सचिवांना ‘प्याऱ्या’ संस्था सोडवेना : मढेवडगाव व विसापूरच्या सेवा संस्थातील सचिवांनी धुडकावले बदलीचे आदेश.

दिनांक ७ डिसेंबर(मढेवडगाव,श्रीगोंदा):

मढेवडगाव व विसापूर विविध कार्यकारी सेवा संस्थेतील सचिवांची जिल्हास्तरीय समितीने दोन महिन्यांपूर्वी बदल्या करून नवीन नियुक्तीचे ठिकाणही दिले होते. परंतु, जुन्या संचालक मंडळाबरोबर स्नेहबंध निर्माण झाल्याने मूळ ठिकाणच्या खुर्ची त्यांना सोडवत नाही.

https://bit.ly/bspmycityshrigonda

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दोन महिन्यांपूर्वी मढेवडगाव व खामकरवाडी सेवा संस्थेचे सचिव आर. पी. अढागळे यांची बदली बेलवंडी कोठार सेवा संस्थेत झाली आहे. तर, विसापूर व कोरेगव्हाण सेवा संस्थेचे सचिव एस.बी पवार यांची बदली मढेवडगाव व खामकरवाडी विविध कार्यकारी सेवा संस्थेत झाली आहे. या दोन्ही सचिवांनी बदलीचे आदेश येऊनही बदलीची देवाण-घेवाण न करता वेगवेगळी कारणे दाखवत, बदलीच्या आदेशाला केराची टोपली दाखवलीआहे.

जुन्या ठिकाणी संचालक मंडळ व त्यांच्यात मैत्रीचे संबंध तयार झाल्याने बदलीच्या आदेशाचा अवमान करून खुर्चीला घट्ट चिकटून बसले आहेत. जुन्या संस्थेतून पाय काढायला तयार नसल्याने, या सचिवांना जिल्हास्तरीय समिती अहमदनगर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावून दिनांक १० रोजी कार्यालयात उपस्थित राहून खुलासा मागितला आहे. तर, गैरहजर राहिल्यास निलंबनाची कारवाई करण्यात येईल अशी नोटीस बजावली आहे.

मढेवडगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेतील सचिव आर. पी. आढागळे यांच्यावर काही सभासदांनी वर्ग-३ देवस्थान जमिनींवर बोगस कर्ज, खोट्या ग्रामपंचायत उताऱ्यावर गृहकर्ज, थकबाकीत असतानाही मर्जीतील संचालक व सभासदांना कर्ज वाटप, सभासदांवर ऍट्रासीटी गुन्हा दाखल करन्याच्या धमक्या देणे, परस्पर व्याज माफ करणे व अनियमित कारभार केल्याचे गंभीर आरोप केलेले आहेत. याबाबत या तक्रारदार सभासदांनी वेळोवेळी जिल्हा सहकार निबंधक, तालुका सहकार सहाय्यक निबंधक यांच्याकडे पुरावे देऊन संचालक व सचिवाची चौकशी करून कारवाईची मागणी केलेली असून, या सचिवाच्या गैरकारभार व बदलीसाठी उपोषणेही केली आहेत. पण मागील प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी बदली होऊनही सचिव जागा सोडण्यास तयार नाही.

स्रोत:(पत्रकार विजय उंडे)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading