नानासाहेब काळे
मुलाने सैन्यात भरती व्हावं अशी वडीलांची इच्छा होती . त्यासाठी वडीलांनी लहानपणापासूनच परिश्रम उपसले . श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळे येथील नवाजी काळे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले . तिसरी शिकलेले नानासाहेब भारतीय सैन्य दलात दाखल झाले . सैन्य दलात दहा वर्षांची सेवा झाली . तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९८४ मध्ये राबविलेल्या ‘ ब्लू स्टार ‘ ऑपरेशन राबविले . याच ऑपरेशनमध्ये लान्स नायक नानासाहेब काळे आत्मघातकी हल्यात शहीद झाले .
श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळे गावातील नानासाहेब काळे यांचा जन्म १ जून १९५७ रोजी नवाजी व अनसाबाई यांच्या पोटी झाला . नानासाहेब लहानपणापासून व्यायाम करत असत . सहा फुट उंची आणि भक्कम शरीरयष्टीमुळे मुलाने पोलिस किंवा सैनिक व्हावं अशी इच्छा नवाजी काळे यांची होती . पुण्यात २० सप्टेंबर १९७४ ला सैन्य भरती निघाली . इतर मित्रांबरोबर नानासाहेब पुण्याला गेले . रांगेत उभे राहीले अन भरती झाले . अठरा विश्व दारिद्रयाशी सामना करणाऱ्या काळे परिवाराला विशेष आनंद झाला . नवाज काळे यांनी मुलगा भरती झाला म्हणून गावात पेढे वाटले .
नानासाहेब काळे यांनी शिपाई म्हणून प्रशिक्षण घेतले . पहीली पोस्टींग काश्मीरला झाली . नानासाहेब यांनी आई वडीलांचे दर्शन घेतले . त्यावेळी वडीलांनी सांगितले , ‘ नाना आता तुला देशासाठी दिले आहे , प्रामाणिकपणे देशाची सेवा कर . त्यात तुझा जीव गेला तरी चालेल पण मागे हटू नकोस . ‘ वडीलांचे कानी पडलेले शब्द नानासाहेब यांनी अंतकरणात साठविले . नानासाहेब काश्मीरच्या रणभुमीकडे रवाना झाले . नानासाहेब यांनी काम सुरू केले . १३ वी बटालियन दि महार रेजिमेंटमध्ये एक आदर्श सैनिक म्हणून प्रमाणपत्रही मिळविले . पाच वर्षे नोकरी झाल्यानंतर आई – वडीलांनी नानासाहेब यांना लग्नाचा आग्रह धरला . गावातील चंदर शिरोळे यांची मुलगी रंजना यांच्याबरोबर नानासाहेब काळे यांचा विवाह झाला . नानासाहेब काळे यांच्यावर कुंटूबांबरोबर पत्नीची जबाबदारी पडली . पत्नी रंजनावर नानासाहेबांचे विशेष प्रेम होते , पण आई वडीलांची तिने सेवा करावी म्हणून तिला कधीच बरोबर नेले नाही . सन १९८४ मध्ये रेखाच्या रुपाने संसारात एक सुंदर फुल उमलले .
त्याच सुमारास अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात दडलेल्या अतिरेकी प्रवृत्तीचा बिमोड करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सुवर्ण मंदिरात सैन्य पाठवले . नानासाहेब काळे हे लान्स नायक म्हणून मुंबईत होते . त्यावेळी काही गद्दार सैनीक दारुगोळा , हत्यारे घेऊन अमृतसरकडे निघाल्याची खबर नानासाहेबांना कळाली . ठाण्याजवळील मुंब्रा येथे नानासाहेब काळे यांच्या टीमने गद्दार सैनीकांना रोखण्याचा प्रयत्न केला . परंतू या गद्दार सैनीकांनी भारतीय सैन्यावर हल्ला चढविला . या हल्यात पाच जवान शहीद झाले . त्यामध्ये चिंभळे गावचे भुमीपुत्र नानासाहेब काळे हे ११ जून १९८४ रोजी धारातीर्थी पडले . ही बातमी दुसऱ्या दिवशी चिंभळे गावात समजली . गावात एकच शोककळा पसरली . नानासाहेब काळे यांचे पार्थिव लष्कराच्या शववाहीनीतून चिंभळे गावात आणण्यात आला . गावकऱ्यांनी फुलांनी सजविलेल्या गाडीतून वीर भुमीपुत्राची मिरवणूक काढली . गावातील स्मशानभुमीत नानासाहेब यांच्यावर अंत्यसंस्कार झाले . यावेळी घरच्यांच्या दुःखाला पारावार उरला नव्हता . हे सारे दुख काळे परिवाराने पचविले . पत्नी रंजनाबाई हा दुख वेदनांचा डोंगर अंतःकरणात साठवून आयुष्याचा एक एक दिवस जगत आहेत .
वाढदिवसाचे स्वप्न अधुरे
आपल्या कन्येचा पहिला वाढदिवस लष्कराच्या छावणीत साजरा करण्यासाठी रंजनाला ते बरोबर घेऊन जाणार होते . पण त्यापुर्वीच नानासाहेब शहीद झाले . त्यामुळे एकुलत्या एक मुलीचा पहिला वाढदिवस साजरा करण्याचे नानासाहेबांचे स्वप्न अधुरे राहिले .
शब्दांकन : संजय काटे, सकाळ
(स्रोत:अग्निपंख फौंडेशन)
