श्रीगोंद्यात मिनीबस-ट्रक अपघात: अनेक जखमी, अपुरी आपत्कालीन व्यवस्था आणि पोलिसांवर नागरिकांचा संताप..!

श्रीगोंदा, दिनांक १७ एप्रिल २०२५ :

आज सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा शहरातील महात्मा फुले सर्कलजवळ बायपास रस्त्याकडे वळत असताना मिनीबस आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात काही महिला व पुरुष जखमी झाले आहेत.

सदरील मिनीबस (क्र. MH 16 CC 4931) ही लोणी-संगमनेर येथून देवदर्शनासाठी निघाली होती. दरम्यान, महात्मा फुले सर्कलजवळ बायपासकडे वळत असताना समोरून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रक (क्र. MH 16 DP 0048) ने मिनीबसला धडक दिली. या धडकेत मिनीबसचे मोठे नुकसान झाले असून बसमधील काही प्रवासी किरकोळ तसेच गंभीर स्वरूपाचे जखमी झाले आहेत.

अपघातानंतर काही क्षणातच परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी घटनास्थळी धावून आले. संभाजी ब्रिगेडचे नाना शिंदे आणि अरविंद कापसे यांनी तातडीने जखमींना मदत केली. त्यांनी आपल्या खाजगी वाहनातून जखमींना श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या तत्परतेमुळे गंभीर जखमींना वेळीच उपचार मिळाले.

दरम्यान, 108 आपत्कालीन सेवा आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी वेळेत पोहोचू शकले नाहीत. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. अपघाताच्या ठिकाणी जमा झालेल्या नागरिकांनी आपत्कालीन व्यवस्थेच्या अपुऱ्या कार्यक्षमतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. या अपघातासंदर्भात अधिक तपास पोलीस प्रशासन करत आहे.

स्रोत:(घटनास्थळावरून)

Advertise..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading