उपरा,लक्ष्मण माने.(भाग २५).

उपरा,लक्ष्मण माने..

बाकी सर्व कामं केली होती . एप्रिलचा महिना असावा किंवा मेचा . नक्की आठवत नाही . कोल्हापूरचे नारायणच्या कॉलेजातील दोन मित्र , कुंभार आणि बनकर ; आम्ही ज्यांच्या खोलीत राहत होतो , त्या भोसल्यांच्या घरातील दोन माणसं , पाटगावकर सर आणि दोन – तीन आणखी लोक एवढ्यांच्या उपस्थितीतच नारायणचं लग्न लागलं . एक प्रचंड क्रांती केल्याचा अनुभव आला .

लग्न झालं . पुढं काय ? … पाटगावकरसरांचा पाठिंबा होता . प्राचार्य गायकवाडांचा पाठिंबा होता . नारायणला मानेचा मित्र म्हणून ते ओळखत होते . सुरुवातीला दोघांनी मदत केली . पण बायको आणि प्रपंच काय असतो , हे आतापर्यंत कुणाच्याच डोक्यात घुसलं नव्हतं आणि स्वप्नात एखाद्यानं सांगितलं असतं , तरी पटलं नसतं …. इतक्या अचानकपणे आम्ही भराभर गुंतलो गेलो होतो . आता मागे जायला जागा नव्हती . ‘ पुढारी’त जाहिराती बघायच्या आणि पायाची चाकं कोल्हापूरच्या गल्लीबोळात फिरवायची . असं आठ – पंधरा दिवस केलं . पण नोकरी काही दोघांपैकी कुणालाच लागत नव्हती . इकडं फलटणला मुलीच्या आणि नारायणच्या घरच्यांनी गोंधळ घातला होता . इतका चांगला मुलगा बिघडला … आता घरच्यांनी त्याचा संबंध तोडून टाकायचं कळवलं . तर मुलीच्या बापानंही तेच केलं होतं . सालं , जसं काय आम्ही पाप केलं होतं !

चार – आठ दिवसांत परिस्थिती आणखीनच बिकट होत गेली . मारुती काळोखे , रामदास रासकर आणि सुभाष कर्णे या मित्रांनी थोडे पैसे पाठविले होते . त्यानं कसंतरी भागत होतं . नारायण तर अगदी अवाक् झाला होता . अबोलही झाला होता . काय करावं असा सारखा विचार करीत होतो . डोक्याला डोकी घासत होतो . आणि परिस्थिती अशी होती की निराशच व्हावं लागत होतं . वशिला नाही की डिग्री नाही … नोकरी कशी मिळवावी . एकच प्रश्न होता . नारायणची बायकोही साथ देत होती . अखेर , आता उद्याचं काय ? इतकी परिस्थिती झाली . कॉलेज पुन्हा सुरू व्हायला वेळ होता . कॉलेजला पोरं आली की पैशाचा प्रश्न सुटणार होता . पण तोपर्यंत काय ?

– आणि आपल्या डोक्यात विचार आला . नारायणला बाजूला नेला आणि त्याला सांगितलं …

‘ नारायण , लेका आपून एका गोष्टीचा इचार केला नाही . मी चांगला बँड वाजवतो . सीझन सुरू आहे . मी प्रयत्न करतो . ‘ मी वाजवणार नाही , असं ठरवलं होतं . पण आता परिस्थिती पुन्हा तिकडेच ढकलत होती . मी त्याला सांगून त्याची परवानगी घेतली आणि पापाच्या तिकटीवर गेलो . तिथं बँडवाल्याचे लोक बसलेले असतात . त्यांच्याजवळ जाऊन घुटमळत उभा राहिलो . ते कैकाडी भाषा बोलत होते . पण दोघंच जण होते . बाकी सारे घडशी होते . आपूनच त्यांना आमच्या भाषेतनं आपली ओळख करून दिली. इकडच्या – तिकडच्या गप्पा झाल्या . त्यान्ला , मला ढोल चांगला वाजवता येतो , म्हणालो . पण मंडळींचा विश्वास बसेना . बघू या म्हणाले , आणि त्यांच्या बँडच्या दुकानवजा शेडमध्ये गेलो . तिथं अगोदर रेसल चालली होतीच . झालं . ढोल खांद्यावर घेतला . दोन – तीन सिनेमातली गाणी आणि दोन – तीन चिजा वाजवल्या . मंडळी खूष दिसली . आमच्यात वाजवा ‘ म्हणू लागली . बँडाचे दोन – तीन ताफे होते . जातीन हात दिला . रोजी वीस रुपये देतो म्हणाले . अर्थातच , बिनतक्रार मी मान्य केलं आणि केली सुरुवात … वर्दी बाहेरगावची आली , की मी जाऊ लागलो . उगीच कोल्हापुरात कुणी पाहिलं तर अब्रूचा पंचनामा नको म्हणून . तीथ असली की वीस रुपये चालू व्हायचे .

कॉलेज सुरू होईपर्यंत तिघांच्या जेवणाचं भागवत होतो . फलटणहून मित्रमंडळी पैसे पाठवीत होती … आम्ही राहत होतो तिथं मात्र यातलं एक अक्षरही माहीत नव्हतं . भोसल्यांच्या घरातली माणसं अतिशय प्रेमळ , स्वभावानं मनमिळाऊ . भाड्याची तक्रार नव्हती . या महिन्याचं भाडं पुढल्या महिन्यात देऊन चालत होतं . नारायण माळी आहे हे त्यांना माहीत झालं होतं . पण माने कोण ? कसं विचारावं , म्हणून मला विचारीत नसत . पण बहुतेक मराठा असावा , असा त्यांचा कयास होता . त्यांनी नारायणला विचारून पाहिलं आणि मी कैकाडी आहे … हे समजलं . पण कैकाडी ही काय जात आहे , हे त्यांच्या कुणाच्याच लक्षात आलं नाही , कारण कोल्हापूरकडे कैकाड्यांना ‘ कोरवी ‘ म्हणतात . मी कोरवी आहे म्हटलं असतं , तर त्यांना समजलं असतं . पण ते काही त्यांच्या लक्षात आलं नाही .

कॉलेज सुरू झालं . पीडीचं वर्ष बरं गेलं होतं . त्यावेळी चौघात पाचवा ओढून काढता येत होता . पण आता ते शक्य नव्हतं . नारायणचं कुटुंब झालेलं . त्याच्या घरचा पैसा बंद झालेला . रामदास आणि मारुती काळोखे , दोघांच्याच घरनं पैसे येत होते . नारायण आणि मी नोकरी शोधीत होतोच . पण भागत काही नव्हतं . शेवटी प्रा . पाटगावकरांच्याकडं सारं सांगितलं . त्यांनी प्राचार्यांना विनंती केली आणि मला कॉलेजवर पार्टटाईम नोकरी मिळाली . तेवढीच मदत . मी स्वीकारली .

झालं आणि नोकरी मिळाली आणि तीही आपल्याच कॉलेजात. आनंद झाला. नव्वद रुपये पगार मिळायचा, तो सारा नारायणला द्यायचा. कुंभार आणि बनकर या दोन अन्य मेंबर्सना जेवायला घालायचं आणि त्याच्या बदल्यात त्यांनी पैसे द्यायचं ठरलं आणि त्याप्रमाणं सुरू झालं . आता नारायणचा बहुतेक वेळ घरातच जाऊ लागला . तो सेमिस्टरला बसला नाही आणि त्यानं कॉलेजचं नाव सोडलं .

