दिनांक २४ एप्रिल श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहराच्या शेजारील घायपतवाडी परिसरात अडगड मार्गे लपत पाच-पंचवीस लोकांचा जमाव,ज्यात लहान मुलं,महिला व मध्यमवयीन इसम डोक्यावरती आपल्या संसाराचे गाठोडे वाहत लगबगीने निघाल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले.यावर येथील पत्रकारांना कळविण्यात आले.त्यानुसार नमूद ठिकाणी जाऊन या चाललेल्या लोकांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र,ते लोक थांबण्याच्या मनस्थितीत नव्हते. साहेब पाया पडतू.आम्हाला जाऊ द्यात,आमची लहान लेकरं व घरची वाट पाहत्यात.असे त्यातील एका मध्यम वयीन इसमाने सांगितले.
गेल्या पाच दिसांपासून आम्ही पायी चालत आहोत.रात्र झाली की,सुरक्षित ठिकाणी थांबतूत, जवळ असलेलं दोन घास खातोत, काही येळ आराम करून, उजाडल्यानंतर पुन्हा गावचा रस्ता धरत चालायला लागतूत. पुण्याच्या तिकडं मुळशी गावात आम्ही मजुरीच्या कामासाठी गेलो होतो. करुणाचा आजार आला अनं समदं विस्कटलं. तिथलं पोलीस व मोठ्या अधिकाऱ्यान थांबिवलं, त्यांच्या सांगण्यावर बरंच दिस थांबलु, मात्र कायबी हालचाली झाल्या न्हाईत.घरची ओढ सतावत व्हती,त्यात वाहन मिळना. म्हणून,पायी निघण्याचा निर्णय घितला.पाच दिसांपासून चालतुया, लातूरला जायचंय,अंतर लांब हाय, आम्हाला चलाव लागल,कुणालाही बोलू नका, आम्ही थांबणार न्हाईत, आम्हाला आमच्या गावी परतायचय, म्हणत त्या माणसांनी वाट धरली, काट्याकुट्यातून निघत ते आढळगावच्या दिशेने पुढे चालत राहिले.
उपस्थित असलेल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी श्रीगोंद्याचे तहसिलदार महेंद्र माळी यांना माहिती कळवली.त्यांनीही नमूद इसमांना थांबवण्याचे आवाहन केले.मात्र,ते त्या मनस्थितीत नव्हते. त्यांची राहण्याची तसेच काही दिवसांत गावी पोहोचवण्याची जिम्मेदारी तहसीलदारांनी बोलून दाखवली.मात्र,ते लोक निर्णयावर ठाम होते.लांबचे अंतर कापायचे असल्याने,त्यांनी चालणे पसंत केले.नमूद विनंती करणाऱ्या एकाही इसमाचे व अधिकाऱ्यांचे त्यांनी काहीएक ऐकून न घेता सर्व जण मुख्य रस्त्याने न जाता घायपतवाडीच्या भिक्षेकरी गृहा समोरील काटेरी मार्गातून, झाडांतून नर्सरी मार्गे चालत राहिले.
या परिसरातील (स्थानिक कार्यकर्ते) नितीन रोही , (पत्रकार) अंकुश तूपे, (सामाजिक कार्यकर्ते) सागर आळेकर, प्रज्वल आळेकर, बंटी आळेकर यांनी फोन करून श्रीगोंदाचे तहसिलदार महेंद्र माळी यांना दिलेल्या माहितीनुसार माळी यांनी नमूद पीडितांची महादजी शिंदे विद्यालयात राहण्याची व खाण्याची व्यवस्था करतो. त्यांना दोन दिवस वेळ द्यायला सांगा. प्रवासास परवानगी मिळाल्यास या सर्वांना गावी पाठविण्याची व्यवस्था करू, असे सांगितले. मात्र, त्या लोकांनी काही एक न ऐकता. आपला पायी प्रवास चालू ठेवला. शिवाय त्यांना विनंती करत असलेल्या कार्यकर्त्यांना ते “साहेब पाया पडतू आम्हाला जाऊ द्यात.आमची लहान लेकरं व घरची वाट पाहत्यात”… एवढे म्हणाले आणि पुढच्या प्रवासाला चालू लागले.
