किडके धान्य वाटप करणाऱ्या, दीपक हिरणावळे यांच्या रेशन धान्य दुकानाच्या चौकशीचे आदेश..

दिनांक १ ऑक्टोबर,श्रीगोंदा:

श्रीगोंदा शहरातील रेशन धान्य दुकानदार, लोकांना किडके, मातीमिश्रित धान्य वाटप करत असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत होत्या. त्या अनुषंगाने बहुजन समता पत्र पोर्टलच्या माध्यमातून केलेल्या स्टिंग ऑपरेशन मधून शहरातील दीपक हिरणावळे या रेशन धान्य दुकान चालकाने सिद्धार्थनगर, ससानेनगर येथील लाभार्थींना कीडे पडलेले, माती, बुरशी लागलेले धान्य वाटप केल्याचे निदर्शनास आले.

दुकान चालकाने दिलेली पावती व धान्य याचे निरीक्षण केल्यावर सदरील धान्यामध्ये खडे, माती, दगड, बुरशी आढळून आली. याबाबत दोन दिवसांपूर्वी बहुजन समता पत्रच्या माध्यमांतून “श्रीगोंद्यात रेशन धान्य दुकानांमधून मागासवर्गीयांना बुरशी, अळ्या, माती, किडे, खडे मिश्रित धान्याचे वाटप. तर, पुरवठा अधिकारी नॉटरिचेबल”.

https://bit.ly/30hQIp6

या मथळ्याखाली बातमी प्रकाशित करण्यात आली. बातमीची दखल घेत, तहसीलदार चारुशीला पवार मॅडम यांनी तात्काळ पुरवठा अधिकारी पाचरणे तथा पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना सुचित करून, नमूद ठिकाणी जाऊन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

श्रीगोंदा तालुक्यातील काही रेशन धान्य दुकानांतून अशा पद्धतीचे धान्य वाटप होत असल्याचे समजले होते. असे धान्य न घेणाऱ्या लाभार्थ्यांबरोबर दुकानदार वाद घालत होते. कोरोना प्रादुर्भाव कालखंडात धान्य पदरात पाडणे एवढेच सामान्यांच्या हाती होते. त्यामुळे वाद करणे सोडून, मिळेल ते धान्य लाभार्थी स्वीकारत असे. मात्र, दुकानदारांकडून माणसाला खाण्या योग्य धान्य देण्या ऐवजी जनावरे किंवा गुरेढोरे ही खाणार नाहीत असे धान्य वाटप होऊ लागल्याने अनेकांच्या तक्रारी मात्र, सुरू धरु लागल्या.

श्रीगोंदा शहरातील दिपक दत्तात्रय हिरणावळे यांच्या रेशन धान्य दुकानाच्या या प्रकारच्या अनेक तक्रारी सिद्धार्थनगर, ससाणेनगर तसेच औटी वाडी परिसर व तुपे वस्तीतील नागरिकांच्या माध्यमातून येत होत्या. हिरणावळे यांच्याबाबत दुकान वेळेवर न उघडणे, दुकानावर वेळेचा फलक नसणे, लाभार्थी विशेषत: मागासवर्गीय समाजातील लोकांना दुकानाबाहेर तिष्ठत उभा ठेवणे, वेळेत धान्य न देणे, अरेरावीची भाषा वापरणे, लोकांबरोबर वाद घालने, ज्येष्ठ नागरिकांना मशीन प्रतिसाद देत नसल्याने धान्य न देणे, आधार कार्डच्या माध्यमांतून ज्येष्ठांना धान्य नाकारणे, जुना धान्यसाठा विक्रीस ठेवणे, मागासवर्गीय लाभार्थ्यांना हिनतेने बोलणे, त्यांना अश्या प्रादुर्भावात गर्दी होईपर्यंत दुकानासमोर उभे ठेवणे अशा विविध तक्रारी लोकांमार्फत समोर येत होत्या.

त्याअनुषंगाने बहुजन समता पत्रने या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षात पाहणी केली व वस्तुस्थिती जगासमोर आणली. त्यामुळे समाजातून तसेच लाभार्थ्यांकडून बहुजन समता पत्रचे अभिनंदन केले जात आहेत. तहसीलदार चारुशिला पवार यांच्याकडे याविषयी चौकशी केली असता, त्यांनी पुरवठा अधिकारी यांना चौकशीचे आदेश दिल्याचे बहुजन समता पत्रशी बोलताना सांगितले आहे.

स्रोत:(प्रशासनाकडे केलेल्या चौकशी नुसार)

Leave a Reply