एफ.वाय.चं कॉलेज सुरू झालं आणि नोकरीही चालू झाली . सुरुवातीला कॉलेजच्या लायब्ररीत काम करू लागलो . मुलांनी पुस्तकांची मागणी करावी, आपण पुस्तकं द्यावीत, असं चाललं होतं. लायब्ररियन म्हणून एम.ए. झालेले पाटील नावाचे एक गृहस्थ होते. नावानं आणि मनानंही गृहस्थ पाटीलच होते. तोंडानं इतका फटकळ माणूस ,की विचारायची सोय नाही. वर्गातल्या आणि कॉलेजातल्या मुलांसमोर कुणाचाही अपमान झाला तर त्यास वाईट वाटणारच . ह्या पाटीलबुवांचा खाक्या असा , की समोर तरण्या पोरी पाहिल्या , की ह्यांना करंट यायचा आणि मग शिपाई आणि मी यांच्यावर उगाच खेकसत राह्यचा . तेवढाच भावमारू उद्योग . मी काऊंटरवर पुस्तक देत असलो की त्याच वेळी हा ‘ पुस्तक ठेव ‘ म्हणून सांगायचा आणि स्वतःच्या टेबलावर तांब्या – भांडं असलं तरी पाणी स्वत : घ्यावं असं त्याला वाटत नसे . मग म्हणणार , ‘ अरे माने ! लेका , केव्हापास्नं बेल वाजवतोय . ऐकायला येत नाही , का भैरा आहेस ? ते भांड्यातलं पाणी दे .

‘ पाणी दिलं की दुसरं काहीतरी सांगणार आणि ते करायला लागलं , की पहिलं काम का केलं नाहीस , म्हणून शिमगा . तर काय , आपण नवीन …. सगळं करायचो … लायब्ररीत पाय टाकल्यापासून ते ऑफिस बंद होईपर्यंत ह्याची अशी टकळी सुरू असायची . कधी कधी खूप वाईट वाटायचं . पण गरजवंताला अक्कल नाही , म्हणून राबत राह्यचं .

मधेच कॉलेजची जागा बदलली . कॉलेजच्या नव्या इमारतीचा पाया काढल्यापासून इमारत बांधून होईपर्यंत मी आणि माझ्यासारखेच आणखी दोन पार्टटाईम क्लार्क , इमारतीच्या बांधकामासाठी खूप राबलो . खडक फोडले . जिथून मजूर पळून जायचे , तिथे आम्ही तिघेजण राबलो . प्राचार्य नियमित येत असत . स्वत : ही पहार घेऊन खडक फोडीत असत . प्राचार्यांनी असे खडक फोडले की , मन भरून येई ! अतिशय आदरयुक्त भीती वाटे . कॉलेज सुरू होतं …. पण पिरियड काही सापडत नसत . शिकवणी लावण्यासारखी स्थिती नव्हती आणि तोपर्यंत आपली जात ही मागसवर्गीय समाजात मोडते याची चौकशीही कधी केली नव्हती . त्यावेळी प्रथमच बी.सी. स्कॉलरशिप मिळू लागली होती . पण मिळेल तेवढा पैसा हवाच होता . कारण नारायण अद्याप बेकार होता . त्याला मदत मिळणं अतिशय गरजेचं होतं . मधेच एकदा त्याच्या सासून येऊन गोंधळ घातला होता . ‘ माझी पोरगी काढून आणलीस ‘ म्हणून तिची तक्रार होती . पण पोरीनं तोडीस तोड जबाब दिला आणि तिचं तोंड बंद केलं .

घराकडनं कधीतरी पत्र येत होतं . असंच एक पत्र आलं … त्यात लिहिलं होतं … ‘ मी लग्न करीत नाही आणि मावळण मुलगी ठेवू शकत नाही . तेव्हा साखरपुड्याचं लग्न मोडलंय आणि तिचं लग्न लावून देत आहोत . तू लग्नाला ये . ‘ क्षणभर पत्र वाचून आनंद झाला आणि दु : खही झालं . दुःख याचं वाटलं , की आपण लग्न केलं नाही , त्याचा वडिलांना फार त्रास झाला . बरं वाटत होतंच . कारण आता ती मुलगी तरी मार्गाला लागली होती . पण तिच्या लग्नाला मात्र जाता येत नव्हतं . कारण कोल्हापूर ते इंदापूर वाटखर्चालासुद्धा पैसा नव्हता .

