दिनांक २३ डिसेंबर २०२५, श्रीगोंदा:
श्रीगोंदा मतदारसंघात एक संतापजनक घटना समोर आली आहे. आमदार पाचपुते यांच्या काष्टी गावाजवळील संतवाडी येथे किरकोळ संशयावरून आदिवासी आणि दलित समाजातील ऊसतोड मजुरांवर जमावाने प्राणघातक हल्ला केला.
या भीषण हल्ल्यात महिला, लहान मुले आणि बाळंत महिलांसह सुमारे १५ ते २० मजूर गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील मजूर काष्टी परिसरात ऊसतोडीसाठी वास्तव्यास आहेत.

एका अज्ञात ट्रॅक्टरने शेतातील उभ्या मिरचीच्या पिकाचे नुकसान केल्याचा संशय स्थानिकांनी या मजुरांवर घेतला. याच कारणावरून संतप्त जमावाने मजुरांच्या पालात घुसून दगड, ऊस आणि काठ्यांनी हल्ला चढवला.
हा हल्ला इतका भीषण होता की, हल्लेखोरांनी लहान मुले आणि महिलांनाही सोडले नाही. ३ वर्षांचा चिमुरडा आणि ११ वर्षांच्या मुलाला या मारहाणीत गंभीर दुखापत झाली आहे.
जखमींमध्ये काही महिलांचा समावेश असून, त्यात एका बाळंत महिलेचाही समावेश आहे.

“घाबरून पळत असताना आमचा पाठलाग करण्यात आला आणि लज्जास्पद कृत्य करण्यात आले,” असा खळबळजनक आरोप पीडित महिलांनी केला आहे.
मजुरांच्या अंगावर मारहाणीचे मोठे वळ उमटले आहेत. पीडितांनी दिलेल्या माहितीनुसार, जमावाने मारहाण करत जातिवाचक शिवीगाळ केली. मजुरीसाठी आलेल्या या कुटुंबांमध्ये सध्या दहशतीचे वातावरण पसरले आहे.
घटनेची माहिती मिळताच परिसरात तणाव निर्माण झाला होता. पीडित मजुरांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशन गाठून आपबिती सांगितली. सध्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून, दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
स्रोत:(पीडितांच्या मुलाखत)
