कळा, उत्तम बंडू तुपे.(भाग २२).

कळा, उत्तम बंडू तुपे..

मन मेलं हुतं . घराचं घरपन हारपलेलं ; म्हणताना घराकडं तोंड करावं आसं वाटत नव्हतं . कष्टात मन गुंतवत हुतो . रोजागांत बसलं की तेवढ्यापुरतं मन इगरत हुतं . मनाला पडलेली सांद बुजत हुती . फाटलेलं हुर्दबी शिवल्यागत वाटत हुतं . दिवसंतभर माणसांत करमून जायाचं . पर सांज झाली की जीव धगीवर धरल्यागत वाटायचं . गाव , घर नको – नको वाटायचं . दुर्व्या डोळ्यापुढं ; लोची , मंगल मनात उभ्या राह्याच्या .

https://bit.ly/bspmycityshrigonda

नको वाटलं तरी पाऊलं घराकडं निघायची . घराची झाकलेली दारं उघडली की आतला आंधळा अंधार बघून पोटात घाबरा पडायचा ; तरी तसाच दिवा जाळायचो . चूल पेटवून पोटातली आग विझवायचो . तवा हुदयाची नुसती भगभग उठायची . एकटाच कोंडवाड्यातल्या गुरागत धडपडायचं . कवा झोप आली तर खाली भुईवर अंग टाकायचं ; न्हायतर तसंच भवतीची भिताडं डोळ्यांत भरवून बसायचं . आता भिताडंबी आतनं उखणली हुती . गावातल्या उंदरांनी घरात येवून वस्ती केलेली . रातभर त्यांचा सुळसुळाट .

त्यांच्या शिकारीसाठी गावातली मांजरं रातभर घरावर बसूयची , नाचायची , पळायची . मांजरा – उंदरांनी घरावरचं शेकरान पार खुर्दूळून टाकलेलं . कुठं कुठं वासं उघडं पडलेलं . तरी त्याच्या निवाऱ्यानं जगत हुतो . हुती चार भांडी . तीबी हिरवीगार पडली हुती . घरात बयामाणूसअसल्याबगार काय खरं न्हाय . बापयला भांड्यांतलं गुपित कवा कळलं न्हाय . ज्या वक्ताला बापयला भांडी दिसत्यात ; तवा बायमाणसांची याद हुती . जिवाचं भाड हुतं . खसाखसा घासून घ्यावसं वाटतं . लखलखीत घासलेलं भांडं डोळंभर बघावसं वाटतं . भुईसरा घिटलेल्या भिंती सारवलेल्या बघून भुईवर अंग टाकावसं वाटतं . बायमाणसाविना कायबी निर्मळ व्हत न्हाय .

घरबी आनखी ही देहीबी . घर नको वाटलं की दारात बसायचो . वर अभाळातलं तारांगण डोळ्यांत उतरायचं . अंगावर काळोख घेऊन वरच्या चांदण्यांचा उजेड बघायचा . लांब लांब वर अभाळात चांदण्या लुकलुकायच्या . तवा आत ; आतलं हुर्द धुकूधुकू जळायचं . डोळं फुलायचं . देहीला वणवा लागल्यागत वाटायचं . दिवस उगवला की रातभर जळलेल्या देहीचा कोळसा कष्टाच्या वाटेला लागायचा . उसाच्या तोडी झाल्या . रानवडी जुंधळ्यांच्या मळण्या झाल्या . रानं मोकळी झाली . फोंड्या माळावरल्या पाखरागत आलेलं रोजगारी निघून गेलं ; तवा मन उदास झालं . घरातला सगळा पसारा काढला . कवा तरी सणावाराला घालायची कापडं एका बोचक्यात हुती . बोचकं सोडलं . उंदरानं सगळी कापडं चावली हुती . मंगलच्या लुगड्यांचा कुटकुट केला हुता .

