श्रीगोंद्यातील या दुर्दैवी घटनेकडे पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष..?

दिनांक २९ जून २०२४, श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथे विहीर खोदकाम करताना झालेल्या जिलेटिनच्या स्फोटात तीन जण घटनास्थळी मृत्युमुखी पडले आणि एक जण दोन दिवसांपूर्वी उपचारादरम्यान मृत्यू पावला.

या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेले सर्वजण आपल्या कुटुंबाचे प्रमुख होते. काहींना लहान मुलं आणि वयोवृद्ध आई-वडिलांची जबाबदारी होती. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबाचा आधारस्तंभ हरवल्याचे पिडीतांनी नमूद केले आहे.

घटना होऊन आज पंधरा दिवस झाले आहेत तरीही जिल्ह्याचे पालकत्व असलेले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे घटनास्थळी किंवा कुटुंबाच्या सांत्वनासाठी आले नाहीत. तसेच जिल्हाधिकारी सिद्धाराम सालेमठ, हे जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेचे प्रमुख, देखील पीडित कुटुंबांना भेटण्यासाठी किंवा घटनास्थळी भेट देण्यासाठी आले नसल्याचे पिडीतांनी सांगितले आहे.

पंधरा दिवसात आमदार व खासदारांनी आम्हाला भेटून सांत्वन केले, मात्र कुटुंबाच्या पुनर्वसनासह मदतीसाठी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नसल्याचे कुटुंबाने खेदाने नमूद केले आहे.

सदरील दुर्घटना नैसर्गिक आपत्तीमध्ये मोडत नसल्याने, मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळणे कठीण आहे. शिवाय मुख्यमंत्री सहायता निधी मिळण्यासही अडचणी दिसत आहेत, असे स्पष्ट होत आहे. विहिरीवर खोदकाम करणाऱ्या या लोकांचे मजूर किंवा कामगार म्हणून नोंदणी नसल्याने, त्यांना दुर्घटनेमध्ये कामगार कल्याण आयुक्तांकडून मिळणारी मदतही मिळू शकलेली नाही.

आज टाकळी कडेवळीत दुर्घटनेत बळी पडलेल्या लोकांच्या कुटुंबीयांना भेटून याबाबत विचारणा केली असता, त्यांनी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी साधी विचारपूसही केले नसल्याने संताप व्यक्त केला आहे. अनेकांकडून सांत्वन करण्यात आले मात्र, कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळालेली नाही. घटनेतील अत्यावस्थ स्थितीत उपचार घेत असलेला इसम दोन दिवसांपूर्वी उपचारासाठी पैसे न मिळाल्यामुळे मृत झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या घटनेला जबाबदार असणाऱ्या व्यक्तींसह इतर चार लोकांवर गुन्हे दाखल करावेत, श्रीगोंदा तालुका आणि परिसरात वापरण्यात येणारे जिलेटिन स्फोटकाचा मुख्य विक्रेत्याची चौकशी करण्यात यावी, पिडीत कुटुंबांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळावी व दुर्घटनेत मृत झालेल्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळून त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे, अशा विविध मागण्यांच्या संदर्भात लवकरच श्रीगोंदा तहसील कार्यालयाच्या दालनात आंदोलन करण्यात येणार असल्याचे मयत कुटुंबातील लोकांनी माध्यमांना दिलेल्या माहितीत सांगितले आहे.

स्रोत:(मिळालेल्या माहितीनुसार)

जाहिरात..

Leave a Reply