कळा, उत्तम बंडू तुपे..
भगभगीत उन्हात झाडं नवतीनं फुलली हुती . अंब्यांच्या पानांत बारक्या कवळ्या कैऱ्या दिसत हुत्या . गावगना जत्रा ; कुठं लग्नकार्व्य हुतेली . कुणाच्या वस्तीवर पिकरची गाणी ; तर कुणाच्या वस्तीवर वरातीचं बाँड वाजत हुतं . या सगळ्यांचं अवाज कान पोडत हुतं . धनदौलतीची खैरात करून लेकीचं बाप उरावरचं ओझं उतरून मोकळं हुतेलं . बाजारात बैलं उभी केल्यागत कुठं कुठं लेकांच्या बापांनी आपल्याच मासाच्या गोळ्यांचं सौदं चालवलं हुतं .
ज्याचा सौदा मोडत हुता ; ते लग्नाला आलेलं पोरगं मनात असून नसल्यागत मन मोडून गेल्यागत वागत हुतं . केली तर तीच बायको करीन म्हणून काय बाय बेरकी पोरं . बापाबरं हुजत घालत हुती . हुंड्यासाठी तटलेलं बाप आपल्याच लग्नाला आलेल्या पोराला धमकावत हुतं . हे सगळं बघून माझा उर हादरत हुता . मंगलचं ध्यान होत हुतं . मंगलनं केलं ते बरंच केलं . ही हुंड्याची ; वर ववाळणीची रूढी आपल्याला परवडण्याजोगी नव्हती . नवरीमुलगी मनाजोगी आसूनबी नवरामुलगा बापाचा हेका मोडायला धजत नव्हता ; नि हेकेखोर बाप हुंड्याच्या रकमंसाठी लग्न मोडीत काढून दुसऱ्या कुबेराचं घर बघत हुतं . या सगळ्यालाच मन किटलं हुतं . रुपयं , सोण्यांच्या जाळ्यात नीती गुतली हुती . येवार मरून गेलं हुतं . पोरं जतायची ; जगवायची त्यांच्यासाठी केलेला खर्च त्यांच्याच लग्नकार्यात वसूल करायचं . हे सगळं बघून यो जलम नको नको वाटायचा . यापेक्षा गुराढोरांचं बरं . कसंबी मोठी हुत्यात . वाफालली की फळत्यात . नि व्यात्यातबी , त्यासनी कुणी नाव ठिवत न्हाय . त्यासनी वाचा आसती तर तेबी बोलली आसती . त्यांच्यातबी कुळीढाळी वरनं फरक पडला आसता .
त्यांसनी वाचा न्हाय हे एक बरं हाय वाटायचं नि डोळ्यांपुढं मंगल आन् दुर्व्याची लग्नं उभी रायाची . मंगलचा तपास लागत नव्हता . सा महिन्यांत सिरपत गावात आल्याचं कळत नव्हतं . सिरपत भेटला तर त्याला सांगितलं आसतं – सुखानं नांदा ! पर त्याचाबी मोड झाल्यागत झालेलं . जखमेवरची ढपली काढल्यागत चव्हान आदनमधनं डिवचत हुता . कवा सरळ ; तर कवा घालून पाडून बोलत हुता . कवा कवा धमक्याबी देत हुता . त्याचा बांध तर कवाच सुटला हुता .

त्याच्या बांधाला जायाचं नाक नव्हतं . ह्या दिसाला त्याच्या बांधाला गेल्याशिवट काय भागत नव्हतं . गावातला मात्तबर शेतकरी तेवढाच ; बारा महिनं अठरा काळ त्यांच्यांत रोजगार हुता . आता आपूनच खमतं घ्यावं ; त्याचं पाय धरावं . झालं गेलं सोडून त्याच्या मळ्यात पुन्हींदा जावं ; वाटायला लागलं हुतं . मंगलची भानगड कुणाला तरी मधी घालून मिटवायचंबी मनात हुतं . त्याच्याजवळ बळ हुतं . मी दुबळा ; चारी बाजूनं उघडा पडलेलो . नारायण चव्हाणाची समजूत काढायला बघत हुतो .
जिथं भेटल तिथं त्याला रामराम घालत हुतो . त्याचं त्वांड मातर मठ ; काय केल्या उघडत नव्हतं . सगळी कामं सरली हुती . घरातरी बसवतंय व्हय ? उभं वारं सुटलेलं . सगळी रानं उघडी झाली हुती . भकास , भकास ; कसणूसं वाटत हुतं . गावाची दिशाबी पार बदलली हुती . गावातली दांडगी झाडं कुठं दिसत नव्हती . न्हाय म्हणायला परसुबाचा अंबा तेवढा सडकच्या कडंला उभा हुता .
म्हाताऱ्यागत तेवढाच एक गावाची वाट दाखवायला उभा राहिल्यागत . अंब्याच्या सावलीत बसलो हुतो . लांब तिकडं चव्हाणाच्या मळ्याची वाट जितावली हुती . खुद नारायण चव्हाण गावाकडं येत हुता . नारायण चव्हाण पार जवळ आला . शंकराच्या पिंढीला मिठी मारल्यागत नारायण चव्हाणाचं पाय धरलं . त्यानंबी खिनभर पाय धरू दिलं . “ नारायण मालक ! काय चूक झाली ती पदरात घाला . ” “ सत्या ! ही चूक नव्हं , घोडचूक ; माझ्या भावाचा तपास न्हाय . शाळंतलं पोरगं फितवून नेलं तुझ्या माजावर आलेल्या पोरीनं .
आमचं घर बुडलं . ‘ ” मालक ! माझं तर घर जळलं . लोची पोरीच्या पायांत खुळी झाली . त्या खुळ्या लोचीला तुमीबी घोळसली ; भोगली . ते सगळं इसरून म्या पाय धरलेत . ‘“ हो बाजूला , ” म्हणून नारायण चव्हाणानं थोबाडावर लाथ हाणली . तसा धुरोळ्यात उताणा पडलो . मूठभर उडालेला धुरोळा अंगावर पडला नि नारायण चव्हाणानं धुक्याची गुळणी टाकून निघून गेला . म्हणत्यात – शरण आलं त्याला मरण देवू न्हाय . पर नारायण चव्हाण आजून डुक धरून हुता . त्याच्या डोळ्यांवर दौलतीचा धूर हुता . त्यानं न्हाय ; त्याच्या दौलतीनं मला लाथ हाणली हुती . चिमटीत घावल्यागत जीव तळमळला . तसाच उठलो ; धुरोळा झाडून टाकला . काय घडलं न्हाय ; आसंच समजून पुढे निघालो . उन्हानं चुना झालेला धुरोळा पायाला चटकं देत हुता . देही हांडीत घातल्यागत झालेलं ; नि पाय नेतील तिकडं निघालो हुतो . डोळ्यांपुढं दुर्व्या सारखा उभा रहात हुता . पोराला बघायला मन धावत हुतं . लोचीलाबी बघावं वाटत हुतं . तिला खूळ लागलंय ; यडी झाली ; तरी तीच मला पायजी हुती . वांगं , बटाटं थोडं नासलं म्हणून कुणी टाकून देत न्हाय . नासका भाग कापून टाकत्यात . उरलेल्या चांगल्या भागाचा कोरड्यासाठी उपेग व्हतू ; हे कुणाला सांगायला लागत न्हाय . भाजी नासली म्हणताना सगळीच कुणी टाकूण देत न्हाय ; लोची तर माणूस हाय . जिवात जीव घालून जल्माची पंधरा – सोळा वर्स एका जिवानं नांदलो . जिवात जीव घालून सुख – दु : खं पचवली . आता खुळी झाली- म्हणताना तिला कसं टाकायचं ? दोन पोरं दिलीत तिनं . माझ्यातनं उगवलेली- दोन माणसं ! लोची कसी आसंल ? तिला कोण बघत आसंल ? का फिरत आसंल बिनवार्शी कुत्रीगत ? नारायण चव्हाणागत तिकडंबी कुणी भुकेला राकिस तिचा भोग घेत असंल का ?

वाट चालत हुतो ; नको तेच मनात येत हुतं . चालतच कवा दहीवडीच्या नव्या एस.टी. टाँडावर आलो . तवा उन्हाचा रक झाला हुता . एक गाय खूळ लागल्यागत नुसती पळत हुती . तिच्या मागनं पाच – सा खोंडं – एकमेकाला धडका हाणत ; टकरा देत पळत हुती . बघून मन उदसंत हुतं . एस.टी.वरच्या माणसालाबी माझी घाण वाटत आसल्यान जवळची माणसं उठून जात हुती . “ ए , तिकडं बसं ‘ – म्हणून दटावत हुती . थोबाड हाणल्यागत उठून दुसऱ्या जाग्यावर बसत हुतो . कुत्रं दिकून जवळ उभं राहचाचं न्हाय आसी देहीची कळा झालेली . देवाची वाट बघत बसल्यागत एस.टी.ची वाट बघत हुतो . वाट बघून कंटाळा आल्यावर एस.टी. आली . माणसांची नुसती झुंबड पडली . त्यातनं वाट काढून आत गेलो ; तवा वाईच बरं वाटायला लागलं . आता एस.टी. हालावी ; लवकर जावं ; दुर्व्याला भेटावं ; लोचीला मिठी मारावी आसं मनात यावू लागलं..
क्रमशः
स्रोत:(उत्तम बंडू तुपे यांच्या कळा कादंबरीतुन)
