प्रजापिता सम्राट अशोक (भाग २६).

सम्राट अशोकाचा परिवार

राज लोकांत बहुपत्नीत्वाची रूढी त्या काळात होती. अशोकाला पाच राण्या होत्या असे सांगितले जाते. १) पहिली राणी विदिशा, विदिश नगरीची. तिची दोन मुलं एक महेंद्र व दुसरी संघमित्रा ज्यांनी पूर्णपणे धम्माच्या कार्यास वाहून घेतले. विदिशा कधीच पाटलीपुत्राला आली नाही. विदिशाने आपले जीवन धम्मकार्यात व्यतीत केले. २) असंधिमित्रा ही अशोकाची पट्टराणी होती. अशोकाच्या राज्यभिषेकाच्या २६ व्या वर्षी तिचा मृत्यू झाला. ३) चारुवाकी – ही पण अशोकाची राणी होती. तिला तिवर नावाचा मुलगा झाला होता. ४) चौथी राणी होती पद्मावती. ही कुमार कुणालची माता होती. ५) चारुवाकी आणि पद्मावती ह्या आपल्या मुलांच्या नावावरून ओळखल्या जातात. कुणाल आणि तिवर हे त्यांचे उपनाव होते.

https://bit.ly/bspmycityshrigonda

कुणालचे नाव धर्मवर्धन होते. त्याचे डोळे हिमालयातील कुणाल पक्षासारखे होते म्हणून त्याला कुणाल असे म्हणतात, असे म्हटले जाते की, कुणालच्या जन्मापूर्वी काही काळ अगोदर धम्मदीप अशोकांनी ८४,००० विहार ( स्तूप ) बांधले. तिवरचे डोळे शिकाऱ्याप्रमाणे तीक्ष्ण होते. म्हणून त्याला तिवर असे म्हटले जात असे. कुणाल हा अशोकाचा फार आवडता मुलगा होता .

तिष्यरक्षिता कुणालवर भाळली. परंतु, कुणाल तिला आपल्या मातेच्या ठिकाणी पाहत होता. त्यामुळे तिष्यरक्षिता कुणालचा द्वेष करू लागली. एकदा अशोक आजारी पडला तेव्हा तिष्यरक्षिताने अशोकाची खूप सेवा केली. तेव्हा अशोकाला फार आनंद वाटला आणि त्याच खुशीने अशोकाने एक दिवसासाठी साम्रज्याचा कारभार तिच्यावर सोपवला आणि ह्या क्षणी कुणालचा बदला घेण्यासाठी ही संधी चालून आली असे तिला वाटले. ह्यावेळी कुणाल तक्षशिलेचा उपराज्यपाल होता. या क्षणी तिष्यरक्षिताने कुणालला राज्यपदावरून दूर करण्याचा आदेश दिला . तसेच ताबडतोब त्याचे डोळे काढण्याचाही आदेश दिला. आदेशावर राजमुद्रा मारलेली असल्यामुळे कुणालवर तशी कार्यवाही करण्यात आली. जेव्हा ही गोष्ट अशोकाला कळली तेव्हा त्याला फार दुःख झाले. आपल्या छोट्याशा चुकीमुळे किती मोठी हानी झाली याच्या यातना अशोकाला खूप झाल्या.

ज्या ठिकाणी कुणालचे डोळे काढले गेले त्या ठिकाणी अशोकाने एक स्तूप बांधला होता. संघमित्राचा विवाह अग्निब्रह्म याच्याबरोबर झाला होता. त्यांना सुमन नावाचा मुलगा होता. पुढे संघमित्रा व अग्निब्रह्म भिक्खू संघात दाखल झाले होते. अशोक ज्यावेळी तक्षशिलेला गेला होता तेव्हा सहदेवची मुलगी उज्ज्वला आणि अशोक यांची ओळख झाली. त्यानंतर ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघे लग्न करणार होते तेव्हाच अशोकाला पाटलीपुत्रहून बोलवणे आले. तेव्हा उज्ज्वला गर्भवती होती. तिची व्यवस्था काश्मीरमध्ये तिचा भाऊ गिरी यांच्याकडे करण्यात आली होती .

उज्ज्वलाने एका मुलाला जन्म दिला आणि ती थोड्याच दिवसात मृत्यूपावली . मरताना मात्र ती आपल्या भावाला म्हणाली, ” दादा , माझ्या बाळाला सांभाळ. ” तिने त्याच्या हातात एक मखमलची पेटी दिली आणि म्हणाली, ” जलोकच्या पित्याची ही एक खूण आहे. ” जलोक मोठा होत होता . मामाच्या घरी लाकडाचे तीक्ष्ण टोकाचे बाण करून खेळत होता. मध्येच कधी कधी आईची आठवण काढत असे. आईचा मृत्यू झाला . मग माझ्या वडिलांचे काय ? तेही मृत्यू पावले का ? असतील तर ते कोठे आहेत ? अनेक प्रश्न तो विचारत असे. परंतु जलोकच्या पित्याविषयी कोणीही आतापर्यंत त्याला कोणी काही माहिती दिली नव्हती. पित्याच्या नावाबद्दल सगळे टाळाटाळच करीत होते.

एकदा तो आपला मित्र अनंतनाग याच्याकडे गेला. तेव्हा ते वितस्ता नदीच्या काठी उंचावर एका कुटीमध्ये रहात होते. आज तू येथून जेवून जा . कमळाच्या बिजांची भाजी केली आहे. जयामावशीला अनंत म्हणाला, ” हा माझा मित्र जलोक. ” नाव उच्चारताच ती एकदम म्हणाली, “ तू त्या उज्ज्वलेचा मुलगा का ? तिचे महाराणी होण्यासारखे सोनेरी केस अगदी तुझ्यासारखेच . त्या रंगाची यात किंचीतही फरक नाही. पण … ” मध्येच तिने बोलणं थांबवलं. आणि दुसरा विषय काढला . “ अंहं . तोच विषय सांगा . माझे वडील कसे होत ? तुम्ही त्यांना पाहिले असेलच. ” ” मामाने काही सांगितले नाही का ? ” ” नाही. ” ” ते सांगता येत नाही. तुझ्या आईचा अश्वारूढ पुतळा तक्षशिलेत कोणी शिल्पकाराने केला आहे. ” म्हणताच जलोकचं रक्त सळसळलं . आणि म्हणाला , ” काय ? अश्वारूढ पुतळा. म्हणूनच मला सेनापती व्हावसं वाटतंय . ते काही खोटे नाही .

” मग मात्र जलोक घरी गेल्या वर हटून बसला. तेव्हा मामा म्हणाला, ” जलोक, तुझी माता म्हणाली होती, ” दादा, दुर्दैवाने आमचा ठरलेला विवाह झाला नाही. यात माझ्या पतीचा कसलाही दोष नाही. त्यांना कोणीही दोष देऊ नये. त्यांची आणि माझी ताटातूट झाली. ती अगदी कमनशीबानेच. दादा माझे पती अत्यंत प्रेमळ, मनमिळावू, सद्वर्तनी आहेत. फार मोठे युद्धकुशल वीर आहेत. ती याला मोठा झाल्यावर पाटलीपुत्रला घेऊन जा. आणि राज्यपाल कुमार अशोकाची भेट घालून दे. ” आणि ही मखमली पेटी माझ्या हातात दिली. ” जलोकने पेटी उघडली तर त्यात रत्नजडीत स्वर्णहार होता. पुढे जलोक सैन्यात भरती झाला. तो सर्वांच्या अग्रभागी असे. पुढे चार महिन्यात जलोकचा ईशादेवीशी विवाह झाला. पण पित्याविषयीची ओढ मधून मधून उफाळून येतच होती. एके दिवशी ब – याच कष्टाने तो पाटलीपुत्र नगरीत आला. नगरातल्या रस्त्यावर एक भव्य मिरवणूक जाताना दिसली . चालता चालता काषायवस्तीतील बौद्ध भिक्खू म्हणत होते, “ बुद्धं सरणं गच्छामि धम्म सरणं गच्छामि संघ सरणं गच्छामि ” जलोक मिरवणूक पहात होता. एका घराच्या दाराजवळ पायऱ्यांवर बसला होता.

तोच मिरवणुकीतल्या एका वृद्धाचा हात त्याच्या खांद्यावर पडला . तेव्हा त्याने त्याच्याकडे पाहिले तेव्हा त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले, “ आपण अतिथी दिसता. ” ” आपले कुलगोत्र ? ” मला सम्राटांना सांगायचे आहे. त्याने नंतर सम्रटाची भेट घेतली . राधागुप्त समोर उभे होते . तेव्हा तो म्हणाला, “मी माझ्या जीवनातील महत्त्वाचा प्रश्न यांच्यासमोर सांगणार आहे. ” अशोकाने इशारा करताच राधागुप्त बाहेर गेले. जलोक म्हणाला, ” माता तान्हेपणीच सोडून गेली. माझा पिता मला ठाऊक नाही. त्याला गहिवरुन आले. डोळे पाण्याने डबडबले. अशोकालाही काहीतरी जाणवले . आणि म्हणाला, “ सांग, सांग, लवकर सांग. ” ” माझी माता गिरीदांना म्हणाली , तू जलोकला पाटलीपुत्राला घेऊन जा.

आणि हा हार तक्षशिलेचे राज्यपाल अशोकांना दाखव . ” जलोकाने तो रत्नजडीत हार दाखवला . त्यावरची अक्षरे पाहिली तेव्हा खात्री पटली की हा उज्ज्वलेचा मुलगा, माझा मुलगा आहे. हृदय पिळवटून निघाले. उज्ज्वलेचा इतिहास डोळ्यापुढून क्षणात सरकून गेला. सम्राटाने जलोकाला आपल्या बाहूने कडकडून मिठी मारली . त्याच्या डोळयातील अश्रू जलोकच्या डोक्यावर पडत होते.

जलोकच्या मनी आजपर्यंत बोचत असणारे शल्य शौर्यसंपन्न महापराक्रमी पित्याच्या बाहूत शिरताच बोथट झाले . मनाला शांत शांत वाटत होते. कितीतरी वेळ दोघे ही त्याच स्थितीत शांत शांत होते. भेटीनंतर तो परतीच्या प्रवासाला निघाला. काश्मीरहून आला तेव्हा उपसेनापती असलेला जलोक आता तात, बंधू, भगिनी या अनेक नात्यांची भव्य शिदोरी बरोबर घेऊन काश्मीरचा सर्वाधिकारी म्हणून हत्तीवर बसून काश्मीरला निघाला होता. अशोक उज्ज्वलेचा पुत्र मनोमन आनंदला होता. उज्ज्वल भवितव्याच्या वाटेवर प्रवास करीत होता.

क्रमशः
स्रोत:(श्रीनिवास भालेराव यांच्या प्रजापिता सम्राट अशोक या पुस्तकातुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading