निग्रोधची भेट
सुसीम मारला गेल्या नंतर खरं तर एका सेविकेने शिलावतीला येथून बाहेर पडण्यास मदत केली. शिलावतीला भीती वाटत होती की अशोक आपल्याला जिवंत ठेवील का नाही ? माझ्या पोटातील बाळाचे काय होईल ? या चिंतेने व्याकूळ झाली. तेव्हा ती त्या रस्त्याने एका जंगलात जाऊन पोहोचली. सगळीकडे जंगलच. माणार कोठे ? ती जंगलात सारखी भटकत होती. आता ती फार थकली होती.

तिला चालवतही नव्हते . आता काय होणार ह्या काळजीने ती चिंतीत झाली . त्याच रस्त्यावरून एक वृद्ध चालला होता. त्याची नजर शिलावतीवर गेली. तिची ती अवस्था त्याने तिच्याजवळ जाऊन पाहिली. त्याच्या लक्षात आले ही कोणातरी मोठ्या घराण्यातील स्त्री आहे . पण आता ह्या घडीला तर तिला मदत करणे आवश्यक आहे . तिला धड चालवतही नव्हते आणि बोलवतही नव्हते . त्याने तिला आपल्या घरी येण्याची विनंती केली . तिलाही जरा बरे वाटले . ती त्याच्या मदतीने त्याच्या घरी निघाली . ” बेटी , थोडासा त्रास सहन कर .
हे बघ माझं घर जवळंच आहे . ” शिलावतीच्या पोटात एकदम कळ आली . ती एक निग्रोध वृक्षाखाली दगडाच्या आधाराने उभी राहिली . आता एक पाऊलदेखील उचलणं अवघड झाले . ” मुली , घाबरू नकोस . तू येथेच विश्रांती घे. मी माझ्या पत्नीला घेऊन आलोच. ” थोड्याच वेळात दोघेही शिलावतीजवळ आले. तेथेच निग्रोध वृक्षाच्या खाली बुंध्याच्या आडोशाला तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. निग्रोध वृक्षाखाली त्याचा जन्म झाला म्हणून त्याचे नाव निग्रोध ठेवण्यात आले. शिलावती व निग्रोधचं पालनपोषण त्या जंगलात होत होते. राजघराण्यातील शिलावती जंगलात राहात होती .
पुढे शिलावतीची एका बौद्ध भिक्खूशी भेट झाली. तेव्हा त्या बौद्ध भिक्खूने शिलावतीकडे निग्रोधची मागणी केली . निग्रोधला त्याच्या स्वाधीन करून ती म्हणाली ” याला चांगले शिक्षण द्या , चांगला मोठा करा , हा मोठा होईल माणूस म्हणून . सम्राट म्हणून नाही. ” आईची परवानगी घेऊन निग्रोध भन्तेच्या मागे निघाला . तेव्हा शिलावतीचे डोळे भरून आले . एका बलाढ्य राजाचा धनी आज भिक्षापात्र हाती घेऊन चालताना दारोदार भिक्षा मागत आहे . तेव्हा बौद्ध भिक्खू शिलावतीला म्हणाला, ” भगिनी , तुझ्या मुलाला मी भलत्याच वाटेने घेऊन जात आहे असे तुला वाटत असेल तर अजूनही तू मोकळ्या मनाने निर्णय करण्यास मोकळी आहेस . ” ” माझा निर्णय झाला आहे . तो पराक्रमी योद्धा किंवा सत्ताधारी बनायला नको . पराक्रमाला व सत्तेला विखारी काटे फुटतात .
त्यामुळे माणसाचे प्राणही अगदी स्वस्त होतात . त्याच्यापुढे नातीगोतीसुद्धा विसरली जातात . राग लोभाने व्यापलेल्या क्षमा , जगाचा मला तर वीट आला आहे . या फे – यातून माझा मुलगा मुक्त होऊन प्रेम , दया , शांती या विचाराने त्याचे जीवन प्रकाशमय झालेले मला आवडेल. म्हणून आपण त्याला तथागत गौतम बुद्धांनी दिलेल्या विचार मार्गावर घेऊन जा . मी ही आता उपासिका म्हणून नित्य विहारात जाईन . मलाही शांती लाभेल. ” “ भगिनी, कुमाराची योग्य ती काळजी घेतली जाईल व योग्य शिक्षणही दिले जाईल. ” इतके दिवस पुतळ्यासारख्या मख्ख असलेल्या शिलावतीच्या चेह – यावर हास्य दिसले . मुलाच्या काळजीतून मुक्त झाली .
