दिनांक १९ ऑक्टोबर(मढेवडगाव,श्रीगोंदा):
तालुक्यातील मढेवडगांव परिसरातील वाड्या वस्त्यांवर बिबट्याने गेल्या चार ते पाच महिन्यापासून दहशत माजवली आहे. दोन दिवसांपूर्वी गोरे वस्ती येथील योगेश जाधव या शेतकऱ्याच्या घरासमोर बांधलेल्या पाळीव कुत्र्याचे मुंडके तोडून धड उचलून नेले आहे.
ऊसतोड सुरू झाली की, बिबट्याचा मोठा उपद्रव सहन करावा लागतो. मढेवडगांव येथे आता पर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात अनेक कुत्रे व शेळ्यांचा बळी गेल्याचे स्थानिक बोलत आहेत. सायंकाळी अंधार गडद होऊ लागताच या परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार सुरू होतो. या हल्ल्याच्या भीतीने रहिवाशांना एकट्याने घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. मजुरांमध्ये या हिंस्त्र श्वापदाची दहशत पसरली आहे. वस्त्यांवर पाळीव कुत्री, बकऱ्या, कोंबड्या, गायी, म्हशींची सहज शिकार मिळत असल्याने बिबटे मानवी वस्त्यांकडे आकर्षिले जात आहेत.
सध्या अशाच बिबट्यानी श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगांव परिसरातील ऊसाच्या रानात ठाण मांडले असून, पारंपरिक शिकार मिळत नसल्याने, या परिसरातील पाळीव प्राण्यांवर हल्ले सुरू केले आहेत. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून मढेवडगांव परिसरातील शिंदे वस्ती, गोरे वस्ती, शेळके वस्ती इ.ठिकाणी बिबट्यांनी रानडुक्कर, शेळ्या, बोकड, कुत्रे यांवर हल्ले करून ठार केली व मोठी दहशत माजवली आहे. या बाबत नागरिकांनी वनविभागकडे तक्रारी केल्या होत्या, त्यानुसार एक महिन्यांपूर्वी वनविभागाने पिंजरा लावण्याची मोहिम हाती घेतली होती. परंतु, बिबट्या या पिंजऱ्याला हुलकावणी देत आहे.
स्रोत:(विजय मांडे यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)
