दिनांक १५ मार्च २०२५, श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका लवकरच होणार असल्याने प्रशासनाने वॉर्ड रचना आणि मतदार यादी संदर्भात हालचाली सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मांडवगण ग्रामपंचायतीच्या वॉर्ड रचनेवर ग्रामस्थांनी आक्षेप घेतले आहेत.

ग्रामस्थांच्या मते, प्रशासनाने वॉर्ड क्रमांक ४ मध्ये अनुसूचित जातीसाठी आरक्षण न देता, वॉर्ड क्रमांक २ मध्ये हे आरक्षण निश्चित केले आहे. मात्र, वॉर्ड क्रमांक २ मध्ये अनुसूचित जातीचे एकही कुटुंब किंवा व्यक्ती वास्तव्याला नाहीत, तर वॉर्ड क्रमांक ४ मध्ये मोठ्या प्रमाणावर अनुसूचित जातींची लोकसंख्या (८८४) आहे.

ग्रामस्थांनी प्रशासनाला विचारले की, जर वॉर्ड क्रमांक २ मध्ये अनुसूचित जातीचा उमेदवार निवडून आला, तर त्याला मिळणारा दलित वस्ती विकास निधी योग्य ठिकाणी कसा वापरला जाईल? यामुळे वॉर्ड क्रमांक ४ मध्ये अनुसूचित जातींसाठी आरक्षण देणे अधिक न्याय्य ठरेल, अशी भूमिका त्यांनी मांडली.

यासंदर्भात सिद्धार्थ घोडके, प्रशांत चव्हाण, योगेश बोरुडे, अशोक विधाते, संग्राम देशमुख, किरण आरडे, सागर चौरे, अक्षय घोडके, सनी लोखंडे यांनी हरकती नोंदवल्या आहेत. प्रशासनाने या विषयाची गांभीर्याने दखल घ्यावी आणि अनुसूचित जातीच्या घटकांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी मागणी या ग्रामस्थांनी केली आहे.

आता प्रशासन या हरकतींचा विचार करून वॉर्ड रचनेत बदल करणार का..? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Advertise..
