प्रजापिता सम्राट अशोक (भाग २२)

उत्सव पाटलीपुत्रचा

अशोकाची राजधानी पाटलीपुत्र याविषयी फाहियान म्हणतो , “ पाटलीपुत्र ही अशोकाची राजधानी होती . शहराच्या भिंती आता पडलेल्या आहेत राजवाड्याच्या भिंती आणि कमानी पाषाणाच्या आहेत . त्यावरील कोरीव काम मनाला मोहून टाकते . येथे अनेक सुंदर सुंदर विहारे आहेत . त्या विहारातून सहाशे ते एक हजार भिक्खू राहत असत .

https://bit.ly/bspmycityshrigonda

येथील भिक्खू फारच विद्वान होते . ” पाटलीपुत्र हे त्या काळी सर्वात मोठे शहर म्हणून गणले जात असे . येथील लोक श्रीमंत व सुखी होते . सत्कृत्य करण्यात येथील लोक एकमेकांत स्पर्धा करतात . पाटलीपुत्र शहराची लांबी १५ कि.मी. होती तर रुंदी अडीच कि.मी. सभोवती लाकडी तटबंदी होती . त्याला ६४ महादरवाजे , ५०० बुरुज होते . मॅगेस्येनीसने ‘ इंडिका ‘ ग्रंथात लिहिले आहे . ” प्रत्येक वर्षी दुस – या महिन्याच्या आठव्या दिवशी ते रथयात्रा काढत . ह्या रथयात्रेला फारच महत्त्व होते . या यात्रेत प्रत्येकाचा सहभाग असे .

रथ हा चारचाकी असे . त्या रथावर बांबूच्या साहाय्याने पाच मजली बांधकाम केले जात असे . त्या रथाचा आकार सुंदर पॅगोड्यासारखा दिसत असे . हा रथ साधारणपणे २० फूट उंचीचा असे . त्यावर पांढरा शुभ्र लोकरीचा कपडा चढविलेला असे . त्यावर तथागत गौतम बुद्धांच्या जीवनातील प्रसंग चित्रे रेखाटलेली असत . याशिवाय सोनेचांदी , रेशमी झालरीने ते सुशोभित केलेली असत . जवळजवळ २० ते २५ असे सुंदर सजवलेले रथ असत . हा उत्सव प्रत्येक घराघरातून मोठा आदरपूर्वक केला जात असे .

लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकजण यात सहभागी होत असत . पाटलीपुत्र नगरीत काषायवस्त्र धारण करून बौद्ध भिक्खू मोठ्या संख्येने सामील झालेले असत . उपासक , उपासिका यात मनोभावे सामील होत . सगळी नगरी फुलून गेलेली असे . नगरात रथाची भव्य मिरवणूक काढली जात असे . त्यावेळी त्यांच्यापुढे सुंदर नृत्य व गायन चालत असे . हा उत्सव सर्व बौद्ध राज्यात सर्वत्र चालत असे .

मशालीच्या प्रकाशात मिरवणुकीचा थाट असा आगळावेगळा असे . रस्ते सगळे माणसांनी फुललेले असत . हा सोहळा पाहून मन प्रसन्न व शांत होत असे . यातून बुद्ध तत्त्वज्ञानाचा व विचारांचा प्रसार व प्रचार लोकांमध्ये उत्तम प्रकारे केला जात असे. सम्राट अशोकाच्या काळात या उत्सवाला सामाजिक महत्त्व प्राप्त झाले होते . लोकांनी एकत्र यावे, एकत्र भोजन करावे, यात नृत्य, संगीत, मल्लयुद्ध व कलाप्रदर्शन यांचे आयोजन केले जात असे. ५०० नाट्यकलाकार आपल्या नाट्यातून लोकांचे मनोरंजन करीत . सुंदर व तरुण नृत्यांगना सुंदर नृत्य करीत . परंतु पुढे नृत्य बंद करण्यात आले.

क्रमशः
स्रोत:(श्रीनिवास भालेराव यांच्या प्रजापिता सम्राट अशोक या पुस्तकातुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading