उपरा,लक्ष्मण माने..
लेक झाली . ‘ बा म्हनत होता … ‘ समिंद्रा नाव ठेवू या .
‘ आई सुटली होती . रातभर काय काय चाललं होतं ! बानं आमाला रकटं हातरून दिलं . आमी झोपलो . थंडी पडत व्हुती . गार लागत व्हतं . वारं सुटलं व्हतं . अंगावर रकटं पांगारलं व्हतं . झोप कवा लागली समजलंच नाही .
आईच्या बाळंतपणाला चार दिवस झालं असत्याल . रोज सकाळी भात खावा लागत व्हता , आईला इनायचं काम नसायचं . डोस्क्याला लुगड्याचा धडपा बांधलेला असायचा . तीन दगडांच्या चुलीवर जरमलच्या भगुल्यात भात रटरटायचा . आमा पोरान्ला नागडं केलेलं . कंच्याच पोराच्या अंगावर कापाड ठिवायचं न्हाय . बा म्हणायचा ,
‘ इटाळ व्हईल . द्यावा संग हायती . खाजवून खिरापत नगं . शिवताशिवत चालायची न्हाय .
आईचा भात येगळा . सुकटीचं , न्हाय तर बोंबलाचं कोरड्यास . ईक आला व्हता . खोपडी फाट्यावर गिराईक नव्हतं . तरी बिराडं हालत नव्हती .
कोकणात पैका बरा , बरकत बरी , मिळकतीचं दिस आन् आईचं हे असं . बा चिडायचा . हालहालायचा.पैका कमवायचा , ते गमवायचा आलं . पोराची पाचवी चांगली करायची ! झोकात बा धाकल्या तात्याला म्हनत व्हता ,
‘ तू आपल्या बाकीच्या बिराडासनी सांग जा . त्येसनी आवातनं दिलं पायजी . भावकीची बाकीची बिराडं पेन पनवेल खारपाडा , जितं असत्याल , तितं सांग जा .
तात्या धोतरात तांदूळ बांधून दिस उगवताच हालला . आप्पा आन् बा कुठं तरी गेलं व्हतं . दुपारच्या पारी बा आला . त्याच्या हातात दावं हुतं . आप्पा मागनं त्या पिंडरीवर ढाळ्यानं हानत व्हता . मी लांबनं बघितलं अन् पळत म्होरं गेलो . बा गरजला ,
“ वा मतुर कुडीकीर वा ! मिदा गिराद कीर हा .
‘ (ये ! मूत प्याला ये . काय खायाचंय व्हय ? आडवा योतुयास ते ? )
उत्साह मावळला . मान खाली घातली . बानं हिरमोड केला व्हता . आमी बिराडावर आलो . गाढवाला मेखेला बांधलं . समीनं भात केला व्हुता . आमी जेवायला लागलो . बा बका बका भात भरीत व्हता . खाता खाता बोलत व्हता . आज सांची पाचवी करायची म्हनून आईला काय काय लागतं , ते इचारीत व्हता . आई सांगत व्हुती ,
‘ पाटीच्या शेपटाला पांढरा डाग दिसतुया . पाचवीला काळीच पाट लागतीया. “बा जेवता जेवता उठला . टांग उचलून खाली वर बघून म्हनाला ,
‘ आगं , त्यो डाग न्हाय ? कांद्याचं टरफाल हाय .
बानं उसासा सोडला . बोकडाच्या रंगाची खात्री केली . पुना जेवायला लागला . आई सांगत व्हती ,
‘ गव्ह लागत्याल , कनकीचं दिवं कराय लागत्यात . गोडं त्याल , पाच नाऱ्याळ , पानं , सुपारी , लिंब , हिरव्या बांगड्या , कुकवाचा करंडू , हिरवा खन , हाळद , कुकू , आन् कायबाय !
बा सारं ध्यान दिवून ऐकत व्हता . दोघा भावांची जेवणं झाली . दोगंजन उठले . बानं धोतार खांद्यावर टाकलं , आन् दोगं लगालगा चालत गेलं . आईनं धुनं वाळायला घातलं . पोरावर उन आलं व्हतं . त्याच्यावर धडपा घातला . आन् जळान येचायला गेली . मी पोराजवळ बसलो . समी , मी खेळण्यात दंग झालो .
दिस मावळाया गेला असंल . तात्यासंगं पाच – सहा गडी आलं हुतं . आईनं चा कराय सांगितला . नानीनं चा करून दिला . सारीजनंचा प्यायले . मी साऱ्यास्नी वळकत व्हतो . जयसिंग्याचं बि – हाड खारपाड्याला व्हतं . तात्या त्याला म्हणत व्हता ,
‘ आरं , जयसिंग ! हितं गिराईक न्हाय . आमीबी निघतुया . पर वयनीचा जीव मोकळा झाला . आता काय फिकीर न्हाय , बघ . फोकाला हातच चालत न्हाय . ठकीला तर नुसतं वडतुया . तिला हे आपलं काम जमत न्हाय . नुसता रेडा सांभाळतुया . दुसरं एखादं सनांग असलं , तर बघ ! दुसवं असलं तरी हायगय न्हाय . पर कामाला हारण पायजे .
‘ दोगांच्या गप्पा रंगल्या व्हत्या . तेवढ्यात बा आन् आप्पा डोस्क्यावर गठुडी घिऊन आलं . मंडळी जमली व्हती . बानं घाई केली . जोंदळं दळून आनलं व्हतं . तांदळाचं बाचकं बांदलं . परात , भगुलं , इळा एका उपनीत भरलं . तिकाटमीट , त्याल , देवाचं सामान , सारी बांदाबांद केली आन् आप्पाला निघायला सांगितलं . त्यानं सारंगबाळ डोस्क्यावर घेतलं . बानं निवदाचं सामान घेतलं . एका हातात कनकीचा दिवा घेतला . कनकीचं गोळं बारक्या परातीत उतारलं . हातात इळा घेतला . त्यानं ते गोळं कापलं . चारी बाजूला टाकलं . तोंडातल्या तोंडात कायबाय बोलत सगळीजनं खालतीकडं तोंड करून निघालं . बानं साऱ्याला सांगितलं ,
‘ मागं कुनी बघू नगा . काय राह्यलं आसंल , तर राऊ द्या . मागं बगायचं न्हाय .
सारी गडीमाणसं बिनबोलता एकामागं एक मेंढरावानी काळ्याकुट्ट अंधारात चालत व्हती . मी आप्पाच्या मागं बोकाड हानत चाललो व्हतो . माझ्या मागं बा हारे रामा, रामा करीत , हेळ काढीत चालला व्हता .
मागं का बगायचंन्हाय ? मनात इचार येत व्हता . पन इचारायचं कुनाला ? सारी मयतीला निघाल्यागत गप्पगार चालत व्हते . चारी बाजूंनी अंधार मी म्हनत व्हता . डोळ्यात ब्वॉट घातलं तरी दिसत नव्हतं . त्यात पायात काय नव्हतं . ठेचा लागत व्हत्या , काटं मोडत व्हतं . आगं , आय आय ‘ म्हनायचं . बा म्हनायचा , ‘ मिदा आसला ? ‘ ( काय झालं रं ? ) सांगायची सोय नसायची . दबक्या आवाजात सांगायचं . बा म्हनायचा ,
‘ डोळं गेलं व्हय ? आप्पाच्या मागं मागं चाल .
‘ आसपास मानूस न्हाय . रात गिळायला आल्यागत वाटायची . सारीकडं किर्र अंधार . रातकिडं वरडत व्हतं . सारंच भयान . भ्या वाटायचं . अंधारात बोकाडबी नीट चालत नव्हतं . येम आल्यागत ६१ मरगळ खायचं . कुनीच बोलत नव्हतं . साऱ्यांच्या म्होरं तात्या व्हता . जरा चांगलं पटांगान बगून तात्या थांबला . तसी सारीच थांबली . त्यो म्होरनंच म्हनाला ,
‘ आला भाऊ ह्या , इंगी जागा नाला तोंगाकीर , आन शेडी बी कीर , इंजी शयुका ? ” ( आरं भाऊ , हिथं झाड हाय , आडूसा हाय … आन् पटांगानबी हाय …. हिथंच थांबू का ? गावापासनं लई लांब आलू आपून.)
वझं उतारलं . बानं काडी वडली . उजेड झाला .
‘ खंदील आनला असता तर … ‘ मी म्हनालू . तसा तात्या खेकसला ,
‘आला गपरवाणी ! ( आरं , गप्प ! ) तसं म्हनायचं न्हाय.