योग्य ठिकाणी मुलगा गेला याचा आनंद होता . आपल्या जीवनाच्या पाय – या चढत चढत निग्रोध आता बौद्ध धम्माचा अभ्यासक व प्रसारक झाला होता . तो भिक्खूच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करीत होता . बौद्धधम्म , संघ यांचा उत्तम अभ्यास केला होता . त्रिपिटिकांचे ज्ञान चांगल्या पद्धतीने आत्मसात केलेले होते . इकडे अशोकाच्या डोळ्यांपुढे सगळा इतिहास सरकत होता . झोप तर पळून गेली होती . अनेक प्रसंग जसेच्या तसे समोर उभे आहेत असा भास होत होता . अनेक राजवैद्यांनी औषधे दिली . त्याचाही आता कंटाळा आला होता . एकाही औषधाची मात्रा लागू पडली नाही . ‘ मी हे काय करून बसलो .
राज्याच्या हव्यासापायी माझी रक्तामासाची अन् नात्यागोत्याची माणसं मारली … ‘ घणाचे घाव डोक्यात पडतात असे त्याला वाटले . आता अशोकाने वैद्यांसह सर्वांना भेटण्यास बंदी घातली. भेटण्यास अथवा औषध- उपचारासाठी कोणीही येऊ नये असा हुकूमच काढला. अशोकाचा अधिकारीवर्गही चिंतीत झाला. अशोकाची प्रकृतीही खालावत होती . सर्व काळजीत पडले होते. आचार्य उपगुप्त यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिपिटकांवर निग्रोध उत्तम प्रवचन देत असे . एके दिवशी विश्रांतीच्या वेळी भन्ते उपगुप्त निग्रोधला म्हणाले, “ सम्राट खूप आजारी आहेत, माझा संदेश त्यांना पोहोचवायचा आहे .
उद्या हे काम तू करशील ? पण नको मीच जाईन सकाळी . ” ” नाही आचार्य , मी जातो . ” ” अरे , पण का ? ” ” ज्या सिंहासनासाठी माझ्या पिताजींचा अंत झाला . माझे अनेक काका मृत्युमुखी पडले कलिंगदेशाचा भयानक नरसंहार झाला त्या सिंहासनाला मला एकदा तरी पाहावयाचे आहे . पण त्या सिंहासनाचा माझ्या मनात कसलाच मोह नाही . अशा मोहापासून आता कितीतरी दूर दूर गेलो आहे. ” निरनिराळे मोह हे मानवाच्या प्रगतीतील मोठे अडथळे आहेत याची मला चांगली जाणीव झाली आहे . ” तर मग ठीक आहे .
” ” पण आपण कोणता संदेश देणार होता ते तरी सांगा , ” ” बहुजन हिताय , बहुजन सुखाय ” दुस – या दिवशी भिक्षापात्र हातात घेऊन निग्रोध अशोकाच्या महालाजवळून जात होता . त्या क्षणी अशोक खिडकीतून बाहेर पहात होता आणि निग्रोध त्याच्या दृष्टीस पडला . का कोणास ठाऊक पण अशोकाला त्याच्याविषयी ओढ निर्माण झाली. आणि आपल्या सेवकाकरवी निग्रोधला बोलविण्यासाठी निरोप केला . निरोप मिळताच निग्रोधने शांत धीमी पावले टाकत तेथे प्रवेश केला. चेहऱ्यावर दिव्य तेज झळाळत होते. अशोकाच्या मनात चाललेली खळबळ थांबल्यासारखी झाली. आणि मनातील क्रोधावर प्रेमाची लकेर चमकून गेली. अशोकाने अनेक राजवैद्यांना प्रवेश बंद केला होता अन् हा बालक कोण कोठून आला आणि सम्राटांनी त्याला बोलावून घेतले .
खरं तर निग्रोध आल्याचं राधागुप्ताना अजिबात आवडलं नव्हतं . राधागुप्तांच्या सल्ल्यावर अशोक चालत होता . महामंत्री म्हणून ते काम पहात होते . महामंत्री जो सल्ला देतील त्या प्रमाणेच अशोक आपलं काम करीत असतं . महामंत्री सांगतील त्या प्रमाणेच अशोक वागत असे . पण आज स्वतःच अशोकांनी बाल यतीला ( श्रामणेरला ) बोलावले . त्याला विनम्रपणे अभिवादन केले आणि आपणास हवे त्या आसनावर जाऊन बसावं . अशी विनंती करताच तो अशोकाच्या खांद्यावर हात ठेवून सिंहासनावर जाऊन बसला आणि हसत म्हणाला , ” भोजनाचे तंत्र या राजवाड्यात , सांभाळणे अवघड आहे . मी भिक्षेच्या अन्नावर जगतो . ” अशोकाने यंयातीचा चेहरा न्याहाळताच अगदी शिलावतीवहिनी सारखाच दिसला आणि एकमेकांची खूण पटली . अशोकाच्या मनात विचार आला – ‘ हा श्रामणेर दुसरा तिसरा कोणी नसून सुसीमदादाचा युवराज आहे .
आज दादा असता तर साम्रज्याचा युवराज म्हणून मिरवला असता . याच्या भोजनासाठी अनेक माणसं कामाला असती , पण आज याच्या हातात भिक्षापात्र. ‘ अशोकाला फारच वाईट वाटले . पुन्हा मन सैरभैर धावू लागले . ही वेळ बाल यतीवर का ? डोकं सुन्न झाले . तेव्हा “ सम्राट , आपण त्रास करून घेऊ नये . भिक्षा ही एक दीक्षाच आहे . मी यावेळी तुमचा पुतण्या म्हणून येथे आलो नाही तर तुमचा एक हितचिंतक, तुमचा एक मित्र. आम्हाला … ” तेवढ्यात महेंद्रही तेथे धावत आला. त्याचाही थोडा वेळ सहवास लाभला. दोघा मध्ये थोडा संवाद झाला. महेंद्र म्हणाला , “ मी ही तथागताच्याच मार्गाने चालतो . ” ” आनंद आहे . बंधू , बुद्ध म्हणतात , ‘ अत्त दिप भव ‘ आपण बोलवाल तेव्हा येईन . ” तो चटकन मागे वळून चालूही लागला . नंतर निग्रोध व त्याच्या भिक्खू संघास अशोकाने निमंत्रण दिले . भोजन झाल्यावर निग्रोध यांनी सुंदर गोड शब्दात प्रवचन केले आणि अशोकालाही पूर्वी आपण कोणाचा तरी मुलगा आहोत, कोणाचा तरी भाऊ आहोत , आपल्यावर माया करणारी प्रेमळ माता आहे याची जाणीव झाली.
अशोकाच्या डोळ्यातील बेचैनी हळूहळू निघून गेली . त्यांनी इ.सन. पूर्व २६५ मध्ये निग्रोधाकडून बौद्ध धम्माचा स्वीकार केला . परंतु निग्रोधच्या भेटीमुळे आचरणात आणि वर्तनात बदल होऊन इ.सन.पू. २६० मध्ये प्रत्यक्ष धम्म कार्यास सुरूवात केली . त्यानंतर मानव , प्राणी , पक्षी , पृथ्वी आणि धम्म यावर अनेक प्रवचने झाली. बाल महेंद्रही त्या प्रवचनाला आवडीने येऊन बसत असे . अशोकाचे मन आता शांत झाले होते . आता नवीन मार्ग त्यांना सापडला होता . उडालेली झोप आता शांतपणे लागत होती . झोपेत होणारे भास तर केव्हाच पळून गेले होते . ” बहुजन हिताय बहुजन सुखाय ” संदेश दिला आणि निग्रोध म्हणाला ,
” बुद्धं सरणं गच्छामि धम्म सरणं गच्छामि संघ सरणं गच्छामि निग्रोधच्या पाठोपाठ अशोकानीही त्रिसरण पंचशील ग्रहण केले. नंतर अशोकाच्या वागण्यात, बोलण्यात, आचार, विचार आणि वर्तन यात खूप फरक पडला. तेव्हा राधागुप्ताला खूप राग आला. – कोण हे एवढेसे पोर ? याने काय जादू केली ? सम्राट रोज त्याच्या रस्त्याकडे डोळे लावून बसतात . मानव , प्राणी , पक्षी निसर्ग एकूणच सर्व बाबतीत अशोकाच्या मनामध्ये दयाभाव निर्माण झाला. ही परिवर्तनाची फार मोठी क्रांतीच झाली . दानशिलतेकडेही तो झुकू लागला. बौद्ध धम्म हा सर्वांसाठी एखाद्या दीपस्तंभासारखा आहे . बौद्ध धम्मात सर्वांना स्वातंत्र्य आहे . प्रत्येक जण आपले जीवन स्वतंत्रपणे जगतो याची जाणीव निर्माण झाली . वैर केल्याने वैर शांत होत नाही तर ते वाढते . मैत्रीने वैर नष्ट करता येते याची खात्री झाली . अशोकाने प्रथम राजवाड्यातील पाकखान्यामध्ये भोजनासाठी अनेक पशु – पक्षांची हत्या केली जात होती ती बंद केली आणि स्वतः तो अगदी साधेपणाने राहू लागला .
राधागुप्त व इतर अधिकारी मात्र त्रस्त होऊ लागले . कारण अशोक हा एवढ्या साधेपणाने वागतो , एवढेच नाही तर अशोकाने आज्ञा दिली की मला भेटण्यासाठी कोणी आणि कधी आले तर त्याला कोणी अडवू नये. थेट मला भेटण्याची त्यांना परवानगी आहे . मग मी भोजन घेत असेन किंवा विश्रांती घेत असेन , केव्हाही आणि कोठेही प्रजेने मला भेटून आपल्या अडचणी सांगाव्यात . हत्ती , घोडे , बैल , कोंबडे यांच्या शर्यती बंद केल्या . शिकार करणे बंद केले . मांसाहार बंद करण्यात आला . परंतु अशोकाची असंधिमित्राही आजारी असल्यामुळे ती याला थोडी अपवाद होती . राधागुप्त मनातच म्हणाले , ” कोण हा बौद्ध भिक्खू ? आला काय आणि सम्राटाचे हे परिवर्तन झाले काय ? एवढंसं पोर पण काय जादू केली की अशोकाने हातातून शस्त्र खाली ठेवले .

हे योग्य नाही झाले मनातल्या मनात ते खूपच चिडले होते . पण अशोकाची खात्री झाली होती.तलवारीच्या आणि शस्त्राच्या जोरावर राज्य न जिंकता दया , प्रेम व शांती , बंधुत्वाच्या मार्गावर चालून राज्य करता येईल याची अशोकाला मनोमन खात्री पटली आणि तसा निश्चयही केला . ‘ जगाच्या इतिहासात अशोकच एक राजा होऊन गेली की एकदाच युद्ध करावे लागले . त्यानंतर त्याने हाती शस्त्रच धरले नाही . तरीही तो जनकल्याणी व धम्माचा उद्धारक म्हणजेच धम्मदीप ठरला . त्याच्या ज्ञानप्रकाशाच्या फांद्या भारतातच नव्हे तर जगातील अनेक देशांपर्यंत पोहोचल्या हे कोणालाही नाकारता येत नाही. ज्या दिवशी शस्त्राचा त्याग करून धम्माचा मार्ग पत्करला तो दिवस हा विजयादशमीचा म्हणून आजही त्या दिवसाला फार महत्त्व आहे . पुढे याच दिवशी बोधीसत्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर इ.स. १ ९ ५६ रोजी नागपूर येथे धम्म दीक्षा दिली . ‘ भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ‘ हा मानवाला आदर्शाच्या मार्गावर नेणारा मौलिक ग्रंथ लिहिला . नागनदीच्या तिरी हि नागपूरची धम्मभूमी सर्वांना प्रेरणा देत आहे.
क्रमशः
स्रोत:(श्रीनिवास भालेराव यांच्या प्रजापिता सम्राट अशोक या पुस्तकातुन)
