दिनांक २८ ऑक्टोबर २०२४,श्रीगोंदा:
“श्रीगोंदा मतदारसंघाच्या ४० वर्षांच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी मी निवडणूक लढवत आहे,” असे महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सांगितले. त्यांच्या मते, गेल्या ४० वर्षांपासून मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांकडे निवडून आलेल्या प्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने मतदारसंघ विकासापासून वंचित राहिला आहे.
सौ. अनुराधा नागवडे यांनी नमूद केले की राज्यात सध्या महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण असून श्रीगोंदा मतदारसंघातील जनता बदलासाठी उत्सुक आहे. स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांनी या मतदारसंघात अनेक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या, त्याचा दीर्घकालीन लाभ जनतेला होत आहे. यावेळी घोड, कुकडी पाट पाणी प्रश्न, डिंभे माणिकडोह बोगदा, एमआयडीसीसारखे प्रश्न सोडवण्यासाठी मतदार आपल्याला विजयी करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिवसेना उपनेते साजन पाचपुते यांनी त्याग करून महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्याबद्दल राजेंद्र नागवडे यांनी आभार मानले. पाचपुते यांनी देखील या सभेत बदलाच्या हाकेला प्रतिसाद देत जनता अनुराधा नागवडे यांना मोठ्या बहुमताने निवडून देईल असा विश्वास व्यक्त केला.
या सभेत शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना व्हॉईस चेअरमन बाबासाहेब भोस, साजन पाचपुते, सुनंदा पाचपुते यांचीही भाषणे झाली. मोठ्या शक्तिप्रदर्शनासह सौ. अनुराधा नागवडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून आपल्या निवडणूक अभियानाला जोशपूर्ण सुरुवात केली.
स्रोत:(अधीकृत माहिती)




