बलुतं..
होतो , ती काही माझी मतं नव्हती . डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचे ‘ शूद्र मूळचे कोण होते ? ‘ हे पुस्तक मला वाचावयास मिळालेले . शिवाय मुंबईहून बाबासाहेब संपादित ‘ जनता ‘ साप्ताहिक बोर्डिंगवर यायचे . त्यांच्यातील अग्रलेख मानसिक बळ द्यायचे . वाटायचं , हे खरे आपले विचार . भोवतालच्या सामाजिक शोषणाची जाणीव प्रखर होत होती .
साहित्याचं कुतूहल ह्याच क्यात निर्माण झालं . पूर्वी कुलकर्णी सरांबद्दल सांगितलं ना , तेवढी काही त्यांची ओळख पुरेशी नाही . कुलकर्णी सर मराठी खूपच छान शिकवीत . थोडीफार ठेंगणी मूर्ती . एकटांगी धुवट धोतर, त्यावर कोट . डोक्यावर पांढरी टोपी . कोल्हापुरी वहाणा करकर वाजवीत ते वर्गात येत . ते तसे देखण्यात जमा. गालावर टिचकी मारली तर रक्त येईल , एवढी त्यांची मुलायम कांती . एम . ए . मराठीचा क्लास चुकला , म्हणून ते हायस्कूलमध्ये आलेले , त्यामुळे त्यांच्या मनात नेहमी असंतोष खदखदत असायचा . मला वाटतं , त्यांच्या कॉलेजात कवयत्री शांता शेळके असाव्यात . गप्पांच्या ओघात ते नेहमी त्यांची आठवण काढीत . त्यांची कविता शिकवताना रंगात यायचे . त्यामुळं ते वर्गात आले की आम्ही त्यांना शांता शेळकेची कविता शिकवण्याचा आग्रह करायची . त्यांची शिकवण्याची एक मजेशीर पद्धत होती . ते एखाद्या विद्यार्थ्यावर रागावले , म्हणजे हातातील पेन्सिलने त्याला मारायचे . पेन्सिलचा मार असा कितीसा बसणार ? त्यांची शिक्षा करण्याची एक पद्धत मात्र जीवघेणी . ज्या विद्यार्थ्यांचा त्यांना राग आला असेल , त्या विद्यार्थ्याला प्रश्न विचारीत- पण मुलाकडे मात्र ते ढुंकून पाहत नसत . त्यामुळं ते पोरगरडकुंडीला येई . ( अशीच पद्धत मी एका मान्यवर पुढाऱ्याच्या बाबतीत अनुभवलेली . ते तर म्हणत , ” राजकारणाच्या लढाईत बाजारबुणगेही चालतात . ” अशा वेळी ते बाजारबुणग्यांना जवळ करीत . एखाद्याशी मात्र असाच जीवघेणा खेळ खेळत . ) कुलकर्णी सर बहुधा कथा लिहित असावेत . एकदा – दोनदा त्यांची कथा मासिकात छापून आलेली मी पाहिलेली . अंक मागितला तेव्हा म्हणाले , ” शाळेतील मुलांनी वाचण्यासारखी नाही . ” मनात खूपच हसायला आलं . खरं म्हणजे त्या कथेत असं लपविण्यासारखं काय बरं असावं ? जीवनाच्या रहाटगाडग्यात अस काय आहे , की ते सरांनी आपल्यापासून लपवून ठेवावं ?
कुलकर्णी सर मला शाळकरी पोर समजत होते , तर माझ्या जीवनात किती चढउतार होत होते ! त्या काळात एका घटनेमुळं तर जीवनाचा सांधाच बदलला . हे सांगण्यापूर्वी थोडीफार पार्श्वभूमी सांगायला हवी . तात्या मुंबईला खूपच सीरियस असतात . मला तार करून बोलावलं जातं . तात्या मेले तर त्यांना पाणी द्यायला कोण , हा प्रश्न घरातील मंडळींना पडलेला . तात्यांचा मुलगा तसा खूपच लहान . पुतण्याचं पाणी तसं ग्रेट समजलं जात होतं . मी मुंबईला येऊन पाहतो , तो तात्या शेवटच्या घटका मोजीत असतात . नेमकं वडिलासारखंच त्यांचंही लिव्हर स्पिरिटमुळं नासलेलं . बहुधा आतड्याला भोकं पडली असावीत . माझ्या वडिलांना तात्यांनी पाणी दिलं होतं , तर मला त्यांना पाणी देण्याची पाळी आली होती .
