कळा,उत्तम बंडू तुपे.
” हुता . काय लिवतवाचत हुता . काय कळत नव्हतं तरी त्याच्या वह्या – पुस्तकं ” दुर्व्या ! चांगला अभ्यास कर ; पास हू . सिरपतसारखं कालिजात जा . ” बापू ; मी पास हुणार ; लई , लई शिकणार हाय मी . ‘ ” शिक ; तुला जत्रला चांगली कापडं घेतो . सायबागत पाँट , बुसकोट शीव . लोचीनं आन् मंगलनं काय तरी बोलावं म्हणताना बोलत हुतो . दोघीबी तोंड बंद करून बसल्या हुत्या . तेवढ्यात पांडूतात्याचं कुत्रं भुंकलं आन् पळत पळत गेलं .

पांडूतात्याचं कुत्र चावर ; वाटलं – कुणाला तरी फाडतंय आता . कुत्रं भुंकत गेलं तसं आरडत माघारी आलं . कुत्रं आरडलं तवा पांडूतात्या बाहेर आला . ” कुणी मारलं कुत्र्याला ? ” “ म्या , म्या मारलं . “ तू कोण रं बाजीराव ? कुत्र्याला का मारलं ? ” “ माझ्या अंगावर धावलं ते ; आता नुसतं मारलंय . पर पुन्हा कवा अंगावर धावलं तर कुन्हाडीनं खांडीन . कुत्र्याला दापात ठिवा . ” बोलत हुता तो , वामन मिसाळाचा आवाज वळखला ; तसी अंगात थंडी भरल्यासारखं झालं . दारातल्या लिंबाखालनंच त्यानं जोरानं हाळी दिली . ” संत्या हाय का घरात ? ” वाऱ्यागत हाललो . हातानंच लोचीला ‘ न्हाय ‘ म्हणून सांगायला सांगितलं ; नि घराच्या संदरीत दडून बसलो . लोची उठून उभऱ्यात गेली . “ घरात न्हायतं . आजून रानातनं आलं न्हायतं . ‘ ” उदया मला भेटाया सांग . आता गुमानं जातूय मी ; माझ्याकडं येताना रुपयं शंभर आणखी वर धा बरोबर घेऊन ये म्हणावं . ‘ ” का ? मालकानं दिलं न्हायतं ? ” ” तुमचा कोण मालक आसंल झागीरदार ; मला ठावं न्हाय . मी निघालो . ‘ तावानं आलेला वामन मिसाळ माघारी फिरला . त्याचं तोंड चालूच हुतं . कुत्र्या – मांजरानं खाल्लेलं पचलं न्हाय मजी ओकत्यात ; तसं वामन मिसाळ ओकत चालला हुता . आदनंमदनं आय – बायलीवरून शिव्या देत हुता . सांदरीत बसून सगळं ऐकत हुतो . ऐकून घेण्यापलीकडं कायबी करू शकत नव्हतो . उठून उंभऱ्यात आलो . त्या वक्ताला वामन मिसाळ लांब गेला हुता . तसाच बाहेर पडलो नि तडक नारायण चव्हाणाच्या घराकडं निघालो . काळ्यांच्या आळीनं न्हाव्याच्या दारापुढं आलो ; तर सीताराम न्हावी , नारायण चव्हाण , गणपत खोत , ” आसा चार – पाच जण इजच्या दिव्याखाली बसली हुती .
काय बोलत हुती देव जाणं . मला बघून सगळीच गप झाली . उरात नुसता जाळ चालला हुता . गेल्या गेल्या नारायण चव्हाणाच्या पुढे उभा राहिलो . एकदा सगळ्यावर नजर टाकली . सगळी माझ्याकडं बघत हुती . धडा करून बोललो ” मालक ! वामन मिसाळाचं रुपयं दिलं ? ” ” कोण मिसाळ ? कसलं रुपय ? काय बोलतू काय ? तुझं टकूरं तर फिरलं न्हाय ? संतू , का सपान पडलं तुला ? ” “ मालक ! मस्करी करू नगस . रुपयं दया . मालक नुसता हासला . मांजराच्या तोंडात मांसाचा तुकडा दिल्यागत झालं हुतं . ताटाजवळ डोळं झाकून गरीबहून बसलेल्या मांजराच्या तोंडात मांसाचा तुकडा देवून पुन्हा काडून घियाला गेलं की मांजर पिसाळतं ; तसा नारायण चव्हाण पिसाळला . पायतान घेऊन अंगावर आला . “ खाजाळीच्या तुझं रुपयं कुठलं रं ?
म्या दिलेलं मलाच दिलं . ” नारायण चव्हाणाचं खरं हुतं . त्यानंच शंभर रुपयं दिलं हुतं . येळ घावलं तसी सगळीच फसवत हुती . घावल तसं राबवून घेत हुती . धणी नसलेल्या बाय गत माझी तन्हा झाली हुती . पायताणानं थोबाड फोडल्यागत झालं . चार माणसांतनं उठलो . सरळ घरी आलो . कामाच्या घाईत कुदळ निकळावी तसा खळकण लोचीच्या पुढे बसलो . लोचीबी खुळ्यागत माझ्याकडं बघत बसली हुती . तिच्या गळ्यात सोन्याचं डोरलं ; सोन्याच्या पाच मन्यांच्या मधी घावल्यागत झालेलं ; तरी चमकत हुतं . कवा मंगलच्या जलमाच्या वक्ताला लोची माहेरी गेली हुती ; त्या वक्ताला तिच्या बापानं तिच्या गळ्यात ते घातलं हुतं . त्यांच्यावर माझं डोळं . गुरागत राबत हुतो ; पांढऱ्या दोऱ्यांत काळा मणी ओवून तिच्या गळ्यात बांधायचं माझ्यानं झालं न्हाय . डोरल्यावर माझी काय सत्ता नव्हती .