‘बानं तवर करवंदीचं झाड निम्मं तोडलं. चांगला आडूसा केला. कनकीच्या दिव्यात गोड त्याल भरलं. आन् त्यो पेटवला . तसा आंदूक उजेड झाला . सारीजनं उजेडाजवळ जमले. बानं दहा- बारा खडं गोळा केलं. पान्यानं धुतलं. वळीत मांडून ठिवलं, त्येच्यावर हळद – कुकू घातलं . बांगड्या ठिवल्या. खन, सुपारी, पान , लिंबू , सारं मांडून झालं . तात्यानं नाऱ्याळ सोललं व्हतं. फटाफट नाऱ्याळ फुटलं . उदबत्ती लावली. कापूर लावला. मोठ्या भक्तीनं देवाला हात जोडलं . सटवाय आनायला बा इसारला व्हता . काय करावं मोठं कोडं पडलं . शिऱ्यानं सांगितलं ,
‘आरं बापू , त्येला काय व्हतंय ? ह्ये पूज मंजी झालं. तात्यानं चार आन्याचं नानं दिलं. बानं त्याला हळदकुकू लावलं.’ आईसटवाई करीत ते मांडून ठिवलं. तेवढ्यात रानातला कोला वरडला . अंगावर काटा आल्यागत झालं. मी देवाच्या बाजूला सरून मानसांच्या मदी बसलू.
आप्पानं बोकाड आडवं पाडलं. सोयानं लावायचं असतं. बानं जिज्याला सांगितलं . तेवढाच सोयरा आला व्हता. जिज्यानं बोकाड लावलं . रगात भळाभळा सांडाय लागलं . रक्ताची पयली चिपळी सुटली , ती अंदारात बानं धरली , देवाच्या म्होरं शिपली . बोकडाचा जीव गेला. आन् शिरप्यानं कातडं काडलं. मुडी, खुरा देवाम्होरं ठिवल्या. जिज्यानं आन् तात्यानं दगड मांडलं. आप्पानं अंधारातच काट्या गोळा केल्या . पेटवल्या . आन् जाळ झाला . तवा जरा बरं वाटलं . आता चांगलाच उजेड पडला व्हता . गार वारं आंगाला झोंबत व्हतं . मी चुलीकडं सरलो . आता जरा ऊब लागत व्हती . मानसं आपसांत गप्पा मारीत बोलत व्हती . लांब गावाकडं कुत्री भुकत व्हती . शिरप्यानं सारं मटान चुलीवर घातलं . आप्पानं भाकरी केल्या . बा भाकरी भाजीत व्हता . साऱ्यांचं ध्यान कवा शिजतंया ह्याच्यावर व्हतं . जिज्या म्हणाला ,
‘ कवळं हाय, आत्ता शिजेल. जरा सुपारीचं खांड टाक. पाटीला यळ लागत न्हाय ! ‘ बानं सुपारीचं खांड आदनात टाकलं . जाळ ढणाढणा चालला व्हता . पोटात कावळं वरडत व्हतं . बानं खोबरं चेचलं .
‘ नानीला संगं आनलं असतं तर ?
‘ मी इचारलं , तसा बा समजावनीनं म्हनला ,
‘ अरं , बायकांनी यायचं नसतं . देवाला चालत न्हाय !
‘ सारं गडीमानसंच करीत व्हती .
मटान शिजलं . काळजाचा देट दोऱ्याला बांधून आदनात घातला , त्यो काढला . पितळीत भाकरी , मटन आन् काळजाचं घड घातला . तांब्यात पाणी घेतलं आन् खालतं तोंड करून बानं निवद दावला .
पितळ्या चारच होत्या , दोगं दोगं – चौगं चौगं पितळी बगून बसलो . कोरड्यास लई तिकाट झालं वतं . शिरपानं निवदाला आनलेला परसाद सगळ्यास्नी दिला . मला रातचं जायचं म्हनून परसाद दिला न्हाई . सारीजनं बाटलीतली दारू प्याले आन् पितळ्यावर पितळ्या रिकाम्या व्हायला लागल्या . बरबाट चांगलं झालं व्हतं . तिकाटं हू म्हणून घातल्यालं . सारं संपवायचं . मागारी न्ह्याचं न्हाय . नुसती सागुतीच खाल्ली .
मंडळी वाटंत काय बोलत व्हती ! फाजील आन् इचकाट . गडी घोरात आला आन् बायनं कंबर काढून घितली , शिऱ्या रंगात येऊन सांगत व्हता . मला समजत नव्हतं . सारीजनं हसायचे . मीबी हसायचो . पन ‘ गडी घोरात आला ‘ , म्हंजी काय ? गप्प बसून जेवत व्हतो . एकटाच सुदीत व्हतो . बाकी सारी जनं ल्हास व्हते .
