दिनांक ७ डिसेंबर,श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यामध्ये बिबट्या फिरत असल्याचे नागरिकांमध्ये सांगण्यात येत होते. यात वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तपास केला असता, हा बिबट्या नसून बिबट्या सारखा दिसणारा तरस हा प्राणी असल्याचे तपासाअंती समोर आले आहे. मागील दोन दिवसांपासून श्रीगोंदा मांडवगण रोड वरील आळेकर मळा जो शहरापासून अगदी जवळ आहे. तेथे बिबट्या दिसल्याची चर्चा सामाजिक माध्यमातून सर्वत्र चालू होती. मात्र, या पाऊलखुणा बिबट्याच्या नसून, तरसाच्या असल्याचे वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या तपासातून समोर आले आहे.

सविस्तर माहिती अशी की, बिबट्या हा मनुष्यावर किंवा जनावरांच्या मानेवर झडप मारून जखम करतो. त्याच्या पाऊलखुणा ह्या चौकोनी असतात. तसेच श्रीगोंदा तालुक्याच्या शेजारील तालुक्यांमध्ये उदाहरणार्थ कर्जत, जामखेड, बीड जिल्हा परिसरात जास्त प्रमाणात बिबट्याने मनुष्यावर किंवा जनावरांवर हल्ला केला आहे. त्याच्यामुळे श्रीगोंदा तालुक्यात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. रात्री श्रीगोंदा शहरांमधील मांडवगणरोड हॉटेल नंदनवन लगत ११ नंबर चारी आहे. त्या चारीच्या पुलावरून सात वाजनेच्या सुमारास ऐका ट्रक ड्रायव्हरने श्रीगोंद्याच्या दिशेने जात असताना त्याला बिबट्याचे दर्शन झाल्यासारखे वाटले. त्याने लगेच त्या ठिकानच्या संदीप आळेकर आणि पत्रकार नितीन रोही यांना कल्पना दिली. यावेळी वनविभागाला कळविण्यात आले.
घटनास्थळी वनविभागाचे अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर त्यांना रात्री तसे आढळून आले नाही. मात्र, आज दिनांक ७ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता वन विभागाचे अधिकारी विठ्ठल घालमे, संभाजी शिंदे यांनी येऊन पाहणी केली असता, बिबट्याचे ठसे नसून, तरसाच्या पायाचे ठसे असल्याचे निदर्शनास आले. विठ्ठल घालमे (वन परिमंडळ अधिकारी प्रादेशिक श्रीगोंदा), संभाजी शिंदे (वन कर्मचारी) यांनी पाहणी केल्यानंतर श्रीगोंदा तालुक्यामधील जनतेला घाबरून जाऊ नये, रात्री – अपरात्री घराबाहेर फिरू नये, आपल्या घरच्या व्यक्तींची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
याठिकाणी पत्रकार, प्रहारचे अध्यक्ष नितीन रोही, डॉक्टर विलास आळेकर, संदीप आळेकर, पोपत आळेकर, नितीन दांडेकर यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सहकार्य केले आहे.
सर्वत्र पाहणी व परिसर निरीक्षण केल्यानंतर एका शेतकऱ्याच्या उसात दोन रान मांजरही आढळून आल्याचे विठ्ठल घालमे वन परिमंडळ अधिकारी यांनी माध्यमांना सांगितले आहे.
स्रोत:(वनविभाग अधिकारी व स्थानिक)