ते माझ्या कष्टाचं नव्हतं नव्ह ! चितागती हुनशनं बसलो हुतो . लोचीबी बाळांतपनात आसल्यागत बसलेली . सगळं घर थंड आगीत धुमसत हुतं . दुर्व्यानं वह्या – पुस्तकं तसीच्या तसी झाकून ठेवली . जवळ आला . ” बापू ! आता शिक्षण हिथंच थांबू दे . मलाबी तुझ्या जोडीला घे . आपून सगळी राबू . वामन मिसाळाचं रुपयं फेडू . ‘ उर फाटल्यागत झाला . कुणी कुणाला धीर दियाचा – काय कळत नव्हतं . उशिरानं लोचीला तोंड फुटलं . “ घासभर खावून घ्या . सगळीच खचून जावू यातनं काय तरी मार्ग काढू . नगसा .घराची ती आय हुती . तिला सगळ्यांची भरांत हुती . सगळ्यांच्या पुढ्यात तिनं ताट वाढून ठिवली . वाढल्या अन्नाला मागं सारू नी- ह्या नेमानं घास तोंडात घातला . नरड्यातनं घास खाली उतरंना . उरावर डोंगर उचलून ठिवल्यागत झालेलं . लोचीनं दुर्व्याच्या आंगावरनं हात फिरवला . “ बाळा , आसा खचून जावू नगस . तुझा बा वाघ हाय ; इरसल धरून शिक्षण पुरं कर . आमच्या मागनं येऊ नगस ; ही मळलेली वाट मोडून तू आपली नवी वाट धर . लोचीला मी वाघ दिसत हुतो . पर माझ्यात दडलेलं मेंढरन मला भ्या दाखवतं हुत . दिवस उगवायला रानमळ्यात गेलो . वामन मिसाळ माझीच वाट बघत बसलेला . उठला . वाघानं बकऱ्याकडं बघितल्यागत माझ्यावर डोळं फिरवलं . ” संत्या , आलास ? ” ‘ व्हय ! आलू की . ” कशाला आलास ? ” “ कामाल आलूय जी . ‘ रुपयं आणलंस ? ” ” न्हाय . ” ” मंग काल का आला न्हाय ? आता माझ्यात तुला काम न्हाय . माझं रुपयं ” ” आता काय बोलायचं तोंडात राळ वाळून गेल्यागत झालं . चार पाऊलं पुढं झालो ; पटकरणं त्याचं पाय धरलं नि म्हनलो , “ झाली चुकी . ‘ “ लाज वाटत न्हाय चुकी झाली म्हणायला ? तुझ्या भरोशावर हे काम घिटलंय हे तुला सांगितलं हुतं का नव्हतं ; संतू . ‘ पाय धरल्यावर वामन मिसाळ थंड झाल्यागत दिसला .
त्यानं मला उठवून बसवलं . हळूच मुंडकं उचलून वर नजर टाकली . वामनचं डोळंबी तळ्यागत दिसलं . “ संतू उठ . न्याहारी करून कामाला जुपी करा . ” डोळं पुसत उठलो . तवर लोची पुढं झाली . तिनं मिसाळाच्या पुढे हात केला . तिच्या हातांत डोरलं हुतं . ” मालक ! हे घ्या . तुमच्या शंभर रुपयाच्या बदलात . लोचीच्या हातांतलं डोरलं बघून वामन मिसाळ मागं सरला . ” बाय ! मी – बी माणूस हाय . काळजात दगाड भरून आमी जगत न्हाय . तुझी तुला राहू दे . संतू आला ; मला माझं रुपयं पावलं . करा , काम करा . संतू ! मी “” शब्द दिलाय त्यात बदल हुणार न्हाय . दिलेलं रुपयं सवडी सवडीनं , फेड करून घिन . कुणाजवळ पैक्यांचं भांडवल हुतं ; कुणाजवळ शेतमळ्याचं . माझं भांडवल माझं बळ हुतं . मणगटांत जीव धरून मातीला टकरा देत हुतो .

बोट ; इतिन ; जई हात – हात खाली जात हुती ; तसा वामन मिसाळ माझ्यावर खुश होत हुता . दोघंबी सगळं इसरून गेलो हुतो ; काय घडलंच न्हाय आसं वागत हुतो . रोजगाऱ्यानं तरी आसंच वागावं लागतं . त्याला भांडून ; तंटा करून भागत न्हाय . हे मला शिकवल्यागत मी वागत हुतो . कुणी बी यावं शेरडा – मेंढरागत कानाला धरून कष्टाला बांधावं . देतील रोजगार तसा घेवून कष्ट उचलत राह्याचं ; हेच कर्मात हुतं . हप्ता भरल्यावर वामन मिसाळानं रोजगाराचा हिशेब केला . त्यातूनच इस रुपयं कापून घिटलं . आता शंभरातलं ऐंसी रुपयं राहिलं . भरपेट रक्कमबी हातांत आली ; तवा मनालाबी हुशारी आली . हप्ताभर कष्ट केल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं . शंभर – दीडशे रुपयं एकदम हाताला लागलं . घरालाबी खुशी वाटली . फुलझाडागत घर दिसत हुतं…
क्रमशः
स्रोत:(उत्तम बंडू तुपे यांच्या कळा कादंबरीतुन)