जेवनं झाली . बानं राहिलेलं पुसून टाकलं . दिव्यातलं त्याल संपत आलं व्हतं . बानं घाई केली . सारं सामान गुंडाळलं आणि मंडळी धडपडत वाटला लागली . शिऱ्याला लई चढली व्हती . त्याला आप्पानं धरलं व्हतं . म्होरं तात्या , त्यांच्या मागं जिज्या . आमी आलू तसं माघारी निगालू . आमूसेची रात , शिऱ्या आन् आप्पा खाचरात धडपडले . ‘ आग , आये आये करीत उठले . बा सावकाश चला ‘ म्हणून हुकूम सोडीत व्हता . मला अजिबात दिसंना. भित आंधळ्यागत डोळं सताड उगाडलं , तरी दिसत नव्हतं . बानं मला उचलून खांद्यावर घेतलं आन् आमी वड्याच्या काठाला आलो – तसी भराभरा सारीजन पाण्यात उतरली . भांडीकुंडी सोडली , तर सारं भिजावलं . आंघुळी केल्या . मला नागवा केला . नशीब ! आंघूळ घातली न्हाय . पर थंडीनं दात वाजत व्हते . अंगावर गुंजभर कापड नव्हतं . रात बरीच झाली व्हती . पर झोप उडाली व्हती . पेंग यायचा आन् थंडीनं पळायचा .
वल्या अंगानं सारीजनं धडपडत , उठत , बसत मागारी बिराडाला आलो . साऱ्यान्ला पांगरायला , हातरायला नव्हतंच . अंगावर वली कापडं . बानं धोतार फाडलं , साऱ्यान्ला धडपं वाटलं . सारीजनं धडप नेसलं , आन् खुंडा घालून पाय पोटाला घिवून झोपलं . मी पोत्याच्या कंठाळीत घुसलो तवा जरा ऊब आली . ऊब आली , तशी डोळ्यावर झापड येऊ लागली . बाकीच्यांनी काय पांगारलं कुणास ठावं ? बा , मी झोपलो , तरी बडबडत व्हताच .
दिस उगवायचा व्हता . पाखरं वरडत व्हती . डांबरी रस्त्यावर वरदळ वाढली व्हती . मासळी घिवून मासळीची गाडी गेली, की मासळीचा वास सुटत होता . दूधवाल्यांच्या सायकली , पाव – बटरवाला पोरगा . रस्त्याच्या जीवात जीव येत व्हता, बानं फोकाचा चुरा चुलीत कोंबला. चा केला. एका आन्याचं दूद घेतलं . चा झाला . सारी पावणी मंडळी चा पेली आन् आल्या वाटेनं मागारी गेली. आमी मुक्काम हलवला. बाच सारी आवराआवर करीत व्हता . बिराड कंठाळीत भरत व्हता. तारांबळ उडाली व्हती . आमच्यावर खेकसत व्हता . आईनं बाळाला पाठीशी धडप्यात बांधलं . कासुटा घातला . लांबनंच देवाच्या पाया पडली . बानं आमाला गाढवावर बशिवलं . आप्पा – तात्याची बिराडं बरोबर आली न्हाईत . तात्या दुसऱ्या दिवशी कुणाच्यातरी गावाला जाणार व्हता . आप्पा येगळ्या गावाला जाणार व्हता . आमी एका गावाला . आप्पा म्हणत व्हता ,
‘दिवाळीच्या आदल्या दिशी न्हाईतर रामजतरंला मी निरगुडीला यीन .
‘तात्या त्याच सुमाराला निरगुडीला येणार व्हता . आमी आगंमागं त्याच सुमाराला जानार व्हतो .
त्यानंतर महिना – सव्वा महिना आमी कोकनात राहिलू असू . वळनं, इकनं, रातरात काम करनं, आई – बाची भांडनं, आमच्यावर खेकासनं, समजावनं, चाललं होतंच. सांच्याला बा वळाय बसला, की बिनचुकता मला अभ्यासाला बसवीत होता. मी माझ्या आकलंनं लिव्हत होतो. वाचीत व्हतो. एक – दोनची उजळणी, शंभरपातुर बाच म्हणायला शिकवीत व्हता. दोन इसा, तीन इसा करीत करीत अभ्यास चालला होता. मधेच एकाद्या दिशी बाला बेवडा राकीस ६३ करायचा. आई काय बोलायची न्हाय. तिला बा काय बोलू द्यायचा न्हाय. ‘ रांड, तुझ्या आईची गांड’, हे चालू होतं. उरात रगात पडस्तवर आई – बा राबत व्हते.
क्रमशः
स्रोत:(पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या उपरा या पुस्तकातुन)
