दिनांक १७ ऑक्टोबर,श्रीगोंदा:
तालुक्यात परतीच्या जोरदार पावसाने खरिपाच्या विविध पिकांना फटका बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या भाजीपाल्यांचे देखील अतोनात नुकसान झाले आहे. साहजिकच यामुळे भाजी मंडईतील विविध भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत.
भाजीपाला खरेदी करताना सामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री बसत आहे. विविध खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. परतीच्या अतिपावसामुळे शेतशिवारात पाणी साचून, मोठ्या प्रमाणात भाजीपाला खराब झाल्याने, विविध प्रकारच्या भाजीपाल्यांची बाजारपेठेत आवक कमी झाली आहे. त्यातूनच या भाजीपाल्याचे दर वाढले आहेत.
या पावसाने भाजीपाला खराब झाला असून, विविध प्रकारच्या भाजीपाल्यांची बाजारपेठेत आवक कमी झाली आहे. भाजीपाल्यांचे दर वाढल्याने ग्राहकांना खिशाला त्याची झळ बसली आहे. घाऊक अन किरकोळ बाजारपेठेत भाज्यांना महागाईची फोडणी बसली आहे. पण, काही भाज्या जसे की कोथिंबीर, वांगी, भेंडी या पूर्वीच्या दरानेच मिळत असल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळत आहे.
कधी मुसळधार पाऊस तर कधी दुष्काळ. शेती समोर अनेक संकटं आहेत. अशाही परिस्थितीत शेती टिकवण्यासह तुमची आमची भूक भागवण्यासाठी शेतकरी झटत राहतो. पण, त्याच्या संकटात कुणीच वेळेवर मदतीला येत नाही, हेच यातून दिसत आहे.
“भाजीपाला पिकांचेही नुकसान झाल्याने, पिकांबरोबर भाजीपाला पिकांचेही पंचनामे करून, शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी” अशी मागणी रयत क्रांतीचे (तालुकाध्यक्ष) भाऊसाहेब मांडे यांनी केली आहे.
स्रोत:(विजय मांडे,मढेवडगाव,श्रीगोंदा)
