मुकी झाली हुती . का तीबी मनाला इचरंत हुती – ह्या वाटवरनं किती वाटसरूगेलं ? माझ्या तर मनात लेंगऱ्या पावना बसला हुता . रंगरूप तर चांगलं हुतं . कष्टाळूबी दिसत हुता . मंगलचा अन् त्याचा जोडा शोभून दिसत हुता …

क्रमशः
स्रोत:(उत्तम बंडू तुपे यांच्या कळा कादंबरीतुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading