बलुतं…
सारी लग्नाची कॅश . झालं . तो डोक्यात राख घालून दिसेनासा झाला . साऱ्या वऱ्हाडात खळबळ . मघाशी हसणारी माणसं आता माझ्या शोधात . सदाशिव मला एका घरातील पलंगाखाली लपवतो . अर्थात रात्रीच त्याचा शोध जारी होतो . त्याची समजूत काढून त्याला पुन्हा आणलं जातं . सकाळ होते , तेव्हा वऱ्हाडातील बायका मला पाहायला झुंडीनं येतात . ” काय बाई , पोरगा ! ” रात्री सर्वांच्या तोंडचं पाणी पळवलेलं . राणीच्या बागेतलं एखादं जनावर पाहावं , तसं मला पाहत होते .
पुढल्या आयुष्यात सार्वजनिक जीवनातही अशीच प्रवृत्ती उसळी मारून वर यायची . आत , खोल खोल मनात हा विद्रोह दडून बसलेला . दादासाहेब मंत्री झाले तेव्हाची गोष्ट . वर्तमानपत्रात त्यांचं नाव मी वाचलं , आणि साध्या पोस्टकार्डावर त्यांना मजकूर लिहिला : ‘ आजवर दलितांचे जे मंत्री झालेत , ते सारे भ्रष्ट आणि बदनाम झालेले . ह्या मंत्र्यांचा चेहरा पुसून तळागाळासंबंधी कणव असलेला नवा मंत्री तुम्हाला उभा करावा लागेल ! ‘ अर्थात हा छोट्या तोंडी मोठा घास होता . दादासाहेब अनेकदा भेटले ; पण ह्या पत्राची गोष्ट काढली नाही . त्यांच्या पी.ए.कडून पत्र पोहोचल्याचं पत्र फक्त आलं होतं , तेही सायक्लोस्टाइल . असाच एकदा त्यांच्या वाढदिवसाला मलबार हिलवरच्या बंगल्यावर गेलेलो . वाढदिवसाला खूपच गर्दी . लॉनवर रोषणाई केलेली . चित्रपटसृष्टीतील काही मंडळी आलेली . मी जुने ऋणानुबंध म्हणून बंगल्यावर गेलेलो . त्यांचं माझ्याकडे लक्ष जातं . सभेत मी बोलावं , असं अभंग त्यांना सुचवतात . माझी बोलायची पाळी येते , तेव्हा माझ्या तोंडाला कोरड पडते . शेवटी मनात होतं ते बोलून गेलो . ” दादासाहेबांना मी चळवळीत , मोर्चात , सभेत पहिलेलं . त्यांना मंत्रिपदाच्या खुर्चीवर बसलेलं मी पाहावं , ही बावच मला समजू शकत नाही . आजही हे त्यांचं नवं रूप माझं मन मान्यच करीत नाही . आजही मी त्यांच्यावर जे प्रेम करतो आहे , ते चळवळीतल्या दादासाहेबांवर – की ज्यांनी आम्हाला विद्रोह शिकवला . आंबेडकरांनी चळवळीची दाहकता दाखवली . ” एवढं बोलून जेव्हा मी खाली बसतो , तेव्हा मला थकवा आलेला . आपण इथं उगाच आलो , असंही वाटत राहतं . दादासाहेब हे खरेच थोर . त्यांनी त्या दिवशी सर्वांसमक्ष माझी स्तुतीच केली . मंत्र्यांच्या तोंडासमोर मी हे जे धाडस दाखविलं , त्याबद्दल त्यांनी गौरवाचे उद्गार काढले . अलिकडे त्यांच्या वाढदिवसाच्या वेळी बंगल्यावर गेलो , त्याच वेळी त्यांचं मंत्रिपद गेललं . नेहमीची जत्रा नव्हती . वातावरण उदास . सुगी संपल्यावर पाखरं उडून जावीत तसं वाटलं .
त्यांनी आयुष्याच्या पडत्या काळात दिलेला मायेचा हात मी विसरू शकत नाही . त्यांच्या राजकारणाला माझा फारसा उपयोग झाला नाही . तो माझा पिंडही नाही . पण त्यांनीच एके काळी दिलेली जीवनाची मूल्यं मला प्राणापलीकडे जपावीशी वाटतात . आपण स्वतःशी प्रतारणा करू नये , असा आतला आवाज आक्रोशून सांगत असतो .एखाद्या वेळेस , कुणी सांगावं , हा आपला वेडेपणाही असेल . पण आजही ही लढाई मनात सतत चाललेली . ते तर एक – दोनदा जाहीरही बोलले , ” हा आपल्यापासून नेहमीच फटकून राहतो . त्यानं जवळ यावं , रेशमाच्या गाठी बांधाव्यात . ” मुंबईत अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी हौसिंग बोर्डाचे फ्लॅट घेऊन दिले . पण आपल्याला हा मोह झाला नाही .
फायनलचा रिझल्ट लागतो . मी चांगल्या मार्कानी पास झालेला असतो . पण पुढं काय करावं , ह्या बावतीत अंधार असतो . पुढं शिकावं असं मनोमन वाटत असतं . फायनल झाल्यावर थोडासा प्रयत्न केला असता तर सहज शाळामास्तर होता आलं असतं , पण उभी जिंदगी खेड्यात सडावी असं वाटत नव्हतं . त्यात खेडं हे असं . जातीयतेच्या विंचू – इंगळ्यांचं पेव . आयुष्यभर मनस्ताप व्हायचा . ह्यातून बाहेर पडायचं तर शिकायला हवं . ह्याच दरम्यान ‘ शेजारच्या तालुक्यात दलित विद्यार्थ्यांचं वसतिगृह आहे ‘ ही बातमी समजते . संचालक दादासाहेब असतात . मी अर्ज लिहितो . तालुक्यात दादासाहेबांची सभा असते . सभेनंतर त्यांच्या हाती अर्ज देतो . सुट्टी संपताच मला वसतिगृहात चाचणीसाठी बोलावतात . चाचणीला मी जातो . तेव्हा माझ्या डोक्यावर गांधीटोपी असते . आत एका खोलीत संस्थेचे पदाधिकारी आलेले असतात . मला माझी जात विचारतात . मी अर्जातही हरिजन असंच लिहिलेलं असतं . मी तेच सांगतो . मी ‘ हरिजन ‘ म्हटल्यामुळे सारेच माझ्याकडे संशयानं पाहतात . कुणी तरी सांगतं , की ” हरिजन नाही म्हणायचं , ‘ महार ‘ म्हणायचं . हरिजन ही गांधींनी आपल्याला दिलेली शिवी आहे . ” माझं डोकं चक्रावतं . आजवर माझा कोळी वसतिगृहात किंवा गावच्या मराठी शाळेत अनुभव होता , की महार सांगितलं , तर सवर्ण शिक्षक म्हणायचे , ” हरिजन म्हण ! ” आणि आता ही मंडळी ‘ महार ‘ म्हणावयास सांगतात . मी माझी व्यथा पदाधिकाऱ्यांना सांगतो . माझा चुणचुणीतपणा पाहून तीही मंडळी खूश झालेली दिसली . मला एक पेटी , ताट , तांब्या आणि स्वत : चा बिछाना आणण्याची सूचना दिली जाते . पुन्हा माझं मन चेंडूसारखं उडी घेतं .
संगमनेर – पुणे रोडवर हे वसतिगृह होतं . नदी ओलांडून पलीकडं जावं लागे . संगमनेरचाच हा भाग . ह्याला “ धाकटं संगमनेर ” असं म्हणतात . दलितांच्या मुलांकरता वसतिगृहासाठी एखादा सवर्ण इमारत कोठून देणार ? ह्या वसतिगृहाची इमारत एका मुसलमानाच्या मालकीची . इमारतीच्या पाठीमागच्या भागात मुसलमान मालक आपल्या कुटुंबियांसमवेत राही . पुढील इमारतीत वसतिगृह . एक मोठा हॉल . त्यात भिंतीच्या कडेला सर्वांच्या पत्र्याच्या पेट्या , तिथंच आथरूण – पांघरूण . शेजारीच एक पत्र्याची शेड . तिथंच भोजनगृह . वसतिगृहाच्या पाठीमागं विहीर . जेवणाच्या वेळी ताट – तांब्या घासण्यासाठी मुलांची तिथं झुंबड उडे . तोच तांब्या आम्ही संडासासाठी वापरत असू . वसतिगृहाला सरकारी अनुदान मिळे . त्यातून मुलांची राहण्याची , जेवणाची मोफत सोय होई . बाकी आम्ही गावच्या मोठ्या शाळेत जात असू . गोखले एज्युकेशन सोसायटीचं गावात भव्य असं पेटिट विद्यालय . खिश्चन मंडळींचंही गावाबाहेर एक हायस्कूल होतं . पण एक – दोन विद्यार्थी सोडले , तर तिथं कुणी प्रवेश घ्यायचे नाहीत .
वसतिगृहात बहुसंख्य विद्यार्थी महार . अपवादाला काही चांभार , मांग , महादेव कोळी . पटावर ५०-६० तरी विद्यार्थी असावेत . संस्थेचे मुंबईतील कार्यकर्ते संस्था जगविण्यसाठी जिवाचं रान करीत . सुरुवातीला ग्रँट नव्हती , तर अनेकांनी आपल्या बायकांच्या अंगावरचे दागिने गहाण ठेवून मुलांना चंदी पुरवली . त्यांच्या त्यागाच्या गोष्टी अनेकदा कानांवरून गेलेल्या . संस्थेचं हे पहिलंच वसतिगृह . संस्थेची चालक मंडळी भाऊराव पाटलांचा आदर्श उरी जपत . संस्थेचं जाळं काही वर्षांतच जिल्हाभर पसरलेलं . पंधरा – वीस वसतिगृह जिल्ह्यात काढलेली . त्यांची नावंही क्रांतिप्रवण . श्रीरामपुरात शंबूक वसतिगृह , तर अगस्तीच्या गावात रमा – यशोधरा . आमच्या वसतिगृहाचे नाव सिद्धार्थ . हया नावापाठीमागं दादासाहेबांच्या प्रेरणा . अर्थात राजकारणापेक्षा दादासाहेबांचं हेच खर तळातलं काम . संस्थेचं बजेट लवकरच एक लाखापर्यंत गेलं म्हणतात .
दलितांतील जातीयतेच्या चिरफळ्या इथंच प्रथम ध्यानात आल्या . महार विद्यार्थ्यांचा वसतिगृहात तसा दबदबा . बाकीच्या जातीतली मुलं दबकून वागंत . कोळ्यांच्या वसतिगृहात असलेली तीन – चार मुलं पुढं इथं आली . तिथं ती दादा होती . पण इथं मात्र बिल्ली मांजरं होऊन राहिलेली . जेवणाच्या हॉलमध्ये सारी एकत्र बसत असू , तरी बाकीच्या व्यवहारात ज्याच्या त्याच्या जातीचं कोंडाळं असायचं .
हायस्कूलमधील पहिला दिवस आठवतोय . एवढ्या मोठ्या भव्य इमारतीत प्रथमच शिक्षण घेत होतो . शाळा तशी नावाजलेली . शिक्षकही ध्येयवादी . जीवनाला वेगवेगळे धुमारे फुटले ते ह्याच शाळेत . शाळेतील शिक्षकांचा जीवनावर खोलवर परिणाम होत होता . प्रत्येक तासाला शिक्षक बदलायचे . ह्यातही गंमत वाटायची . आठवीला आम्हाला इंग्रजी सुरू झालं . साहेबांची भाषा मात्र खूपच दमछाक करायची . इंग्रजीसाठी ब्राह्मण मास्तर होते . गोरेपान , दणकट शरीर . धोतर , पैरण , गांधीटोपी घालायचे . कपाळावर गंध . भलतेच कडक , पण प्रेमळ . आम्ही खेड्यातून आलेलो . त्यामुळं इंग्रजी उच्चार जमायचे नाहीत . तोंडात पेन्सिल घालून ते आम्हाला उच्चार शिकवीत ; आठवीत जो मी इंग्रजीचा धसका घेतला , तो एस.एस.सी. होईपर्यंत . बाकीचे विषय म्हणजे हातचा मळ वाटायचा .
बोर्डिंगच्या मुलांत आणि माझ्यात एक महत्त्वाचा फरक होता . ही मुलं गावच्या मुलांत विशेष मिसळत नसत . आपलेच वेगळे कळप करून वर्गात बसत . मी मात्र हमखास बाकीच्या सवर्ण मुलांत मिसळत असे . बोर्डिंगची मुलं ज्या तुकडीत असत ,तिथं मी प्रवेश घेतला नव्हता . आमची तुकडी आघाडीवरची . पहिल्या पाच – दहात येणारी मुलं माझ्याच तुकडीत . भगत आणि भरीतकर ह्या मुलांचा कुणी हात धरायचं नाही . अभ्यासात ही विशेष हुशार . हे त्या वेळचे माझे मित्र . असाच शिंप्याचा खांबेकर आठवतोय . याचा माझ्यावर विलक्षण जीव . ही मुलं तशी श्रीमंत घराण्यातली . त्यांचे कपडेही झकपक इस्त्रीचे . मी त्यांच्यापेक्षा पेहेरावात खूपच बावळट असायचो . पण माझा लाघवीपणा , बडबडण्याची सवय , ह्यामुळे ती मुलं मला अंतर देत नसत .
माझ्या नाटकाच्या वेडाचीही गंमत आहे . लहानपणी वाटायचं , आपण तमासगीर व्हावं . तर हायस्कुलात नाटकानं कमालीचं वेड लावलेलं . नाटकापायी अभ्यासाचं मातरं केलेलं . आपण नट व्हावं , असं स्वप्न तरळून जायचं . हायस्कूलमध्ये सुरुवातीला नाटकात कोण प्रवेश देणार ? आजवर कधी बोर्डिंगच्या मुलांना ही संधी दिली गेली नव्हती . शाळेत कुठला तरी मोठा समारंभ होता . शाळेतील मुलामुलींचा भरगच्च कार्यक्रम . विविध कार्यक्रम . काही नाटकांचे प्रयोग बसविलेले . स्टेजपुढील विद्यार्थ्यांच्या गर्दीत मीही एक प्रेक्षक . अशा वेळी मूळच्या स्वभावानं उचल खाल्ली . नवीन प्रवेश होण्यापूर्वी मध्ये काही वेळ रिकामा होता . मी ओळखीच्या कातकर सरांना जाऊन भेटलो . छोटासा कार्यक्रम करण्याची परवानगी मागितली . ते माझ्याकडे क्षणभर पाहत राहिले . मी बोर्डिंगचा विद्यार्थी आहे हे त्यांनी ओळखलं . त्यांनी परवानगी दिली . त्यापूर्वी मराठी शाळेत केलेल्या कार्यक्रमाचे नाटकातील काही तुकडे पाठ असतात . मी स्टेजवर निर्भयतेनं जाऊन एकपात्री प्रयोग करतो . ‘ एकच प्याला ‘ नाटकातील सुधाकराचा “ ह्या रिकाम्या प्याल्यात काय दिसतंय तुला ? ” हा परिच्छेद खड्या सुरात म्हणतो . परिच्छेद संपतो , तेव्हा टाळ्यांचा कडकडाट होतो . पुढं एक – दोन दिवस मी पिसासारखा तरंगत असतो . आपल्यातील सुप्त शक्तीची जाणीव झालेली असते . शाळेतही आता माझा भाव वधारलेला . ह्या कार्यक्रमानंतर मला पुढील नाटकांतून महत्त्वाचा रोल दिला जातो . दिलेली प्रत्येक भूमिका मी जीव ओतून करत असतो . त्या काळी दिवाकरांची नाट्यछटा अभ्यासाच्या पुस्तकात असायची . अशीच एकदा एस.एस.सी.च्या पुस्तकातून ‘ तेवढंच ज्ञानप्रकाशात ‘ ही नाट्यछटा मी पाठ केलेली . मी तेव्हा खालच्या वर्गात होतो . एस.एस.सी.च्या मुलांपुढे माझा ह्या नाट्यछटेचा प्रात्यक्षिकासहित पाठ झालेला .
त्यावेळी शिरवाडकरांचं ‘ बाजीराव आणि मस्तानी ‘ हे नाटक मी वाचलेलं . ह्यातील अफलातून प्रेमविषय आणि नाटकाची भाषा ह्यांनी मी कमालीचा प्रभावित झालेलो . हे नाटक शाळेच्या गॅदरिंगसाठी निवडावं , ही माझी कल्पना . मी नाटकाचं पुस्तक घेतलं आणि सरळ प्रिन्सिपॉलची भेट घेतली . शाळेचे प्रिन्सिपॉल तेव्हा उपासनी होते . गोरेपान , शिडशिडीत बांध्याचे . रस्त्यानं चालायचे , तरी मिलिटरी स्टाइलनं . वळणावर
क्रमशः
(स्रोत:दया पवार यांच्या बलुतं या पुस्तकातुन)
