दिनांक ८ एप्रिल २०२५ चांडगाव, श्रीगोंदा:
प्रतिनिधी पत्रकार: संभाजी घोडके

चांडगाव गावात नव्याने उभारण्यात आलेला बस थांबा चुकीच्या ठिकाणी बांधण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. ज्या जागी पूर्वी एस.टी. थांबत होती, त्या ठिकाणी नव्याने बस थांबा न उभारता अन्यत्र थांबा उभारण्यात आल्यामुळे प्रवाशांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

या नव्याने उभारण्यात आलेल्या बस स्टॉप परिसरात काटेरी झुडपं, बाभळीचे गवत आणि घाण साचलेली असून त्या ठिकाणी अत्यंत दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे. बस थांब्याची दुरवस्था झाल्याने प्रवाशांना आणि गावकऱ्यांना बसची वाट पाहताना त्रास सहन करावा लागत आहे.

या संपूर्ण प्रकरणाकडे चांडगाव ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. स्थानिक नागरिकांमध्ये या बाबतीत तीव्र असंतोष निर्माण झाला असून लवकरात लवकर योग्य ती कारवाई न झाल्यास जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल.

या विषयाची गंभीर दखल घेत शिवसेना उपतालुकाप्रमुख संभाजी घोडके यांनी चांडगाव ग्रामपंचायतीला इशारा दिला आहे की, लवकरात लवकर बस थांब्याची स्वच्छता करून तो योग्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावा. अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा सज्जड इशारा त्यांनी दिला आहे.

या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतने तात्काळ पावले उचलून बस थांब्याची स्वच्छता करावी आणि बस थांबा योग्य जागी स्थलांतरित करावा, हीच ग्रामस्थांची मागणी आहे.
स्रोत:(पत्रकार संभाजी घोडके)