या वर्षी कॉलेजात बराच मिसळून गेलो होतो . घराकडच्या कुणाची आठवण होत नव्हती . पत्र आलं तर किंवा त्याला उत्तर देताना फक्त रडायला व्हायचं . नाही असं नाही , पण आता एकटं राह्यची खूप सवय झाली होती . मधेच कुठं भटक्यांची पालं पाहिली किंवा रस्त्याच्या कडला मंडळी वळत असलेली दिसली , की उगीच काम नसताना त्यांच्याबरोबर बोलत बसायचो . हिकडचं तिकडचं . पण मी कैकाडी आहे … हे न सांगताच बोलायचं . अंगावरली कापडं आणि कॉलेजचं वातावरण यामुळं जात सांगायला लाज वाटायची .

कॉलेजात व्हरायटी शो व्हायचे . आवाज चांगला असल्यानं या शोमधून हमखास गाणी म्हणायचो . कॉलेजातली एक मुलगी त्यावेळी आवडत होती . तिच्याबरोबर निमित्त काढून बोलायचं. लायब्ररीत लागल्यावर तर सतत मुलींचा संबंध येऊ लागला. त्या आपण होऊनही बोलू लागल्या. पण आपण आपलं मनातल्या मनात चित्र रेखाटत राह्यचं . बोलायला धाडस काही व्हायचं नाही.

अखेर एकदा त्या मुलीनं पुस्तकातनं चिठ्ठी धाडली. घाबरत घाबरत संडासमध्ये जाऊन चिठ्ठी वाचली. तिनं बरंच काही लिहिलं होतं. मी हळुहळू तिच्याच संबंधी विचार करू लागलो . इतकी देखणी पोरगी … आणि त्यातही ब्राह्मण … आपला तर काही दिवस डोक्याचा तमाशा झाला होता . काहीही करीत असो , मनात विचार असत , ते त्या पोरीचेच . तिला प्रतिसाद देत होतो , प्रेमाचा रंग बराच गडद होत चालला होता .

एकदा न राहवून सारं प्रकरण नारायणला सांगितलं. त्याच्याशिवाय कुणाला सांगणार ?… त्यानं सारं ऐकून घेतलं. आणि चांगलं झापलं . वास्तवाचं भान दिलं . ती लग्नाला तयार आहे का विचार , म्हणून सांगितलं . मी तिला विचारलं. अर्थात, चिठ्ठीतनं . त्याला तिचं उत्तर आलं ते भारी. ‘ मी लग्न करण्याचा विचार केलेला नाही . आणि आपण मोकळेपणानं बोलू ‘. झालं . तिच्याशी बोललो. ती म्हणाली,

‘ किमान, मराठा असशील, असं वाटलं होतं. तुझी जात पाहता मला जमेल, असं वाटत नाही.

‘ आणि इतक्यावरच आपलं प्रेम खतम झालं. जातीची तीव्र जाणीव झाली , ती या प्रसंगी . इतर साऱ्या बाबी जमवून घेऊ पाहणारी मुलगी जातीचा मुद्दा निघाला , की एकदम हद्दपार करून गेली . मी तिच्या नादाला लागलो नव्हतो . तिनं केलं होतं आणि तिनंच संपवलंही होतं .

मधून मधून कॉलेजच्या डिबेटिंग स्पर्धेत पाटगावकरसरांच्यामुळे भाग घेत होतो . सेवादलाच्या कार्यक्रमाला सरांच्या बरोबर जात होतो . काहीतरी सार्वजनिक काम करावं असं वाटे . कुठं शिबिरं, चर्चा, अभ्यास सत्रं असली की पाटगावकरसर पाठवीत होते . खर्च त्यांचाच असे आणि त्यांच्या घरातही मुक्त प्रवेश असे . त्यांची एक मुलगी माझी वर्गमैत्रीण होती . वातावरण मोकळं असल्यानं खऱ्या अर्थानं मध्यमवर्गीय कुटुंब कसं असतं, हे समजत होतं . नकळत भावी आयुष्य बेतलं जात होतं . अभ्यासही चालू होता . एफ.वाय.ची परीक्षा झाली आणि कसातरी काठावर पास झालो . इंग्रजीतसुद्धा ‘ पास ‘ झालो ! आता आपण कॉलेज संपूर्ण शिकू , असं वाटू लागलं .

एस.वाय.ला आलो , तेव्हा पुन्हा एकदा वेगळ्या वळणावर उभा होतो . ज्या घरात होतो , त्या घरमालकाची एक मुलगी होती . वाचायची हौस खूप . त्यामुळं मी लायब्ररीतनं पुस्तकं आणून द्यायचो आणि ती वाचायची . आम्ही एकत्र राहत असल्यानं खूप मोकळं बोलायचो . तारुण्यसुलभ ओढ असेलच , पण विचार करायला लागल्यापासून मला समजेल तेवढं तिला समजावून सांगत होतो . भाऊसाहेब खांडेकरांची सारी पुस्तकं वाचून झपाटून गेलो होतो . सार्वजनिक कामाची आवड निर्माण होत होती . समोर तीही घडत होती . थोडाफार पुरोगामी विचार समजत होता . मैत्री खूप जमली होती . पण विचार आणि वाचन यापलीकडे आम्ही काही विचार करीत नव्हतो . पण हळुहळू जवळीक वाढत चालली होती . मी जपून पावलं टाकीत होतो. लग्नाचा विचारही डोक्यात येत नव्हता . आपली योग्यता नाही या विचारानं कासावीस होत होतो .

आणि याच दरम्यान जगन्नाथपुरीचे शंकराचार्य कोल्हापूरला येणार होते . कुठल्यातरी मंदिराचं पायापूजन होतं . गावात , पेपरात तो चर्चेचा विषय होता. डॉ. कुमार सप्तर्षीनं जाहीर वाद मांडला होता. डॉ. बाबा आढाव आणि कुमार सप्तर्षी यांच्या काही मुलाखती , भाषणं पेपरातून वाचीत होतो , धर्म , जाती यांचा ते सांगत असलेला विचार पटत होता . अशाच एका बैठकीत बापुसाहेब पाटलांची ओळख झाली. आणि दलितांच्या प्रश्नांची पोटतिडीक असलेल्या या माणसानं अक्षरश : भारावून सोडलं. शंकराचार्य हे चातुर्वर्णीयांचे समर्थक आहेत, जातिव्यवस्था टिकवावी या मताचे आहेत म्हणून त्यांची चीड येऊ लागली . मित्रांशी वाद घालायला लागलो . हे कसं चूक आहे … हे सांगण्यासाठी वाचू लागलो . आणि शंकराचार्यांच्या मिरवणुकीला विरोध करणाऱ्यांच्यात आपणहून सामील झालो. माणसांच्या खांद्यावर पालखी असते आणि तिच्यात देवांचे टाक असतात , हे मी लहानपणापासून पाहत होतो . पण चांदीच्या पालखीत माणूस बसतो आणि त्याची मिरवणूक अशी निघते , हे काही पाहिलं नव्हतं . झालं … मिरवणूक खासबागेजवळ आली होती . पोलिस बंदोबस्त जोरात होता , आणि गर्दीही जोरात होती . शंकराचार्यांचे समर्थक आणि विरोधक यांच्यात घोषणांचं युद्ध सुरू झालं होतं . खूप घोषणा देत होतो . रेटारेटी सुरू झाली . पोलिसांनी साखळी केली होती . ती बापुसाहेब , रवींद्र सबनीस , सुरेश शिपुरकर वगैरे मंडळींनी तोडली आणि चपलांची फेकाफेक सुरू झाली . शंकराचार्यांवर चपलांचा वर्षाव झाला . आपल्याही एक -दोन लागल्या असतील . पोलिसांनी धरून गाडीत बसवलं . खूप लोकांना बसवलं आणि लांब नेऊन सोडून दिलं . बापुसाहेब आणि काही लोकांना मात्र तुरुंगात नेलं होतं .

अशा रीतीनं सामाजिक चळवळीचं भान येऊ लागलं. प्रा. माणगावकर, बाबुराव..

क्रमशः
स्रोत:(पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या उपरा कादंबरीतुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading