नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यासाठी, महसूल विभागाला वेळ मिळेना..

दिनांक १९ ऑक्टोबर,श्रीगोंदा:

तालुक्यात आठ दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील पीक नुकसानीचे पंचनामे केव्हा होणार ? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पावसाळा संपला असला तरी, परतीचा पाऊस बरसत आहे. दिनांक ११ ऑक्टोबरपासून तालुक्यात पाऊस हजेरी लावत आहे. रविवार, दिनांक १८ ऑक्टोबर रोजी देखील श्रीगोंदा तालुक्यात जोरदार पाऊस पडला असून, दिवसभर ढगाळ वातावरणासह पावसाचे वातावरण होते. परतीच्या पावसाने, कांदा लागवड, कांदा रोपे, मका, काढणीला आलेले सोयाबीन आणि वेचणीला आलेल्या कापूस पिकाचेंही नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने, शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने पळविला आहे. यातच पीक पंचनामे करण्यासाठी महसूल विभागाला सवड मिळत नसल्याचे निदर्शनास येत आहे.

पंचनामे लवकर न झाल्यास, सरकार व प्रशासनाला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. श्रीगोंदा तालुक्यात टोमॅटो, वांगी, काकडी आदी भाजीपाल्यासह कोथिंबीर या पिकांचे नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांचे टोमॅटो, भोपळा तसेच कारल्याचे मांडवच कोसळून पडले आहेत.

सोयाबीन,मकेला फुटले कोंब; कापूसही भिजला!

सतत सुरू असलेल्या परतीच्या पावसाने, जिल्ह्यात कापणीला आलेल्या व कापणी झालेले, शेतातील सोयाबीन पावसात भिजले असून, अनेक ठिकाणी सोयाबीनला तसेच मकेला कोंब फुटले आहेत. पावसामुळे भिजलेला कापूसही गळून पडला आहे. त्यासोबतच गळून पडलेल्या कपाशीच्या पात्या-फुलं व बोंड्या मातीत मिसळल्या आहेत.

पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड!

कापणी झालेल्या सोयाबीनच्या गंजी शेतात लावण्यात आल्या आहेत. परतीच्या पावसात सोयाबीनच्या गंजीवर ताडपत्री टाकून पीक वाचविण्याची धडपड शेतकऱ्यांनकडून केली जात आहे.

स्रोत:(विजय मांडे यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading