कळा, उत्तम बंडू तुपे..
दोन महिन्यांचं काम दीड महिन्यात सरलं . हिरीची जय पार खाली गेली हुती . आता आणखी रोजगाराचं काम हुडकत फिरायचं ; कुठं कामाचा शोध लागतोय का बघायचं . माती काम संपल्यावर मंगल आन् लोचना लागंल तिथं भांगलायला जात हुत्या . दुर्व्यानंबी घात केला हुता . पास हुणारा दुर्व्या नापास झाला . पुन्हा त्याच वर्गात बसणार . मन कष्टी झालं.
इरस धरून दुर्व्याला शिकवत हुतो . मागंल ते पुरवंत हुतो. त्यानंबी अभ्यास केला ; पर नापास झाला. कष्टी हुनशान सडकच्या कडला बसलो. डांबरी सडकंच्या पोटातनं फुटलेल्या पाऊलवाटा ; डोळ्यांत वाटांचं जाळं विणल्यागत उभं राहिल्या. आता कोणती वाट धरावी ? कुणाच्या मळ्यात वस्तीला जावं ? वाटंकडं बघत बसलो हुतो . पिसाळाच्या मळ्यातनं आलेली वाट फुलं उगवल्यागत दिसली . वीस पंचीस बापपांतनं चार – पाच बायका चालत हुत्या .

नजर बारीक करून बघत हुतो . घोळका जवळ आल्यावर उठलो . कमई करायला गेलेली गावातली माणसं येत हुती . परतेकाच्या अंगावर नवी कापडं हुती . तरणी पोरं सायबागत पोषाख करून आली हुती . सगळ्यांच्या पुढं व्हरलाचा तुका पुढाऱ्यागत कापडं लेवून चालत हुता . त्याला रामराम केला . तुका थांबला . गळ्यात पडून त्यानं भेट दिली .” ” खुशाली इचारली . तुका भेटल्यावर सगळी पोरं भेटली . तेवढंच मनाला समाधान झालं . खुशाली इचरून सगळीच गावाकडं गेली . वाटेलाबी नवंपन आल्यागत झालं .
घटका भरानं ; मागं राहिलेला रामोशाचा मव्हण धुमत पळत येत हुता . त्याला थांबवून त्याच्याजवळ तंबाखू मागितली . ” मव्हन ! जत्रंला आला व्हय सगळी ? ” ‘ तर काय . गावची जत्रा ; देव ; देव करायला पायजी . ” ‘ तर तर . गावच्या देवाला कसं इसरायचं ; वर्षातनं एकदा येत जा . जत्रा चार दिसावर आली हुती . जत्रंची वळ वर्गणी चालली हुती . गावकरी मारुतीच्या देवळापुढं आन् ग्रामपंचायतीच्या आफिसात बसून वळ ; वर्गणी जमा करीत हुती . वाड्या – वसत्यांची माणसं वळीचं रुपयं आणून देत हुती . तिसऱ्या दिवसी धोंडी कारभाऱ्याचा निरोप आला ; तवा चावडीवर गेलो . “ संतू ! वळीचं काय करतो ; गेलं सालीबी वळ दिली न्हाय . ” धोंडी ! गेलं साली मी आडचणीत हुतो . ‘ ” संतू ! आडचणी कुणाला न्हायत्या ?
सगळ्या आडचणी बाजूला सारून आदी देवाचं करायला नग ? देव कोपला तर ? आदीच आपला देव आसा खारिस्त हाय ; ठावं न्हाय काय ? किष्णा पिसाळानं वळ दिली नव्हती ; त्याचं काय झालं ठावं हाय नव्ह ? ” ठावं हाय मला . पर पंचीस रुपयं मला लई व्हत्यांत . ” ” ह्या वर्षाचं पंचीस ; गेलं साली वळ दिली न्हाय ते धा आसं मिळून पस्तीस रुपयं आण बघू . “ धोंडी ! देवाच्या नावानं मी पाच रुपयं देतो .
