दिनांक २८ ऑक्टोबर २०२४,श्रीगोंदा:
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात गेल्या ४० वर्षांपासून प्रतिनिधित्व करणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार बबनराव पाचपुते यांच्या आजारपणामुळे त्यांच्या पत्नी सौ. प्रतिभा बबनराव पाचपुते यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे.
सोमवार, दिनांक २८ ऑक्टोबर २०२४ रोजी सोप्या पद्धतीने आणि फक्त पाच लोकांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे नियोजन होते. परंतु ही बातमी समजताच बबनराव पाचपुते यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने श्रीगोंदा येथे माऊली निवासस्थानी उपस्थित राहिले.
उमेदवारी अर्ज दाखल करताना सौ. प्रतिभा पाचपुते यांच्यासह भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आमदार चित्राताई वाघ, विक्रमसिंह पाचपुते आणि श्रीगोंदा तालुक्यातील अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी हजारो कार्यकर्त्यांचा समावेश असलेल्या गर्दीने माऊली परिसर भरून गेला होता.
नेत्यांवर प्रेम करणारे कार्यकर्ते म्हणजे खऱ्या संपत्तीचे द्योतक – आमदार चित्राताई वाघ
कार्यक्रमादरम्यान बोलताना आमदार चित्राताई वाघ यांनी बबनराव पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदा मतदारसंघाच्या विकासाची आठवण करून दिली. त्या म्हणाल्या, “गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत महायुती सरकारच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुक्याला कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या नेत्यांबद्दल असलेले प्रेम हाच खऱ्या नेतृत्वाचा विजय आहे.”
आमदार चित्राताई वाघ यांनी देखील विक्रमसिंह पाचपुते यांच्या भाषणाचा उल्लेख करत बबनराव पाचपुते यांच्या जुन्या शैलीच्या आठवणी सांगितल्या, ज्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला.
भावुक क्षण आणि विजयाचा निर्धार..
बबनराव पाचपुते आजारी असल्यामुळे अनेक कार्यकर्ते भावूक झाले, आणि अश्रू अनावर झाले. उपस्थित कार्यकर्त्यांनी एकजुटीने “विचार पक्का, आमदार आक्का” आणि “एकच वादा, बबन दादा” अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
कार्यक्रमाच्या शेवटी कार्यकर्त्यांनी एकमुखाने भाजपाच्या उमेदवार सौ. प्रतिभा पाचपुते यांचा विजय सुनिश्चित करण्याचा निर्धार केला.
स्रोत:(प्रसिध्दी पत्र)




