प्रजापिता सम्राट अशोक (भाग २१)..

महामहिंद्र आणि संघमित्रा (शासनाचा दायदा):

अशोकाने धम्मासाठी अनमोल असे कार्य केलेच पण ज्याप्रमाणे गौतम बुद्धाचा पुत्र राहुल भिक्खू संघात सामील झाला, त्याप्रमाणे सम्राट अशोकाचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांनीही धम्मदीक्षा घेऊन भिक्खू संघत प्रवेश केला. बौद्ध धम्माच्या कार्यात व प्रसारात या दोघांचेही स्थान फारच अत्युच्च कोटीतील आहे. त्यांची आई विदिशादेवी ही बौद्ध होती. महेंद्रचा जन्म इ.स.पू. २८४ मध्ये झाला. तर संघमित्राचा जन्म इ.स. २८२ मध्ये झाला.

https://bit.ly/bspmycityshrigonda

अशोकारामविहार तीन वर्षात बांधून पूर्ण करण्यात आले. त्यानंतर राजा सुसालंकृत होऊन नगरातून विहारात आला. तेथे जमलेल्या भिक्खू संघासमोर उभं राहून विचारले , ” भन्ते, मी (बुद्ध) शासनाचा दायद (वारसा) आहे की नाही ? ” तेव्हा मोग्घलीपुत्र तिष्य स्थिवरांनी उत्तर दिले , “ महाराज , एवढ्याने (वारसा) होता येत नाही . यास प्रत्यय किंवा उपास्यापक म्हटले जाते . एखाद्याने पृथ्वीवरील सर्व भिक्खूसाठी अन्न, चिवरे, औषधे , विहारे ( प्रत्ययराशी ) दिले तरी त्याला दायदा (वारसा) म्हणता येत नाही. तर … ”” भन्ते , शासनाचा दायदा कसे होता येते ? ” ” महाराज , जो धनवान किंवा गरीब असो , आपल्या पुत्रास प्रव्रजक करतो त्यालाच शासनाचा दायदा (वारसा) मानले जाते .

” तेव्हा अशोकांनी महेंद्र व संघमित्राकडे पाहिले आणि विचारले , “ तुम्ही प्रव्रजक होणार काय ? ” खरं तर ते दोघेही अगोदरपासूनच बौद्ध धम्माच्या विचारांनी प्रेरित झाले होते . आईनेच या विचारांचे बाळकडू त्यांना पाजले होते . स्वतः विदिशाच बौद्ध धम्माच्या विचारात वाढली होती . आणि निग्रोध व उपगुप्त यांच्या व्याख्यानांचाही त्यांच्या मनावर फारच खोलवर परिणाम झाला होता . चांगली संधी चालून आली असे त्यांना वाटले . दोघांनी प्रव्रजक होण्यासाठी होकार दिला. तेव्हा महेंद्र आणि संघमित्रा यांना प्रव्रजा (श्रमणेर) देण्यात आली . आणि महेंद्रला भिक्खू संघात तर संघमित्राला भिक्खूणी संघात प्रवेश देण्यात आला .

मोग्घलीपुत्र तिष्यही तेथे होते. भिक्खू बनण्यासाठी महेंद्रला उपसंपदा मध्यान्तिक यांनी दिली . त्यावेळ महेंद्रकुमाराचे वय होते अवघे वीस वर्षे . संघमित्राला प्रव्रजित केले अयुपदा थेरीने, उपाध्याया होती धम्मपाल थेरी. संघमित्रा त्यावेळी अठरा वर्षांची होती .. महेंद्र याने ज्या दिवशी उपसंपदा घेतली त्याच दिवशी त्याला अर्हतपद प्राप्त झाले. भिक्खू झाल्यानंतर मोग्घलीपुत्र तिष्य याच्या मार्गदर्शनाखाली तीन वर्षे धम्माचा अभ्यास केला. महेंद्रने अगदी अल्प अवधीत त्रिपिटक आत्मसात केले. पुढे श्रीलंकेत जाऊन धम्मप्रसाराचे काम केले. त्याच्यासोबत इटिष्य, अतीय, सबळ भदसाल हेही श्रीलंकेला गेले होते .

म्हणजेच ताम्रपर्णी , सिंहलदीप , सिंहल अशा नावाने श्रीलंकेला ओळखले जाते . त्यावेळी ताम्रपर्णी ( श्रीलंका ) येथे देवनामप्रिय तिस्साम हा राज्य करत होता . त्यावेळी त्याचा राज्याभिषेक होता . त्याच्यासाठी अशोकांनी भेटवस्तू पाठविल्या होत्या व सोबत धम्मप्रसारासाठी महेंद्र यास पाठवत आहे असा निरोप दिला होता. महेंद्र विदिशा नगरीच्या मार्गावरून प्रवास करीत असताना एका विहारात महेंद्रची माता विदिशाची भेट झाली. काही दिवस तेथे राहून तो ज्येष्ठ पौणिमेच्या दिवशी अनुराधापूरच्या पूर्वेस मिश्रक पर्वतावर (चैत्यपर्वत) पोहोचला. त्या दिवशी ताम्रपर्णीत ज्येष्ठ मूळ नक्षत्र उत्सव सुरू झाला होता. उत्सवासाठी शिकार करण्याची (क्रीडा) अमात्यांना आज्ञा करण्यात आली होती . त्याप्रमाणे ते क्रीडा करण्यासाठी त्या ठिकाणी आले .

मृग गवत खात होते. गवत खात असताना मृगांना मारणे योग्य नाही म्हणून टाळी वाजवून सावजाला सावध केले. तसे मृग आम्रस्थळाच्या दिशेने धावत सुटले. राजा त्यांचा पाठलाग करीत आम्रस्थावर आला. मृग स्थविरजवळ गेले आणि दिसेनासे झाले . ” तिष्य, तिष्य इकडे ये, ” राजाला नावाने हाक मारणारा कोणीही नव्हता . त्यामुळे या काषाय वस्त्रातील मनुष्य मला नावाने संबोधतोय याचा राजाला राग आला. तो म्हणाला, ” तू कोण ? ” महेंद्र म्हणाला, “ आम्ही गौतम बुद्धाच्या धम्माचे श्रावक श्रमण आहोत . ” आम्ही बुद्ध भूमीतून आलो आहोत . अशोकाने दिलेल्या निरोपाची राजाला आठवण झाली . त्याला धम्माबद्दलची थोडी कल्पनाही आली होती . त्याने लगेच ताडले की हा सम्राट अशोकाचा पुत्र महेंद्र . त्याने आपल्या हातातील शस्त्र बाजूला ठेवून महेंद्रला अभिवादन केले व एका बाजूला बसला . राजाबरोबर ४० हजार पुरूष क्रीडेसाठी ( शिकार ) आले होते . ते एका बाजूला जाऊन उभे राहिले . महेंद्रने आपल्याबरोबर आलेल्या भिक्खूची ओळख करून दिली . “ यावेळी जम्बुदीपात ( भारतात ) अनेक श्रमण आहेत काय ? ” होय महाराज , यावेळी संपूर्ण जम्बुदीप काषायवस्त्रांनी झगमगून गेलेला आहे . औपचारिक संभाषण झाल्यावर महेंद्रने जाणून घेतले की राजा हुशार आहे . हा धम्मआज्ञा जाणू शकेल . असा विचार करून अत्यंत सोप्या पण प्रभावी शब्दात चुलहात्यि पदोपम सुताचा राजाला उपदेश केला .

राजा व त्याचे सैन्य इतके प्रभावित झाले की धम्मोपदेशाच्या शेवटी राजा व त्याच्या ४४ हजार सैन्याने बौद्ध धम्माचा स्वीकार केला . बुद्ध , धम्म , संघ यास तो शरण गेला . त्यानंतर राजाला समचित सुत्ताचा उपदेश केला. पेतवल्यु, विभानवबत्यू, सच्च समसुत्त बावपंडीत सत्तु यावर व्याख्याने देण्यात आली . त्यानंतर रात्री मुक्कामासाठी चैत्य पर्वताकडे निघाले . त्यानंतर देवनाम प्रिय राजा म्हणाला , ” चैत्यपर्वत दूर आहे . आपण नंदनवनात रहावे . ” पण ते नगरापासून जवळ असल्याने तेथे योग्य नाही असे महेंद्रला वाटले . महेंद्र आपल्या साथीदारांसह महामेधवनात राहिला . दुसरे दिवशी राजाने दान देण्याची इच्छा प्रगट केली . त्याला मान्यता दिल्यानंतर संघ आराम ( बिहार ) स्थविर महेंद्रासाठी बांधले .

हे ताम्रपर्णी ( श्रीलंका ) येथील पहिले महाविहार होय . तेथे उत्कृष्ट लेण्या खोदण्यात आल्या . त्या संघाला अर्पण करण्यात आल्या . त्या पौर्णिमेच्या दिवशी ६२ श्रामणेरांना भिक्खू होण्याची उपसंपदा दिली . सिंहालदीपचा राजा व तिष्य महास्थविर यांच्याच बोलणी होऊन सुमन श्रामणेरला जम्बुदीपात ( भारतात ) सम्राट अशोकाकडे पाठविण्यात आले .. सिंहलदीपात तथागताची रक्षा पाठविण्याची त्यास विनंती करण्यात आली . त्याचबरोबर येथील उपासिकांना माहिती देण्यासाठी संघमित्रालाही पाठवावे आणि तिच्याजवळ बोधीवृक्षाची फांदी पाठवण्यात यावी . सुमन श्रामणेरने भारतात येऊन ही सर्व माहिती सम्राट अशोकास दिली . सुमन श्रामणेरजवळ दिलेली रक्षा सिंहलदीपात आणली . ती मोठ्या समारंभपूर्वक मिश्रकपर्वत येथे चैत्यात ठेवण्यात आली . तेव्हापासून त्या पर्वताला चैत्यगिरी नाव पडले . सिंहलदीपच्या राजाला मान देऊन सम्राट अशोकाने संघमित्राला श्रीलंकेत पाठविले . पाठवताना धम्मदीप अशोकाने गळ्यापर्यंत पाण्यात जाऊन महाबोधीवृक्षाची फांदी उचलून जहाजात ठेवली . संघमित्रासह तिच्या थेरी साथीदारिणी जहाजात बसल्या . जहाज प्रवास करून जम्बुकोलपट्टणला लागले . तेथून चौथ्या दिवशी अनुराधापूरला आले . या ठिकाणी थेरी संघमित्राकडून पाचशे स्त्रियांना प्रव्रजित करण्यात आले .

या ठिकाणी संघमित्रा व उपासिका यांना राहण्यासाठी विहार बांधण्यात आले . सम्बुद्धांचा सुंदर धम्म , बुद्धवचन याचा प्रचार व प्रसार फारच झपाट्याने केला. या महान धम्मदीप सम्राट अशोकाने जनकल्याणाची कामे केलीच पण स्वतःच्या मुलांनाही धम्मदीपाचा प्रकाश दाखविण्यासाठी भिक्खू संघात प्रवेश करण्यास परवानगी दिली, ती जगाच्या इतिहासात स्तुत्यच आहे, गौरवास्पद आहे. स्वतः केले मग सांगितले बोलण्यापेक्षा कृती श्रेष्ठ त्यांनी आपल्या कार्यातून दाखविले. संघमित्राने आणलेल्या फांदीचा महान वृक्ष आजही बौद्ध विचारांची साक्षी देत उभा आहे . त्याच महाबोधीवृक्षाच्या एका फांदीचे १९५६ ला त्या वेळच्या श्रीलंकेच्या पंतप्रधान सिरिमावो बंदरनायके यांनी भारतात आणून समारंभपूर्वक दिल्लीच्या बुद्धजयंती पार्कमध्ये वृक्षारोपण केले .

तो वृक्ष जोमाने वाढतो आहे . ही फारच महत्त्वाची बाब आहे . जगातील वैभवशाली सम्राटाची दोन्ही मुले बौद्ध धम्माच्या कार्यासाठी कर्तव्यदक्षपणे अहोरात्र काम करीत राहिले . धन्य तो धम्मदीप अशोक , धन्य ते महेंद्र आणि संघमित्रा ! यांच्या कार्यामुळेच बौद्ध धम्माची ज्योत तेवत आहे . आजही श्रीलंकेत महेंद्र व संघमित्राच्या आगमनाचे दिवस मोठ्या उत्साहाने साजरे करतात. हा आदर प्रत्येकाच्या मनामध्ये असला पाहिजे. महापात्र पद अशोकाने निर्माण करून त्यावर सर्व धार्मिक कामाची जबाबदारी टाकण्यात आली होती. यात धम्माची स्थापना, घोषणा, धार्मिकव्यक्तींचे संरक्षण इत्यादी गोष्टी होत्या. बौद्ध धम्माचा स्वीकार केल्यानंतर मात्र शिकार करणे, मासेमारी, नृत्य, दारू पिणे इत्यादी गोष्टींवर बंदी घालण्यात आली होती.अशोक राजाने प्रजेला पुत्राप्रमाणे सांभाळले . त्याचे प्रजेवर खूप प्रेम होते . प्रजेच्या बाबतीत तो प्रेमळ होता . अनेक उदाहरणांवरून आपल्या लक्षात येते .

धम्म म्हणजे नीती , कर्तव्य , सदाचार या व्यापक अर्ताने वापरला आहे . दान देणे हे पवित्र काम समजले जाते . धम्मदान – हे सर्वात श्रेष्ठदान आहे. धम्माचा परिचय, धम्मसंबंध, धम्मविभागणी सर्व दानांमध्ये विद्यादान श्रेष्ठ मानले आहे . धम्मपरिचय – माता, पिता, पुत्रप्रेम, बंधू – भगिनी नातेसंबंध , धम्मनिष्ठ असावे , आज्ञा पाळणे पुत्राचा धम्म आहे. मुलाला सन्मार्गाला लावणे हा पित्याचा धम्म. धम्मविभागणी- धम्माची विभागणी योग्य पद्धतीन करावी. आपण कोणत्या विभागात मोडतो, आपली विभागणी धम्मविचाराने करावी असे त्यांनी अकराव्या शिलालेखात सांगितले आहे . शिलालेख दुसरा – त्यामध्ये गुरू – शिष्य याचा उपदेश दिला आहे. सत्यवद धम्मचर, मातृदेवोभव, पितृदेवोभव, आचार्य देवोभव, अतिथी देवोभव, गौतम बुद्धाने जो उपदेश केला तो हाच.. आपल्या सभोवती असणाऱ्या माणसांची मनोभावे सेवा करणे म्हणजे दिशांची पूजा करणे होय. ही भगवान बुद्धांची शिकवण अशोकाने आपल्या जीवनात तंतोतंत पाळली. अमलात आणली लोकांना धम्माचे ज्ञान देण्यासाठी शेवटपर्यंत झटला .

सम्राटाभोवती आता राजेरजवाडे नव्हते . वैभव नव्हते . बौद्ध पंडित भिक्खू आणि सामान्य प्रजा हेच आता सम्राटाचे जग झाले होते. परराष्ट्राविषयी त्याचे धोरण पूर्ण बदलून गेले होते. सैनिकी शक्तीने विजय मिळवण्यापेक्ष प्रेमाने सर्वांना जिंकायचे. हृदयपरिवर्तनाच्या मार्गाने जग जिंकायचे असे अशोकाचे कर्तृत्त्व आता होऊ लागले होते. अहिंसा, दया आणि सत्य यां सूत्रांचा प्रचार हे जीवितकार्य बनले .

https://bit.ly/bspmycityshrigonda

एका विराट शक्तीच्या सम्राटाने न्याय , नीती आणि बंधुता याचा प्रसार करीत जगाचा मोहरा बदलून टाकण्याचा निश्चय केला. त्याला सारे जग जिंकता आले नाही. पण जगावर त्याने विलक्षण मोहिनी घातली. त्याच्या कार्यामुळे त्याला दिगंत कीर्ती लाभली. बौद्धधम्मावर अशोकाची फार मोठी श्रद्धा होती. धम्मासाठी जे जे करता येईल ते ते त्यांनी केले. अशोकाने आपला धम्म कधीही लोकांवर लादला नाही. अशोकाचे आणि बौद्ध धम्माचे नाते अतूट आहे . जेव्हा अशोकाचे नाव घेतले जाते तेव्हा बौद्ध धम्माचे नाव येतेच आणि जेव्हा बौद्ध धम्माचे नाव घेतले जाते तेव्हा धम्मदीप सम्राट अशोकाचे नाव यतेच.

क्रमशः
स्रोत:(श्रीनिवास भालेराव यांच्या प्रजापिता सम्राट अशोक या पुस्तकातुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading