दिनांक ४ जानेवारी २०२६,श्रीगोंदा:
तालुक्यातील वडाळी रोडवरील जंगलात फोटोशूट करण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांना अज्ञात इसमांनी लोखंडी रॉड आणि प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या हल्ल्यात फोटोग्राफरचा महागडा कॅमेरा सेट आणि खिशातील ३८,००० रुपये जबरदस्तीने हिसकावून नेण्यात आले आहेत.
श्रीगोंदा येथील ‘ओम फोटोग्राफी’चे मालक ओम संतोष शिंदे (वय २३) यांना दि. ०३/०१/२०२६ रोजी एका ग्राहकाचा फोन आला होता. त्यानुसार ते त्यांचे मित्र अजय बोके आणि अनिकेत धोत्रे यांच्यासह वडाळी रोडवरील जंगलात फोटोशूटसाठी गेले होते.

दुपारी ४:४५ च्या सुमारास विना नंबरच्या बुलेटवरून दोन व्यक्ती तिथे आल्या. त्यांनी ओम शिंदे यांना नाव विचारून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि लोखंडी रॉडने मारहाण केली.
मारहाण सुरू असतानाच एका चारचाकी गाडीतून आणखी दोन अनोळखी इसम तिथे पोहोचले. त्यांनीही या तरुणांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या टोळीने ओम शिंदे यांच्या हातातील कॅमेरा सेट आणि खिशातील ३८,००० रुपये बळजबरीने काढून घेतले. सोबत असलेल्या इतर दोन मित्रांकडे पैसे न सापडल्याने त्यांनाही मारहाण करण्यात आली.
हल्ल्यानंतर जखमी अवस्थेत या तरुणांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा येथे पाठवले. उपचार घेतल्यानंतर ओम शिंदे यांनी याप्रकरणी रीतसर फिर्याद दिली आहे.
स्रोत:(फिर्याद)