दुर्व्याची कापडंबी पार कुरतडून टाकली हुती . लोचीची चोळीबी . चोळी उचलली . चोळी मोरपंखी रंगाची . कवातरी लोची घालायची ; तवा लोचीच्या अंगावर मोर नाचल्यागत वाटायचं . तिच्या अंगालाबी ही तंग बसायची . उरावर दोन बाजूला दोन गुबगुबीत पारवं बसल्यागत वाटायचं . चोळी हौसनं शिवली खरं ; पर हौस पुरी झाली न्हाय . भुईवर चोळी पसरली . हलका हात फिरवला . मऊसुद चोळी . उंदरानं पार बुकना केला हुता . सगळी बोचकी उचलून लांब टाकली . सरणात जळणाऱ्या मढ्यावर नजर फिरवावी तसी नजर फिरवली . कुणालातरी सावडून आल्यागत घरात येऊन बसलो . जिवाची नुसती उलघाल चालली हुती . कुडामेढीच्या पिंजऱ्यात गुतून पडल्यागत वाटायचं . त्या परास बाहेरच्या मोकळ्या वाऱ्यात बरं वाटायचं . गाव कष्टातनं मोकळं झालं हुतं . कुणाच्या घरी जाग्रण , गोंधळ उभं रहात हुतं . कुणा भजनकरी आणून भजन ऐकत हुती . जाग्रणं , गोंधळ आसंल तिथं जात हुतो . देवाचा प्रसाद म्हणून मटणाचं कडान खाऊन वाघ्यामुरळ्यांचा नाच बघत हुतो .

खंडोबा , म्हाळसाची गाणी ऐकत हुतो . देवळांत जावून भजन ऐकत हुतो . बाजाराच्या दिवसी आलेला तमाशा बघत हुतो . तरी मन पुराच्या पाण्यागत वहात हुतं . तमाशा करणारी साधी माणसं . तमाशा उभा राहिला की मोठी होत हुती . कुणी राजा , कुणी परधान हूनशान खिनभर राजपद भोगत हुती . देवदेवतांची रूपं घेऊन धरणीवर उतरून आल्यागत वाटायचं . माणसाचं देव बणवून जगाला दाखत हुती . त्या माणसांतला देव कुणाला दिसला आलं ; न्हायतर न्हायबी . ती तमाशगीरं आपलं गाव , घर सोडून धा दिशा का फिरत्यात ? कसलं सुख भोगत्यांत ? पर खिनभर दुसऱ्याला सुख देत्यात ; खिनभर ह्या जगातनं दुसऱ्या जगात माणसं घेऊन जात्यात . नाना परकारची रूपं घेऊन थकल्याभागल्या जिवाला विरंगुळा पाडत्यात . खिनभर मनरंजन हुतं .

शृंगराच्या नादानं मनाचं घुगरू वाजायला लागतं . तवा माणूस सगळं इसरून पुंगरांत जीव गुततो . त्याच नाचणाऱ्या बायका देवीचं रूप घेऊन येत्यात त्या वक्ताला हुर्द भक्तिभावानं भरतं . हात आपसूका जुळत्यात . हे सगळं बघिटलं की वाटायचं आपून तमाशगीर का झालो न्हाय ? वाघ्यामुरळी का व्हता आलं न्हाय ? आपल्याला भजनं का म्हणता येत न्हायती ? जलमभर मातीत मुरलो . काया मातीची करून घेटली . पोटानं हे सगळं नजरआड केलं हुतं . तमाशात गेलो असतो तर राजा हुता आलं आसतं ; परधान झालो असतो . गणगौवळणीच्या वक्ताला क्रिष्णा होऊन गवळणी आडवल्या असत्या . आता माझीच गौळण , माझी राधा मला सोडून गेलीय ; वेडी झालीय . सत्य चांगुणासारखं तिनं दुर्व्याला लोटलंय . पतिव्रती अहिलेसारखं पावित्र्य भंगून ती शिळा होऊन कुठं पडलीय ? तिला एकादा राम भेटंल का ? त्याच्या पायधुणीनं माझ्या लोचीचा उद्धार झाला तर किती बरं वाटल मला ! लोचीला तिचा भाऊ घेवून गेलाय खरं ; पर त्यो तरी नीट बघत आसंल का ? त्यालाबी त्याचा परपंच हाय .

त्याची बायको लोचीला नीट बघत आसंल का ? लोचीनं टकूर फिरवून घिटलंय . खिनभर शेण्यागत ; तर खिनभरानं खुळ्यागत वागती . तिचं कुणी खपवून घेत आसंल का ? हे सगळं एका मनात उठत हुतं . तर दुसरं मन भजन – भारूडांकडं ओढ खात हुतं . कष्टानं जीव आंबला तरी भजन भारूडं बघायला जात हुतं . तमाशांतल्या झिलकऱ्यागत भजन – भारूडं म्हणायला साथ करत हुतो . मनानंच मनाच्या फाळ्या पाडल्यागत जगत हुतो . कुत्र्याच्या जिन्याला रया हुती ; ती माझ्या जिन्याला राहिली नव्हती . देहीला लागलेलं कष्टाचं वळण मोडून भजन – भारूडं करत हुतो . कवा अभंग , तर कवा गवळणी गात हुतो . भारूडातबी काम करत हुतो . एकनाथी भारूडं समजून घेत हुतो . आगीतल्या लोखंडागत मनाचा गंज उली उली जळत हुता . खिनभर माणूस माणसांतला खराखुरा माणूस घावल्यागत वाटायचं . मनालाच मायेनं मोहणी घातलेली काय तुटत नव्हती . लोचीला याड लागलं हुत्तं , दुर्व्या मामाकडं हुता . घडी घटका वाटायचं . “ नको , नको परान्या गुंतू मायाजाळी . ” पर आतलं मन हे सगळं तोडून टाकायला धजत नव्हतं .गावात दोन देऊळं हुती . मारुतीचं आन् शंकराचं . ह्या दोन्हीबी देवळांत माणसांची नुसती वर्दळ . मारुतीची दगडाची मूर्ती ; पर शेंदरानं पार झाकून गेली हुती . पहिला शनवार केला तवा आपल्याबी गावात मारुतीचं देवाळ हाय ; हे ठावं झालं . शंकराच्या देवळाचंबी तसंच ; कवाच वार केलं नव्हतं . ते शनवार , सोमवार कराय लागलो .

कवा ध्यान झालं तर हुणारी अंघोळ रोज व्हयाला लागली . तवाबी शेजारी बोंब माराय लागलं . ‘ आता करून भागला ; तवा देव पुजला लागला . ‘ संत्या बुवा झाल्या म्हणायची ; तवा बरं वाटायचं . निम्म गाव माळकरी झालं हुतं . गुरू करून घेतलेली माणसं . गंध , बुका लावून गळ्यातल्या माळा उघड्या टाकून हिंडायला लागली हुती . ज्यांनी ज्यांनी दीक्षा घेटली हुती ; ती सगळी मला अग्रेव करत हुती . ‘ संत्या , आता घे दीक्षा ‘ म्हणत हुती . मलाबी दीक्षा घ्यावंस वाटायला लागलं हुतं . गळ्यात माळ घालावं वाटत हुतं ; पर मन धजत नव्हतं . रोजगाऱ्याचा जलम . कुठं जाग्रण , गोंधळाला गेलो तर वशाट खावं लागायचं . हाय मनाची माळ ; न्हाय तरी ज्यांनी माळा घातल्या ते तरी कुठं निकळंक ! वक्ताला माळा खुंटीला टांगून सगळं करत हुती . भजनांत बसून दोन -चार भजनं शिकलो . भारूडंबी शिकलो .

टाळबी वाजवायला येत हुतं . गावबी संतूबुवा म्हणायला लागलं . तरी मन का थिर नव्हतं ? दुर्व्याचं न्हायतर लोचीचं ध्यान हुयांचं . लोची कवा , कवा सपनांत येत हुती ; तवा नेसतं धोतर वलं व्हत हुतं . तळहातागत डाग धोतराला पडायचं ; तवा खरं लाज वाटायची . लाजून मनाचा चुरघुळा झाल्यागत वाटायचं . भजन म्हणायला लागलो की बायका कानांत जीव आणून ऐकत बसायच्या . तवा मलाबी हुरूप वाटायचा . गळा घासून सुरात भजनं हुयाची . आसंच शनवारी भजन झालं . सकाळचं उठून कामाला निघालो . नेमकं शिंदबनात माळ्याची रांडाव सुण भेटली . तिनं हाटकलं “ संतूबुवा ! कुठं निघालासा ? ” ” कामावर निघालोय . ” ” तुमचा गळा लई ग्वाड हाय बघा . अंगावर पाटीभर मांस चढल्यागत वाटलं . “ बुवा ! तुमच्या गळ्याला पाण्यागत धार हाय बघा . ” ते कसंग ? ” “ तुमचा गळा जिथं चढवायचा तिथं चढतो . उतरायच्या जागी उतरतो . पाण्याच्या धारेगत वाटतं बघा . ‘ ‘ भगवंताचं देण हे .” “ बुवा ! आता लोचीचं ध्यान हुतं तुमाला ? ” ” का ? मी काय माणसू नव्ह ? ‘ ” तसं न्हाय ; भक्ती मार्ग धरलाय . ” का उगं जखमंवर मिरचं चोळतीस ? ” “ तू का माझं मन जाळतो ? ” “ मी उमगलो न्हाय ; सई . “ उगं खोटं बोलू नगस ; आपल्या दोघांचं दुख एकच हाय . संतू , माझा नवरा मेलाय नि तुझी बायको जितीजागती आसून तुला रांडपण आलंय . ‘ “ सई ; तू कुठं ; मी कुठं . थोरामोठ्याच्या सुणा तुमी .

तुमचं घराणंबी देशमुखांचं . हे बोलनं तुला तरी पटतं का ? ” उपाशाला जेवायचं का म्हणून इचारायची गरज नसती . तसंच माझं झालं हुतो . मनातनं सगळं करावं वाटत हुतं . पर सईच्या मनाचा ठाव घेत हुतो . उपाशाला पाचपक्वान्नाचं ताट घावल्यागत वाटंत हुतं . सपनात धोतराला पडलेलं डाग डोळ्यापुढं येत हुतं ; तसं मन उन्हात घातल्यागत वाटायला लागलं हुतं . हितंच कुठं ; उसांत शिरावं . खंदळून , खंदळून अंघाचा खुर्दूळा करून घ्यावं ; वाटायला लागलं . पुढ्यात म्हगजाचा ऊसबी वाढला हुता . सगळं मनाजोगं झालं तवा नशा उतरलेल्या नेशेबाज माणसागत चालायला लागलो . चांगली दोन वावरं चालून गेलो ; तवा देशमुखांच्या पोरांनी गाठलं . चार पोरांनी माशागत घोळसून काढलं.

नि उकणलेल्या घरावरनं पोतेरा फिरवल्यागत केलं . ” संतू ! झालं हे हिथंच सोडायचं ; कुठं बोलला तर जिवंच मारू ; न्हायतर जिता डबऱ्यात घालू . ” ‘ न्हाय बोलायचो . ‘ ‘ आयला तुझ्या ; रांडरंडक्या बायका गाठून हे आसलं करतूस ? ” लुतभऱ्या कुत्र्यागत कान झाडंत पळालो . धडप्यात धरलेल्या खुळखुळ्यागत हाडं वाजत हुती . पंधरादी तीन वार आसचं गेलं . हीर फुटत हुती . खाली खाली तळ चालतेला . वाटायचं आसंच हिरीच्या तळाबरं पार पाताळात जावं . ही दुनिया नकोसी झालीय . देशमुखांची माणसं बघिटली की मानचा काटा शेवरीच्या शेंड्यागत खाली वाकायचा . कुणाच्या डोळ्याला डोळं भिडवून बोलाचं बळ अंगात राहिलं नव्हतं . भजनं म्हणाय बसलो की फडातल्या पैलवानांगत उर काढून बसायचो .

https://bit.ly/bspmycityshrigonda

मान मोरागत ताठ ठेवून नाचवायचो . पर आता रोगाट माकडागत भजनाला बसत हुतो . गळ्याची धार बसल्यागत सूर निघायचा . भारूडं करालाबी मन धजायचं न्हाय . इतकं झालं तरी कवा कवा रातचं सईचं ध्यान हुयाचं . लोची सपनात यायची . चारी बाजून रात पेटल्यागत झालं हुतं . आगीत घावल्यागत झालं हुतं . तरी जळत जळत जगत हुतो . आर्ध कच्चं जळलेल्या लाकडांगत देही झाली हुती . पाण्याखाली दाबून धरल्यागत हुर्दबी झालं हुतं . डोळं काळोखात घालून उजेडाकडं बघत हुतो . तरी डोळ्यांवर झापड पडल्यागत वाटत हुतं . उजेड कुठंच दिसत नव्हता..

क्रमशः
स्रोत:(उत्तम बंडू तुपे यांच्या कळा कादंबरीतुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading