दिनांक २३ नोव्हेंबर २०२४, श्रीगोंदा:
२२६ श्रीगोंदा/नगर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निकालाने अनेकांना आश्चर्यचकित केले आहे. चर्चेत नसलेले, आणि अनेक सर्वेक्षणांमध्ये बॅकफूटवर असल्याचे भासवले गेलेले उमेदवार विक्रम पाचपुते यांनी ३७,००० मतांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, अनेकांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

विक्रम पाचपुते यांचा विजय अनपेक्षित असल्याने अनेकांनी आपले भुवया उंचावल्या आहेत. निवडणूक प्रक्रियेत काहीतरी गडबड असल्याचा आरोप करत, प्रसिद्ध वकील ॲड. संभाजी बोरुडे यांनी या निकालाबद्दल आश्चर्य व्यक्त केले. त्यांनी माध्यमांना सांगितले, “हा विजय म्हणजे एक प्रकारचा ‘गोड बंगाल’ आहे. जिथे उमेदवार चर्चेतही नव्हता, तिथे असा विजय मिळणे संशयास्पद आहे. प्रत्येक वेळी दिसणारे चित्र खरे असतेच असे नाही. या निवडणुकीने आपल्यातील बिभीशन ओळखण्याची गरज निर्माण केली आहे.”असेही त्यांनी नमूद केले.

श्रीगोंदा मतदारसंघात ओबीसी आणि मराठा समाजाचे प्रभावी वर्चस्व आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अण्णासाहेब शेलार यांच्यासाठी सकारात्मक वातावरण होते. ओबीसी नेत्यांची प्रभावी उपस्थिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू बाळासाहेब.. प्रकाश आंबेडकर यांची ऐतिहासिक सभा, तसेच ओबीसीची सुप्त लाट यामुळे शेलार यांना चांगले यश मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यातच, मराठा समाजातील पाचपेक्षा अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने मतांचे विभाजन होऊन शेलार विजयाच्या जवळ राहतील अशी मत मतांतर वर्तवण्यात येत होती. मात्र समीकरण बदलत गेली.

महाविकास आघाडीतील उमेदवारांमध्येही मतविभाजन मोठ्या प्रमाणात झाले. शरद पवार यांनी सुचवलेले उमेदवार राहुल जगताप यांना अंतिम क्षणी तिकीट नाकारले गेले आणि त्यांच्या जागी उबाठा (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) च्या अनुराधा नागवडे यांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे राहुल जगताप यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. परिणामी, महाविकास आघाडीची मते विभागली. आणि त्याचा थेट फायदा विक्रम पाचपुते यांना झाल्याचे समोर आले.

वंचित बहुजन आघाडीचे शेलार २५,००० चा टप्पा गाठण्यात यशस्वी झाले, मात्र मतविभाजनामुळे त्यांचा विजय होऊ शकला नाही. नागवडे आणि जगताप यांच्या समर्थकांनी मतदान विभाजित केले, तर पाचपुते यांनी तब्बल १ लाखाहून अधिक मते मिळवली.
तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता वर्तवली गेलेल्या पाचपुते यांनी प्रथम क्रमांकावर झेप घेत तालुक्यातील मतदारांचे मन जिंकले. असेही प्रतिक्रिया अनेकांनी यावेळी व्यक्त केली आहे.
स्रोत: अधिकृत माहिती नुसार…
