दिनांक ८ एप्रिल २०२५ शिर्डी/श्रीगोंदा:
शिर्डीतील भिक्षेकरू वसतीगृहात राहणाऱ्या दहाजणांपैकी चार जणांचा मृत्यू झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या मृत्यू प्रकरणानंतर संबंधित वसतीगृह प्रशासन तसेच जिल्हा रुग्णालय आणि विसापूर बेगर होम प्रशासनावर मृत व्यक्तींच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केले आहेत.

मृत्यू झालेल्यांची नावे अशोक बोरसे, सारंगधर वाघमारे, प्रवीण घोरपडे आणि इसाक शेख अशी असून, हे सर्वजण श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर बेगर होममध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले होते. या दहा जणांपैकी त्रास जाणवत असल्याने त्यांना रविवारी जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर येथे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या पार्श्वभूमीवर मृत व्यक्तींच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर निष्काळजीपणा केल्याचा आरोप करत, “रुग्णांना बांधून ठेवण्यात आले. त्यांना पाणीही देण्यात आले नाही. रुग्णालयाच्या आणि विसापूर प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच ही घटना घडली आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच जबाबदार व्यक्तींवर गुन्हे दाखल न करता मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

या घटनेची पार्श्वभूमी पाहता, काही दिवसांपूर्वी शिर्डी पोलिसांनी शहरातील अवैध दारू, मटका, जुगार, गुटखा व इतर गैरव्यवसायांवर धडक कारवाई सुरू केली होती. त्याच मोहिमेअंतर्गत भिक्षेकरूंच्या वसतीगृहातील ७२ जणांना (६० पुरुष व १२ महिला) ताब्यात घेण्यात आलं होतं. भाविकांना त्रास देणाऱ्या, नशेत पैसे मागणाऱ्या या भिक्षेकरूंना आरोग्य तपासणीनंतर न्यायालयाच्या आदेशाने विसापूर येथे हलवण्यात आले होते.

या संदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश चव्हान यांनी खुलासा करताना सांगितलं की, “रुग्णांची प्रकृती अगोदरच गंभीर होती. त्यांचे व्यसनमुक्तीसाठी उपचार सुरू होते. काही रुग्ण आक्रमक व अस्थिर असल्यामुळे त्यांच्या दोन बोटांना बांधण्यात आलं होतं.” मात्र या खुलाशावर नातेवाईक समाधानकारक उत्तर देत नाहीत.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)
