भानुदास उदार
युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट या नक्षलवादी संघटनेच्या पाच नक्षलवाद्यांना एकाचवेळी यमसदनी धाडणारे बहादूर हवालदार म्हणून भानुदास उदार यांचे नाव आजही आदराने घेतले जाते. या कामगिरीसाठी त्यांचा ‘ शौर्य चक्र ‘ देऊन सन्मान करण्यात आला.त्यांच्या या कामगिरीचा आजही या भुमीला अभिमान आहे.
पारनेर व श्रीगोंदा तालुक्याच्या सीमेवरील चांभुर्डी हे छोटे गाव. १ जून १९७२ रोजी पर्वती व सरस्वती उदार या अध्यात्मिक ध्यास असलेल्या कुटुंबात भानुदास यांचा जन्म झाला. एकनाथ व संतोष हे दोन भाऊ. वडिलोपार्जित १०-१२ एकर जमीन. राहण्यास घर नाही. अशा परिस्थितीत दोघांच्या शिक्षणासाठी आई- वडीलांना कष्ट उपसले. एकनाथ व भानुदास यांना श्रीगोंदा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात शिक्षणासाठी पाठविले. बसने दररोज डबा यायचा. सकाळी आलेला डबाच संध्याकाळी खावा लागायचा. अनेक वेळा सकाळची भाजी संध्याकाळपर्यत खराब व्हायची. पण परिस्थितीवर मात करण्याच्या ध्येयाने एकनाथ व भानुदास शिक्षण घेत होते. भानुदास बारावी पास झाले. बी.ए.च्या पहिल्या वर्षाला असताना सैन्य दलाच्या भरतीसाठी बेळगाव गाठले. जाण्यासाठी पैसेही नव्हते. चांगले कपडे देखील नव्हते. मुलगा भरतीसाठी जाणार म्हणून वडिलांनी विसापूर गाठले. एक पँट – शर्ट शिवून आणला . त्यानंतर भानुदास रेल्वेने बेळगावला गेले. ९ मे १ ९९२ रोजी २१ मराठा रेजिमेंटमध्ये भरती झाले. त्यांनी पॅरा कमांडोचे विशेष प्रशिक्षण घेतले. खडतर प्रशिक्षणानंतर २१ पॅरा स्पेशल फोर्समधील कमांडोच्या विशेष टीममध्ये त्यांची निवड झाली .
२६ जून १९९७ रोजी पारनेर तालुक्यातील सारोळा आडवाई येथील निवृत्ती व मालनबाई फंड यांची कन्या छाया यांच्याशी त्यांचा विवाह झाला . छाया यांनी आई – वडिलांना मदत करावी म्हणून तिला चांभुर्डीत ठेवले. प्रतीक्षा व आराधना या दोन कन्या आणि तिसरा प्रथमेश ही पुष्प संसारात उमलली. मुलींना चांभुडीर्तील शाळेला शिक्षणासाठी घातले. बालवाडीत असलेली आराधना हंगा नदी पार करीत असताना पाण्यात बुडू लागली. पण आजोबा त्रिंबक उदार यांनी तिला वाचविले. या घटनेनंतर भानुदास यांनी मुलांच्या शिक्षणासाठी पत्नीला नगरला पाठवले .
१९९९ मध्ये त्यांची आसाममध्ये बदली झाली. त्यावेळी ते पत्नी छाया यांना बरोबर घेऊन गेले होते. आसामवरुन भानुदास उदार यांच्या कमांडो टीमला पुन्हा कारगीलला पाठविण्यात आले. यावेळी तेथील एका मंदिरात अतिरेकी लपल्याची माहिती भानुदास उदार यांच्या कमांडो टीमला मिळाली होती. त्यांनी मंदिराला वेढा घातला. अतिरेक्यांनी तेथे बॉबस्फोट घडवून आणला. यामध्ये भानुदास सुदैवाने बचावले होते. त्यानंतर त्यांनी पत्नी छाया यांना पुन्हा गावी आणले. २००७ मध्ये त्यांची बदली मणिपूरला झाली .
मणिपूर भागात युनायटेड नेशन लिबरेशन फ्रंट या नक्षलवादी संघटनेने उच्छाद मांडला होता. त्यामुळे भारतीय लष्काराने ‘ हिफाजत ऑपरेशन ‘ हाती घेतले. या ऑपरेशनसाठी भानुदास उदार यांच्या पॅरा कमांडो टीमची निवड करण्यात आली होती. त्यांनी ३ जुलैला पत्नी छाया यांना फोन केला. ‘ आमची फौज मंडलच्या जंगलात नक्षलवाद्यांना शोधण्यासाठी निघाली आहे. आपला किमान दहा दिवस फोन होणार नाही’, अशी माहिती दिल्याची आठवण छाया यांनी सांगितली. तो त्यांचा शेवटचा फोन ठरला .
८ जुलै २००७ रोजी भानुदास उदार यांची टीम नक्षलवाद्यांचा शोध घेत होती. त्याचवेळी समोरुन फायरिंगसाठी गन सरसावणाऱ्या एका नक्षलवाद्याच्या दिशेने भानुदास उदार यांनी जोरदार फायरिंग केली. पहिल्याच गोळीत तो नक्षलवादी ठार झाला. एक नक्षलवादी मेला, पण इतरांचा शोध घेत असताना घनदाट झाडीतून अचानक भानुदास उदार यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव झाला. एक गोळी त्यांच्या डोक्यातून आरपार गेली भारतमातेच्या सुपुत्रांची ‘ हिफाजत ‘ करताना भानुदास यांनीही आपला देह भारतमातेच्या कुशीत ठेवला नक्षलवाद्यांनी तेथून पळ काढला. त्यानंतर कमांडोंनी परिसराची छाननी केली असता इतर पाच नक्षलवाद्यांचे मृतदेह त्यांना आढळून आले याच कामगिरीसाठी भानुदास उदार यांना शौर्य चक्र प्रदान करण्यात आले .
दिल्ली दाखविली
माझा भानुदास शिळे तुकडे खाऊन शाळा शिकला. भरतीला गेला तेव्हा त्याच्या अंगावर ठिगळाची पँट होती. विसापूरला जाऊन नवी पँट शिवली. एका पँटीवर भरती झाला. त्यानंतर शेतात विहीर खोदली. पाइपलाइन केली. घरदार बांधले. आमच्यासाठी खूप केले. त्याला सोन्यासारखी बायको मिळाली. तीन मुले झाली. सुखाचा संसार झाला होता. मला व दीराला दिल्लीला नेले. देवधर्म केला पण देवाने त्याला आमच्यातून नेले, अशी आठवण सांगताना वीरमाता सरस्वती यांनी दोन्ही हात तोंडावर दाबून दुःखावेग आवरला.
(शब्दांकन:गणेश कविटकर, ए.एम.न्युज)
(स्रोत:अग्निपंख फौंडेशन)