“वळीचं पाच रुपयं देतो म्हणल्यावर निम्मं गाव उठलं . नारायण चव्हाण पुढं झाला . “ संत्याला वाळीत टाका ! ” नारायण चव्हाण बोलला त्याची बगल धरून आणखी धा – पंधरा जण उभी राहिली . टक्कूरं फिरलं माझं . “ नारायण ! दोन महिनं झालं एका दिसाचा रोजगार दिला न्हवं ; मोठं तोंड करून बोलू नगसं ; त्या रोजगाराचं रुपयं दे . वळ देतो . ‘ आयला . काय बोलतय बघा ; संत्या ! माझ्याकडं तुझ्या रोजगाराचं रुपयं कसं राहिलं ? ” ” ते ठावं हाय तुलाबी . ” ” आरं , मंग माझी कामं टाकून तू गेला त्याचं काय ? ” “ मी काय तुझा बांधील गडी न्हाय . का तुझ्यात सालानं राहिलो नव्हतो . ‘ व्हय ; “हुंडा न्हाय म्हणल्यावर रामा पावणा गप झाला . त्याला हुंडा देणारा इवाय पावणा पायजी हुता . वडूजच्या पावण्याला शिकलेली नवरी पायजी हुती . कुणालाच माझी रूपवान पोरगी नको हुती . पावणं चा पिवून गेल्यावर रानंदाच्या आक्काला बोललो – “ अक्का ! मंगलला सुण करून घेणार का ? ” तर तिनंबी हुंड्याची आट घातली . तवा मनाला वाटलं – मंगलच्या कर्मात बाशिंग न्हाय . एकदा हत्ती पाळणं सोपं ; पर उपवर लेक घरात ठिवणं मजी जिवाला सुरी . जीव सुळावर आसल्यागत वाटतं . इचार करून थकलो . उपाय सुचना झाला . लेंगऱ्याचा पावणा सारखा डोळ्यापुढं येत हुता . त्यानंबी रांड ठिवलेली . आपल्या हातानं पोरीचा गळा गवाय नगं म्हणताना ; लेंगऱ्याच्या पावण्याला टाळत हुतो . त्यात त्याच्या कुळी – ढाळीचा काय तपास नव्हता .
जत्रा झाल्यावर चार दिवसानं मायणीचा रामा घरातली चार शेणी माणसं घेवून आला . त्या वक्ताला बैठक बसली . माझी भावकी मुंमई करून आली हुती . बैठक बसल्यावर धा जणाची धा तोंड सुटली ; कुणाच्या तोंडाला हात लावायचं ? भरलेल्या डेऱ्याचं तोंड उघडल्यागत झालेलं . पाहुण्या म्हणून आलेल्या बायकांतली एक उठली . तिनं न्हाय तिथं हात घातल्यागत बोल केला . ” नवरी थोराड हाय . दोन लेकरांचं तरी पन्य गेलंय तिचं. ” पाहुणी बोलली . लोचीचा भडका झाला . ” बया ! थोराड – मोठाड माझी मला ; कसंबी पदरात घ्या – म्हणून आमी काय मागं लागलो न्हाय . मला पोटात जड झाली न्हाय ती . ताठात जड व्हती म्हणून काय तिला कुपाट्यात ढकलणार नव्हं ! ” शब्दानं शब्द वाढत हुता .
उणं – वावगं बोलणं चाललं हुतं . देहीला सुरुंग लावल्यागत हुर्द पिजून निघत हुतं . लेकीच्या बापाची आब्रू कुठं आसती हे लेकीच्या बापाला ठावं ; गरिबाच्या घरी लेकी जलमू न्हायत्या . माझ्या भावकीनंबी उचलून धरलं ; तवा आलेलं पाहुणं उठलं . गेलं शंकरच्या घरी. शंकर ममई करून आला हुता नव्हं! मायणीचा रामा पाहुणा शंकरच्या घरात गेला ; तसा शंकरच्या बोरीचा गुळभात करून बाहेर निघाला. शंकर भावकीपैकी हुता; मंमईच्या गोदीत हमाली करून त्यानं पैक्याला पैका उभा केला हुता . बैल खरेदी केल्यागत त्यानं जावाय करून घियाचा ठराव केला . जत्रा झाली हुती .

ज्याच्या रजा संपल्या त्यांनी निघायची तयारी केली . सुगीत आलेल्या पाखरासारखी माणसंबी झाली हुती ; भरलेली घरं पाखरांच्या खोप्यागत रिकामी हुणार हुती …
क्रमशः..
स्रोत:(उत्तम बंडू तुपे यांच्या कळा कादंबरीतुन)
