भारताचा मानबिंदू
भारताचे राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, राष्ट्रचिन्ह या तीन प्रतिकांद्वारे आपले सार्वभौमत्व व स्वरूप व्यक्त होते. याविषयी लोकांत नितांत आदराची भावना आजही आहे. ते भारताचे मानबिंदू ठरतात. या प्रतिकांत आपल्या भारतभूमीची संपूर्ण परंपरा व येथील संस्कृती व विचारधारा प्रतिबिंबित होते. स्वातंत्र्यानंतर भारताने तिरंगा राष्ट्रध्वज निवंडला व सारनाथ येथील अशोकस्तंभाचे सिंहशार्ष व त्याखालील सत्यमेव जयते हे वचनही राष्ट्रचिन्ह म्हणून स्वीकारले. त्याचप्रमाणे भारत सरकारने आपल्या राष्ट्रध्वजावर, नाण्यावर, नोटांवर, पोस्टाच्या पत्रांवर, तिकीटांवर आणि पाकिटावर सम्राट धम्मदीप अशोकाचे राजचिन्ह धारण केलेले आहे. तथागत गौतम बुद्धांनी बनारस जवळील सारनाथ येथे पहिले प्रवचन केले.

येथे उभारलेला अशोकस्तंभ हे अखिल मानवाचा मानबिंदू म्हटले तर त्यात काही वावगे होणार नाही. कोणत्याही देशाचे राष्ट्रचिन्ह हा केवळ त्याचा सरकारी शिक्का नसतो. तर त्या देशाला जी ध्येय व जी मूल्ये प्रिय वाटतात त्याचे ते प्रतीक असते. आपले बोधचिन्हे अशोकाच्या नावाशी निगडीत आहेत, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. भारताच्या आणि जगाच्या इतिहासात धम्मदीप अशोकाचे स्थान अनन्यसाधारण आहे. उच्च कोटीतील आहे. जवाहरलाल नेहरू याच्या शब्दांत सांगायचे तर, अशोकाचा काळ हा निःसंशय भारतीय इतिहासातील आंतरराष्ट्रीय काळ होता.
तो संस्कृतीत राष्ट्रीय काळ नव्हता. भारताचे प्रतिनिधी अनेक देशात गेले. ते सम्राट किंवा साम्राज्यवादी म्हणुन गेले नाहीत तर शांततेचे, संस्कृतीचे व सद्भावनेचे दूत म्हणुन गेले. (२ जुलै १९४७ भारतीय घटना परिषदेत केलेले भाषण) हे बोधचिन्ह भारताच्या गतकाळाचे व त्यांच्या आकांक्षांचे प्रतीक आहे. अशोकस्तंभावरील बैल हे सिद्धार्थ तथागत गौतम बुद्धांच्या जन्माच्या वेळचे वृषभ लग्नाचे प्रतीक आहे. हत्ती मयादेवीच्या गर्भधारणेचे स्वप्न सूचित करणारे प्रतीक आहे. घोडे हे त्याच्या अत्त्युच्च त्यागांचे प्रतीक आहे. अशोक ज्या कथक घोड्यावर बसून कपिलवस्तूहून निघाला, साम्राज्याचा त्याग केला ते सूचित करणारे प्रतीक आहे. सिंह हे शाक्यसिंहाचे प्रतीक आहे. बुद्धाने धम्मचक्राला प्रवर्तन केले तेव्हा सिंहगर्जना ऐकू आली.
धम्मचक्राला २४ आऱ्या आहेत. बौद्ध तत्त्वज्ञानातील प्रमुख कार्यकारणभावाची ती प्रतिके आहेत. सदाचाराचा त्याचा संदेश मोठ्यात मोठ्या राजालाही बंधनकारक आहे. हे चक्र आपल्या तिरंगी ध्वजावर आहे. ते आपणास सदैव अशोकाची व धम्माची आठवण देत राहील. चक्र हे गती व प्रगतीचे द्योतक आहे. चार सिंह हे अमर्यादित सार्वभौमत्वाचे, सिंह हे राज्यसत्तेचे व कमळ हे सज्जनशीलतेचे प्रतीक आहेत. उच्च बिंदूवरील राज्यचक्र हे चक्रवर्तीचे चक्र आहे. भारतीय कला, साहित्य, संस्कृती याचे भाग्यचक्र आहे.
बुद्धाने धम्मचक्राला चालना देऊन सम्यक ज्ञानातून निर्माण होणारा सदाचार, सद्विचार, सद्भाषण, सत्कृती यांना चालना दिली. अशोकाने या विचाराने आपले साम्राज्य लोकाच्या कल्याणासाठी चालविले. आदर्श सम्राट – महान धम्मदीप – प्रजापिता अशोक हा इतिहासातील एक आदर्श शासनकर्ता धम्मदीप होता. जागाच्या इतिहासात अशोकाशिवाय आदर्शाचे पालन करणारा एखआदा राजा क्वचितच असेल. एक महान उपदेशक जे काम करू शकत नाही ते महान काम धम्मदीप अशोकाने केले.
त्याला खरा महान उपदेशक व शिक्षक म्हटले पाहिजे. अशोक कधी वेषांतर करून तर कधी सम्राट म्हणून लोकांमध्ये फिरून लोकांच्या सुख दुःखाची पाहणी करून लोकांना नैतिकता व धम्म शिकवण्याचे काम करीत असे. आपल्या राज्यात नवे परिवर्तन घडविण्यासाठी आपल्या अधिकाऱ्यांनी लोकांमध्ये जाऊन योग्य पद्धतीने लोकांची काम करण्यास भाग पाडले: अशोक हा महान राष्ट्रनिर्माता सम्राट होता. त्याने भारताला जगातील एक महान राष्ट्र बनविले. लोकांमध्ये प्रचलित पाली भाषा होती. त्या भाषेमध्ये लोकांना ज्ञान दिले. या माध्यमातून संपूर्ण राष्ट्रात एकता निर्माण केली. अशोक महान सम्राट होता. परंतु, स्वतःला त्यांनी सम्राट कधी म्हटले नाही. किंवा कोठेही कसलीही उपाधी लावली नाही. यावरून प्रजेचा राजा आणि माणसातील माणूस म्हणून श्रेष्ठ होता.
अशोक हा भगवान गौतम बुद्धांचा अनुयायी होता. अशोकाने आपल्या जीवनात व राज्यात भेदभावाला कधीही थारा दिला नाही. विषमता नष्ट व्हावी, समता यावी, जातीभेद नष्ट व्हावा, त्याजागी गुण, श्रेष्ठता यावी, सर्व मानव समाज सत्त्वगुणसंपन्न व्हावा, आपल्या राज्यातील कोणत्याही धर्माच्या लोकांना पक्षपाती, भेदभाव, द्वेषभाव, उच्चनीच, वाईट वागणूक यांचा उपद्रव होऊ नये यासाठी तो दक्ष होता. एकमेकांशी गुण्यागोविंदाने, प्रेमाने, दयाबुद्धीने, समतेने, आपुलकीच्या भावनेने वागले पाहिजे, आपण जसे सुखी तसे दुसरेही सुखी असले पाहिजे.
तथागताचा उत्कृष्ट उपदेश होता. त्याचे आचरण अशोकाने तंतोतंत आपल्या जीवनात स्वतः पाळले व नंतर लोकांना सांगितले. अशोक आईवडिलांचा आज्ञाधारक पुत्र, प्रेमळ बंधू व पिता, उत्तम सेनानी, प्रजाहितदक्ष, विशाल साम्रज्याचा महान सम्राट होता. सत्तेच्या अत्युच्च शिखरावर असताना त्याने त्यागमय जीवनाचा अवलंब केला. अनेक राज्यांबरोबर मैत्रीचे संबंध ठेवून त्यांच्यापर्यंत धम्मविचार पोहोचवले. त्यामुळे अनेक राजे धम्मविचारांचे अनुयायी बनले. त्याने प्रजेवर मुलाप्रमाणे प्रेम केले. परधर्मियांना सहिष्णुतेची वागणूक दिली.
न्यायप्रिय अशोक प्रजेची गाऱ्हाणी तो असेल त्या ठिकाणी सोडवत असे. आक्रमण, शत्रू, गुन्हेगार, समाजद्रोही यांना कडक शासन केले जाई . त्याने विद्या व कलेला आश्रय दिला. शिल्पकला ही अशोकाच्या काळाइतकी कोणत्याही राजाच्या काळात प्रगत झाली नसेल. स्तंभलेख, शिलालेख, गुहालेख हे अशोकाची आत्मचरित्रेच आहेत. शेवटी शेवटी तर भिक्खूचा वेश धारण करून आपले धम्माचे जीवन व्यतीत केले. हा समाजप्रिय विशाल साम्राज्याचा सम्राट महान धम्माचा धम्मदीप इ.सन पूर्व २३२ मध्ये निर्वाण पावला. अशोकाची तुलना अशोकाशीच करता येईल. जगातील इतिहासाच्या विशाल नभोमंडळात अशोक दिव्य तेजाने ताऱ्यासारखा तळपत राहील त्याच ताऱ्याच्या व कार्याच्या महान विचाराच्या प्रकाशवाटेवर आपण चालत राहू. धन्यवाद जय अशोक ! जय अशोक !!
स्त्रोत:(श्रीनिवास भालेराव यांच्या प्रजापिता सम्राट अशोक या पुस्तकातुन)
आज प्रजापिता सम्राट अशोक या पुस्तकाचा शेवटचा भाग संपन्न झाला..
