श्रीगोंदा | २७ डिसेंबर २०२५:
श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात झालेल्या मारहाणीच्या घटनेचे पडसाद सध्या संपूर्ण राज्यभरात उमटत आहेत. मात्र, या प्रकरणाची सखोल चौकशी आणि श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या स्टेशन डायरीतील (Station Diary) अधिकृत नोंदींनुसार, समोर येत असलेले वास्तव काहीसे वेगळे असल्याचे दिसून येत आहे.
पीडितांवर अन्याय झाल्याचा दावा केला जात असतानाच, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली नसल्याचा खुलासा आता समोर आला आहे.
अहिल्यानगरच्या शेजारील जिल्ह्यातून मजुरीसाठी आलेले काही मजूर श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात वास्तव्यास आहेत. शेतातील पिकाचे नुकसान झाल्याचा संशय व्यक्त केल्यावरून स्थानिक शेतकरी आणि या मजुरांमध्ये हुज्जत झाली.
वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. मिळालेल्या माहितीनुसार, या वादात एका ज्येष्ठ शेतकऱ्याच्या डोक्यात दगडाचा मार लागला, हे पाहून शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी आणि जमावाने स्वसंरक्षणार्थ व संतापून प्रतिहल्ला केला. या दोन गटांतील संघर्षात आदिवासी समाजाचे ७-८ जण आणि शेतकरी गटाचे ३-४ जण जखमी झाले.

घटनेनंतर पीडित कुटुंब तक्रार देण्यासाठी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला आले होते. पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दोन्ही गटांची तक्रार घेण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, २३ डिसेंबरच्या रात्री धक्कादायक घडामोडी घडल्या:
पोलिसांनी जखमींना ग्रामीण रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी उपचार देण्याची तयारी दर्शवली, मात्र पीडितांनी उपचारास स्पष्ट नकार दिला.
मध्यरात्री १ च्या सुमारास पीडितांनी स्वतः स्टेशन डायरीमध्ये लेखी नोंद केली की, “आमचा आपापसात समझोता झाला आहे. आमची काही माणसे सध्या येथे नाहीत, त्यामुळे आम्ही तक्रार न देता निघून जात आहोत.”
पीडितांचे नेतृत्व करणाऱ्यांनी आणि मदतीसाठी आलेल्या काही आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनीही रात्री उशिरा तेथून काढता पाय घेतला.
सध्या अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर काही संघटनांकडून आंदोलनाचा पवित्रा घेतला जात आहे. मात्र, स्थानिक पत्रकार, काही वकिल आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते, या प्रकरणाचे चुकीचे चित्र रंगवले जात आहे.
श्रीगोंदा पोलिसांनी आणि स्थानिक पत्रकारांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून उपाशी असलेल्या आदिवासी कुटुंबांना आणि मुलांना जेवण देऊन मदत केली होती.
असे असतानाही, काही प्रतिनिधींनी सत्याची मोडतोड करून सोशल मीडिया आणि चळवळीत चुकीचा संदेश पसरवल्याचा आरोप होत आहे.
यामध्ये काही ‘दलालांनी’ अर्थपूर्ण तडजोड करण्याचा प्रयत्न केल्याचीही चर्चा तालुक्यात रंगली आहे.
या प्रकरणातील सत्य बाजू अशी आहे की, दोन्ही बाजूंनी मारहाण झाली असून शेतकऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. केवळ एका बाजूचे म्हणणे ऐकून भूमिका मांडण्याऐवजी, कार्यकर्त्यांनी पोलीस दप्तर आणि स्थानिक परिस्थितीचा आढावा घेणे गरजेचे आहे.
श्रीगोंदा पोलिसांनी “तक्रारदार परत आल्यास गुन्हा दाखल करण्याची तजवीज” ठेवली असताना, प्रशासनावर चुकीचे आरोप करणे कितपत योग्य आहे, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
या प्रकरणातील ‘अर्थपूर्ण’ तडजोडीचे प्रयत्न आणि स्टेशन डायरीतील ती नोंद यावर पोलीस प्रशासन काय अधिकृत भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्त्रोत:(अधिकृत माहितीनुसार)
