दिनांक २१ सप्टेंबर २०२४,कोळगाव, श्रीगोंदा:
कोळगाव येथील रयत शिक्षण संस्थेसाठी सोसायटी चेअरमन हेमंत नलगे यांच्या आजोबांनी काही वर्षांपूर्वी वरिष्ठ महाविद्यालय, शेतकी विद्यालय किंवा आयटीआय स्थापन करण्यासाठी सहा एकर व सहा गुंठे जमीन दिली असतानाही संस्थेने अद्याप पर्यंत तेथे कसलेही महाविद्यालय न काढल्याने व दोन वर्षांपूर्वी शरद पवार यांना कोळगाव येथे रयत विद्यालयाच्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी पवार साहेबांनी शब्द देऊनही अद्याप पर्यंत कोणतीही कार्यवाही न झाल्याने माळेगाव कारखान्यावर प्रत्यक्ष भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी भेट घेतली असता त्यांनी काही दिवसांवर निवडणूक येऊन ठेपल्याने निवडणुकीनंतर हा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. तसेच डोरलेवाडी या ठिकाणी संस्थेच्या चेअरमन चंद्रकांत दळवी व सहसचिव बंडू पवार यांच्या समवेत तात्काळ मीटिंग लावून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले.
कोळगाव सोसायटीचे चेअरमन हेमंत नलगे, कुकडी कारखान्याचे संचालक सुभाष लगड व सर्वज्ञ मल्टीस्टेट चे चेअरमन राजेंद्र नलगे, तसेच कुकडी कारखान्याचे चेअरमन राहुल जगताप यांच्या मध्यस्थीने या शिष्टमंडळाने खासदार शरद पवार यांची प्रथम माळेगाव कारखान्यावर महाविद्यालय होण्यासाठी प्रत्यक्ष निवेदन दिले व त्यानंतर पवार साहेबांच्या सांगण्यावरून डोरलेवाडी या ठिकाणी संस्थेचे पदाधिकारी येणार असल्याने हा विषय लगेच मार्गी लावू असे सांगून सर्वांना डोरलेवाडी येथे येण्यास सांगितले. तेथे संस्था पदाधिकाऱ्यांच्या समवेत मीटिंग घेऊन आपल्याला कोळगाव येथे महाविद्यालय स्थापन करण्यासाठी व हा प्रश्न लवकर मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेण्याचे संस्था पदाधिकाऱ्यांना आदेश दिले.
चेअरमन हेमंत नलगे यांनी दिलेल्या निवेदनामध्ये, कोळगाव हे गाव श्रीगोंदा तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असणारे गाव असून लोकसंख्या १५००० च्या पुढे आहे. येथे २२०० च्या वर मुले मुली शिक्षण घेत आहेत. मुलींसाठी येथे उच्च शिक्षणाची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. या ठिकाणी वरिष्ठ महाविद्यालय होण्यासाठी आजोबा कै .नारायणराव केरबा नलगे यांनी १९५७ मध्ये रयत संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांना प्रत्यक्ष भेटून सहा एकर सहा गुंठे जमीन विकत घेऊन संस्थेला येथे पुढील शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी बक्षीस रूपाने दिली होती.
अद्याप पर्यंत तेथे कोणतेही कार्यवाही झाली नाही. दोन वर्षांपूर्वीही आपणास या संदर्भाने कोळगाव येथे इमारत उद्घाटनासाठी प्रत्यक्ष बोलावूनही हा निर्णय न झाल्याने हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विनंती करत आहोत असे त्यात म्हटले आहे.
स्त्रोत:(पत्रकार महेश शिंदे)
Advertisement…





