कांद्याला करप्याची लागण !

दिनांक ३० सप्टेंबर,श्रीगोंदा:

सध्या संपूर्ण जगभर कोरोनाने थैमान घातले असून सर्वसामान्य जनता हतबल झाली आहे.त्यात देशात सध्या कांद्याला चांगला बाजार असून, प्रतिकिलो कांद्याच्या बाजारभावाने डबल सेंच्युरी पार केली आहे. मात्र, रब्बी हंगामातील लागवड केलेल्या कांदा पिकावर करपा रोगाच्या प्रादुर्भावामुळे कांदा पिके अक्षरशः जळून खाक झाली आहेत.

श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगांव, बाबूर्डी, शिरसगांव, वडाळी, पारगाव इ. गावांतील रब्बी हंगामात लागवड झालेल्या कांदा लागवडीवर करप्या व विविध रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कांद्याचे पीके जळून खाक झाली आहेत. मोठया भांडवली खर्चातून शेतकऱ्यांनी लागवड केलेला कांदा परतीच्या पावसाच्या संकटातून सुटून आता वातावरणातील बदलामुळे करपा रोगाच्या संकटात सापडला आहे. सकाळी पडणार धुकं, दवं यामुळे कांद्यावर करप्याचा व विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने श्रीगोंदा तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांचा कांदा जळून खाक झाला आहे.

सध्या सर्वत्र कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्याने बाजारभाव गगनाला भिडले आहेत. शेतात नवीन लागवड केलेला कांदा देखील परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात खराब झाला. तर आता सुरू असलेल्या सततच्या ढगाळ हवामानामुळे कांद्याच्या पातीवर करप्या व आतील पानांतील गाभ्यात माव्यासारखा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांचे कांदा पीक जळून गेल्याने बळीराजा पुरता हतबल झाला आहे. एकीकडे कांद्याने शहरी भागातील सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असले तरी, कांद्याचे बाजारभाव वाढूनही सर्वसामान्य बळीराजाच्या पदरी मात्र निराशाच आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे कष्टकरी बळीराजाची चिंता मात्र आता वाढली आहे. तरी, शासनाने कांदा जळालेल्या शेतकऱ्याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्याची आजच्या कोरोना काळात गरज आहे.

“शासनाने पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्या”

कांदा पिकांवर विविध रोगांचे आक्रमण होऊन पिके भस्मसात झाली आहेत. शेतकऱ्यांनी कांदा लागवडीसाठी भरमसाठ खर्च केलेला असून, शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. महिला शेतकरी, जयश्री भगवान धावडे (उपसरपंच, मढेवडगांव)

स्रोत:(विजय मांडे यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading