दिनांक ३० नोव्हेंबर २०२४,श्रीगोंदा:
श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दाखल गुन्ह्याच्या संदर्भात पीडित महिलेला व दलित कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्यावर करण्यात आला आहे. या संदर्भात न्याय मिळावा, आरोपींना अटक करण्यात यावी, तसेच पोलीस निरीक्षक शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी, या मागणीसाठी दलित कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, अहिल्यानगर येथे आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

तक्रारीनुसार, आरोपी खुलेआम गज, काठ्या व तलवारी घेऊन फिरत असून पीडित महिलेसह कुटुंबाला जिवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. याबाबत तक्रार करताना पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांनी तक्रारदार महिलेशी अशोभनीय वक्तव्य केले व दलित कार्यकर्त्यांवरही अपमानास्पद टिप्पणी करत जातीय द्वेषभावना उफाळून आणल्याचा आरोप करण्यात आला आहे.

किरण शिंदे यांच्यावर जामनेर येथे देखील दलित व भिल्ल समाजावर अन्याय केल्याचा आरोप आहे. त्यावेळी जातीय वाद पेटवून समाजात तेढ निर्माण केल्याने त्यांची बदली श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे करण्यात आली होती. मात्र, श्रीगोंद्यातही त्यांच्या कार्यपद्धतीमुळे दलित समाज असुरक्षित व अस्वस्थ असल्याचा आरोप स्थानिक कार्यकर्त्यांनी केला आहे.

दलित कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे की:
आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी, पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना निलंबित करण्यात यावे, व श्रीगोंद्यातील दलितांवरील अन्याय थांबवून समाजात शांतता निर्माण व्हावी.

तक्रारदार व कार्यकर्त्यांनी सांगितले की, मागण्या मान्य न झाल्यास दिनांक ४ डिसेंबर २०२४ पासून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल.
स्रोत:(पीडिताचे निवेदन)