तात्यांच्या मरणाचा धक्का बसत नाही . तात्यांच्या मरणाची अटकळ मी आधीच बांधली होती . आजी हमसून हमसून रडत होती . आजीचा वडिलांपेक्षा तात्यांवर विलक्षण जीव होता . माझ्या डोळ्यांतून मात्र टिपं गळत नव्हती . तात्यांनी आईचा एकदा केलेला उद्धार मी अजून विसरलो नव्हतो . माझं मला नवल वाटण्यापेक्षा मला काकूचंच नवल वाटत होतं . कुणाचंही प्रेत असो , काकू कधी त्याचं तोंड पाहत नसे . तिला म्हणे धडकी भरायची . ती गळ्यात नादाळी घालायची . पण नवरा मेला असताना तिनं बाहेर येऊ नये , याचं नवल वाटत होतं . सारा कावाखाना काकूसंबंधी कुजबुजत होता . शेवटची आंघोळ पत्नीनं घालावी , हा प्रघात होता . पण काकूनं बाहेर येण्याचं नाकारलं . बहुधा काकूला ‘ एकदाची सुटले हेही समाधान वाटत असावं .
मेलेल्या माणसाला पाणी देण्याचा हा माझा पहिलाच प्रसंग . तात्यांची ताटी उचलली जाते . त्या काळी महार मंडळी प्रेत पुरीत . आजच्यासारखं सरण रचून जाळीत नसत . बाबासाहेबांना चैत्यभूमीवर जाळताना पाहिलं आणि तेव्हापासून जुनी पद्धत गेलेली . स्मशानात म्युनिसिपालिटीचे खास खोदणारे नोकर , पण तेही महारच. पुरलेल्या प्रेतावरचे कपडे ही मंडळी विकतात , हा त्यांच्याबद्दल प्रवाद . वरळीच्या सोनापुरात पुरुषभर खडा खोदतात . तात्यांचा देह अल्लद खड्ड्यात ठेवला जातो . खोऱ्यांनी भराभरा माती लोटली जाते . माती लोटण्यापूर्वी पाणी पाजण्यास विसरत नाहीत . खासेला चकरा का मारायच्या , मडकं फोडताना बोंब का मारायची , याचा अर्थ कळू शकला नाही . सर्वांनी हातपाय नळाखाली धुतले , म्हणजे एकजण लिंबाचा पाला घेऊन बसलेला . लिंबाचा पाला तोंडात घालण्याचा रिवाज . समोरच्या हॉटेलात सर्वाना चहा पाजणं , विडी , पान – तंबाखू पुरवणं ही प्रथा होती . त्या दिवशी घरी चूल पेटली नाही . नातेवाईक आळाण आणि भाकरी घेऊन आले . वडील मरण पावले तेव्हा मी खूपच लहान होतो . पण तेराव्याला ह्याही वेळी मी डोक्यावरचे केस काढण्याचं कटाक्षानं टाळलं होतं . अर्थात घरातील सर्वांच्या आग्रहापायी कावळ्यानं घास उचलावा म्हणून घासाला शिवलो होतो . पण त्या वयातही मला हे सारं बंडल वाटे . पिंडदानाची कल्पना हास्यास्पद वाटे . माणूस ज्या जागी मेला असेल , तिथं एक ताटाखाली पीठ पसरून ठेवीत . तेराव्याला ते ताट बाजूला काढीत . पिठावर तेवढ्या दिवसांत कोणत्या तरी प्रकारची नक्षी उमटलेली असे . ती नक्षी पाहून म्हातारी मंडळी सांगत , की मेलेला जीव हा कोणत्या योनीत जन्माला गेला . ही रूढीही हास्यास्पद वाटे . बऱ्याचदा ही माणसं काबळे किंवा साप यांच्याच जन्माला जात . पुनर्जन्माची थिअरी अशी खोलवर हाडीमाशी खिळलेली . प्रत्यक्षात यांच्या सतरा पिढ्यांनी कधी गीता वाचली होती किंवा नाही ,एका नातेवाइकानं तिच्याबद्दल सांगितलं . तिला दुरूनच दाखवलं . लाह्या फुटाव्यात , हा संशोधनाचाच विषय .
तिचं गाव संगमनेरपासून पाच – सहा मैलांवर , संगमनेरला शनिवारी आठवड्याचा बाजार भरायचा . आमच्या शाळेला दुपारी सुट्टी असायची . त्या वेळी बाजारात फिरणं हा आमचा बोर्डिंगच्या मुलांचा छंद , एकदा असाच बाजाराच्या गर्दीतून फिरत असताना तात्या एका वाटेनं जातात खरे ; पण माझ्या समोर त्यांनी जी वाट कोरून ठेवली होती , ती पाहून मी तर चक्रावून गेलो होतो . ह्या वाटेने जाताना खूपदा हेलपाटली . अजगरासारखं स्वत : भोवती घिरट्या घालीत मातीत तोंड खुपसलं . आयुष्याचा अर्थ बदलला . थोडंफार जे रोमँटिक जीवन होतं ना , ते रखरखीत वाळवंटासारखं झालं . पण ह्या वाळवंटाची कल्पना सुरुवातीला मुळीच आली नाही . एखाद्या महाकाय अजगरा गिळावं आणि आपल्याला त्याची कल्पना येऊ नये , भन्नाट अंधारात मिटमिट्या डोळ्यांनी पाहावं , अशी अवस्था निर्माण झाली . आपली रक्ताची माणसं आपल्याच रक्तमांसाचा खच करू शकतात , याची किंचितही जाणीव सुरुवातीला आली नाही . अर्थात , त्यांनी हे केवळ समजून केलं होतं , असंही नाही . त्यांच्या दृष्टीनं एका पोरक्या मुलास मदत करतो आहोत , अशीच त्यांची भावना होती.
तात्यांनी आईला किंवा मला न विचारताच माझं लग्न जमविलेलं असतं . पंचांत सुपारी फोडलेली असते . आजी सांगत असते , ” लेखा , तात्यांनी दिलेलं वचन मोडू नकोस . टाकलेला थुका पुन्हा गिळायचो नसतो . आणि तुला ठरवलेली बायको किती नाटक आहे- वाण्या – बामनावाणी ! चंद्राला म्हणती ‘ उगवू नको आणि सूरयाला म्हणती ‘ मावळू नको ‘ , अशी ! ” कावाखान्यातल्या बायाही दुजोरा देतात . ह्या बायांत मावस – चुलत्यांच्या बायका आघाडीवर असतात . मुलीचे पालक आणि मावसचुलत्याचा घरोबा . गावातल्या मुलीचं लग्न जमविण्याचं क्रेडिट त्यांना हवं असतं . दोन्ही घराण्यांचा भावपणा खूपच दाट , ह्यात माझा बकरा तर होत नाही ना , ही मला शंका . आपण मुलगी पाहिली नसताना आपलं लग्न ह्या मंडळींनी निश्चित करावं , यामुळं मनातून मला खूपच चीड आलेली . त्यात मुलगी ही खेड्यात होती . सहीचा निशाणी अंगठा उठवणारी . असली गोरीपान , म्हणून काय झालं ? एवढ्या कमी वयात लग्नाचं लोढणं अडकवून घेऊ नये , असं मनापासून वाटत होतं . आंबेडकरांसारखं खूप शिकावं , ही ऊर्मी दाटून येत होती . लग्न केल्यामुळं आयुष्याचं खोबरं होईल अशी भीती वाटत होती . आणि मनाच्या एका कोपऱ्यात मुलीचं सौंदर्यवर्णन ऐकून माझ्या मनातही एक चेहरा उभारून येत चाललेला . माझ्या डोळ्यांपुढे जे बायकोचं चित्र आहे , खरंच तशीच ही असेल का ? तिला न पाहताच तिच्या संदर्भात मी विचार करू लागलेला . आईला मात्र आनंद झालेला असतो . तिचे डोळे नातवाचं तोंड पाहण्यास आसुसलेले होते .
तसं रणरणतं ऊन होतं . त्या उन्हाचं चांदणं झालं , असं काही मी म्हणणार नाही ; पण तिला पाहताच चांगलाच उडालो होतो . आजुबाजूच्या गावची मंडळी आपल्या शेतातील माल विकायला घेऊन यायची . पंगत बसते , तसे ते बाजारात दाटीवाटीनं वसत . तिच्याही पुढ्यात पाटी असते . आपल्या आईबरोबर ती आलेली असते . ती गिहाईकांना माल तागडीनं तोलून देत असते . तिच्या आईवडिलांचा छोटासा मळा आहे , हे मला कळलेलं असतं . मी दुरूनच तिच्याकडे एकटक पाहत असतो . रणरणत्या उन्हामुळं तिचे गाल लाल झालेले असतात . तिनं चिटाचा परकर आणि चिटाचाच पोलका घातलेला . अस्ताव्यस्त केस कपाळावर येत असतात . ती खूपच देखणी असते . तिचे निळसर घारे डोळे , नाकाचे कट्यारीसारखे धारदार वळण आणि गुलाबी रंग , हे सारं सारं पाहून मी जागीच थिजून गेलेलो असतो . तिचे वय बहुधा दहा – बारा वर्षांचं असावं . ती शेलाट्या अंगकाठीची असते . संगमनेरच्या बाजारात भाजीपाला विकण्यास ही कुणी अस्मानची परी तर आली नाही ना , अशी शंका चाटून जाते . मनात विचार येतो , आपल्या वर्गातील मुलींसारका पेहेराव हिला घातला , तर हिच्यापुढे कुणी पासंगालाही उभ्या राहू शकणार नाहीत !
जवळ जाऊन बोलणं शक्यच नसतं . मी बोर्डिंगवर परततो तेव्हा लक्षात येतं . आपल्या मनाला पंख फुटले आहेत . मनात विलक्षण , टोकाची हुरहूर दाटून येत आहे . ती केव्हाच शाळेत गेली नाही , तिला लिहिता – वाचता येत नाही , हे प्रश्न फालतू वाटू लागतात . लग्नं करायचं तर ह्याच मुलीशी , हा ध्यास मनाला लागतो . शनिवार उगविण्याची वाट पाहू लागलो . तिला दूर उभं राहून पाहणं हा मात्र मनाला चाळाच लागला . तिला मात्र याची जाणीव शेवटपर्यंत आली नाही .
मी तिचं मनोमनच सई नाव ठेवलेलं . नाव तसं गावठी होतं . पण तिला ते शोभून दिसत होतं . पुढं एकदा देवगडच्या यात्रेत तिचं जवळून दर्शन झालं . देवगडच्या यात्रेला रस्ता जायचा तो बोर्डिंगवरूनच . बहुधा चैत्र महिन्यात ही यात्रा भरायची . मुंबईहून मावसचुलते आपल्या कुटुंबासमवेत ह्या यात्रेला यायचे . संगमनेरपासून दोन – तीन मैलांवर हे देवगड . तिथलं खंडोबाचं जागती ज्योत देवस्थान प्रसिद्ध . महार मंडळींचं पिढ्यान् पिढ्या चालत आलेलं हे दैवत . ह्या जत्रेला नातेवाईक नियमितपणे येत . तोच आपला रक्षणकर्ता , ही समजूत त्यांच्यात खोलवर रुजलेली . प्रत्येक घरटी कोंबडं किंवा बकरू पडे . मावसचुलते हमखास बोकड कापीत . देवदर्शनापेक्षा जत्रेतला तमाशा – हंगामा आणि बरबाट ह्यांचंच मला आकर्षण वाटायचं . खंडोबाचं प्रेमप्रकरण मात्र मनापासून आवडायचं . पिढ्यान् पिढ्या चालत आलेली ही आख्यायिका . खंडोबा जातीनं वाणी . त्याचं प्रेम बसलं धनगराच्या म्हाळसावर . तिच्यासाठी तो धनगरवाड्यात यायचा . मात्र खंडोबाशेजारी म्हाळसाची मूर्ती नसायची . नेहमी खंडोबाच्या देवळाच्या खालच्या बाजूला म्हाळसाचं वेगळं देऊळ . खंडोबाशेजारी त्याची लग्नाची बायको . भंडार मात्र म्हाळसावर
क्रमशः
(स्रोत:दया पवार यांच्या बलुतं कादंबरीतुन)
