अशोक आजोळी जातो..
सुसीमचे बोल अशोकाच्या मनाला खूप लागले होते . त्यामुळे अशोकाच्या मनाची घालमेल चालली होती . मन अस्वस्थ झाले होते. त्याने मातृसदनात जाऊन सुभद्रांगीदेवींस आपल्या आजोळाबद्दल विचारले. आतापर्यंत अशोकापासून लपवून ठेवलेली माहिती ती आता स्वःच्या तोंडाने कशी सांगणार ? अनेक विचारांचे आणि प्रश्नांचे वादळ तिच्या मनात उठले . ती वरवर शांत दिसत होती पण आईबाबांच्या आठवणीने ती व्याकूळ झाली . जीवनाचा सगळा सारीपाट तिच्या डोळ्यापुढे सरकत होता. आपले गरीब आई – बाप आणि त्यांची हलाखीची परिस्थिती आणि लग्नात पट्टमाहिषी राणीसाहेबांनी केलेला अवमान…. सर्व सर्व डोळ्यांपुढे दिसत होते. ती व्याकूळ झाली कंठ दाटून आला , डोळे पाणावले . ” मातोश्री , आपण मला माझ्या आजी – आजोबांबद्दल व त्यांच्या नगरीबद्दल माहिती द्यावी. मी त्यांना जाऊन भेटेन. ” तेव्हा सुभद्रांगी म्हणाल्या , “ ही सर्व व्यवस्था आपले मंत्री राधागुप्त करतील. म्हणून त्यांनी डोळ्यातील पाणी लपवण्यासाठी चटकन मान वळवली.

समोरच राधागुप्त उभे होते. ती जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. राधागुप्त म्हणाले, “ कुमार पिताश्रींची ( सम्राट बिदूसारांची ) परवानगी मिळाल्याशिवाय आपणांस आजोळी जाता येणार नाही. ” मग अशोकाने आपल्या पिताश्रींकडे आपल्या आजोळी चंपानगरीला जाण्याचा हट्ट धरला. बिंदूसाराला अशोकाच्या आजोळची कल्पना होती . त्या गोष्टी अशोकाला राहणार ? इत्यादी प्रश्न बिंदूसारांच्या मनात आले . सुरूवातीला नाहीच म्हणाले . परंतु दिली . पण सुभद्रांगीला चंपानगरीला न्यायचे नाही , फक्त अशोकानेच जायचे या अटीवर परवानगी मिळाली . अशोकने ती अट मान्य केली . आपणास आजोळी जाण्यास परवानगी मिळाली , आपण आजी आजोबांना भेटणार याचा त्याला खूप आनंद झाला . तेव्हा अशोकाला महाराज म्हणाले , ” कुमार , लक्षात ठेवा , तुमचे आजोबा फारच स्वाभिमानी आहेत . ते स्वतःही येत नाहीत आणि आपणासही बोलवत नाहीत .
एखादी गोष्ट देऊ केली तरी ते स्वीकारत नाहीत . ” सुसीमची आई सुभद्रंगीचा तिच्या माहेरवरून सतत पाणउतारा करीत असे . सुसीम आपल्या आजोळी हिमालीत गेला होता . तिष्य बुद्धगयेला गेला होता . अशोकचे इतर बंधू आपापल्या आजोळी जाऊन आले की तेथील वर्णन करीत असत . तेव्हा माझे आजोळ कसे असेल असे अशोक मनातल्या मनात चित्र रंगवीत असे . परंतु आज परवानगी मिळाल्यामुळे त्याला फार आनंद झाला होता . अशोकाची आजोळी ( चंपानगरीला ) जाण्याची तयारी झाली . मातोश्रीची परवानगी घेण्यासाठी तो मातृसदनात गेला . तेव्हा सुभद्रांगीने अशोकाला छातीशी कवटाळले . तिची खूप दिवसांची मनीषा आज पूर्ण होणार होती . तिने अशोकाच्या हातात एका कापडात बांधलेली वस्तू दिली . अन् म्हणाली , ” आतापर्यंत मला जमले नाही , तू तरी त्यांना घेऊन ये . आणि ही कोरीव लाकडी वस्तू कलंधरने बनवली आहे . ती बाबांना दे .
त्यांना ही आवडेल . ” आईचा निरोप घेऊन अशोक रथात जाऊन बसला . रथात राधागुप्त होतेच . सारथ्यांनी घोड्यांना इशारा करताच घोडे धावायला लागले . रथाची चाके फिरायला लागली तसे विचारचक्र सुभद्रांगीच्या मनाचेही . दाटलेल्या मनाला हलके करण्यासाठी डोळ्यातील अश्रू गालावर ओघळले. ती धावणा – या रथाकडे बराच वेळ पहात उभी होती. रथ आता मुख्य रस्त्याला लागला होता .. चंपानगरीचा रस्ता म्हणजे हिरव्या वनश्रीने नटलेला , फुलांनी बहरलेला लांबच लांब पर्वताच्या रांगा , मध्येच पिकानं बहरलेले शेतमळे …. आजपर्यंत फक्त वर्णने ऐकली पण आज मात्र प्रत्यक्षच निसर्गातील निरनिराळ्या गोष्टी अशोक पाहत होता . अनुभवत होता . आजपर्यंत कोंडलेल्या मनाला फुललेल्या निसर्गात मोकळं वाटत होतं . ह्या रम्य वातावरणात एक आगळा वेगळा आनंद तो घेत होता . रथाने आता चांगलाच वेग धरला होता . एका हिरव्या कुरणातून तो धावत होता .
समोर गुराखी गुरे चारत होता . हिरव्या गवतावर पायीच फिरणारा गुराखी पाहून अशोकाने रथातून उडी घेतली आणि त्या गुराख्याकडे धावत सुटला . राधागुप्तानी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला . पण व्यर्थ . बरोबर असलेले सैन्यही अशोकाच्या पुढे काही करू शकले नाही . राधागुप्त म्हणाले , ” कुमार , असे आपणास थांबता येणार नाही . कारण पाटलीपुत्र नगरीस परतण्यास आपल्याला रात्र होईल . “” उशीर झाला तर झाला . मी आजोळी जात आहे . हे बघा , आज मुक्काम चंपानगरीत होईल . ” अशोक गुराख्याजवळ जाऊन त्याला म्हणाला , “ कोण आहेस रे तू ? ” गुराखी – “ तुला दिसत नाही का ? मी गुराखी आहे . ” अन् तो खळखळून हसला . तो अशोकाकडे पहात राहिला . त्यांच्या चेहे – यावर कसलीही भीती किंवा काळजी नव्हती . गुराखी – “ तू रे कोण ? ” अशोक – ” आता तुला दिसत नाही का ? मी राजपुत्र आहे . ” आणि अशोक खळखळून हसला .
लगेच गुराखी हात जोडून म्हणाला , “ चुकलं माझं . ” दोघांचे अरे – कारे बोलणे ऐकून राधागुप्तांना व जवळच उभ्या असलेल्या सैन्याला राग आला . राधागुप्त म्हणाले , “ अरे ! हे राजपुत्र आहेत . ” तेव्हा गुराखी म्हणाला , “ मला फक्त शेतकरी राजा माहीत आहे . ” अशोक म्हणाला , “ बरं . मला तुझा मित्र समज . ” म्हणून आपल्या गळ्यातली हस्तीदंती ताईत काढून त्याला दिला . व म्हणाला , ” माझे नाव अशोक . त्यावर कोरलेले आहे . तुझे नाव ? ” ” माझे नाव किसन . ” दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला . मग तेथून अशोक रथात बसून निघाला तेव्हा रथ दिसेपर्यंत गुराखी अशोकाच्या रथाकडे पाहत होता . गंगा नदीच्या काठावरून रथ धावत होता , स्वच्छ हवा , निर्मळ पाणी यात अशोकाला थोडीशी झोप लागली . अशोक जागा झाला तेव्हा रथाने चंपानगरीत प्रवेश केला होता . आता समोर असणारी चंपानगरी आणि राजधानी पाटलीपुत्र नगराची तुलना मनातल्या मनात करत होता .
रथातून आणलेले सर्व साहित्य अशोकाने सेवकांसमवेत बरोबर घेतले आणि त्या झाडाझुडपातून वाट काढत काढत आपल्या आजोबांच्या झोपडीजवळ जाऊन पोहोचला . पाटलीपुत्र नगरीतील तो थाट , ते सैन्य , मोठमोठाले महाल येथे नव्हते . तर येथे हिरवेगार वृक्ष , त्यांच्या गर्द सावल्या आणि विशाल असे वृक्ष वा – याच्या झोतावर झुलत होते . अशोकाने झोपडीजवळ जाऊन आत डोकावले . काटक्याने चूल पेटलेली , त्याच चुलीजवळ आईसारख्या चेह – याची सुंदर डोळ्याची आजी बसली होती . चुलीवरील सुगंधी भाताचा वास मनाला मोहीत करत होता . आजीच्या अंगावर जुनाट लुगडे ,त्याला . जागोजागी भोकं पडलेली होती . केस पांढरे झालेले . ती भाकरीचे पीठ काठवटीत मळत होती . अशोकने मोठ्याने हाक मारली , ” आजी ऽऽ ” अन् पळत आजीला जाऊन बिलगला .
“ आजी , मी तुझा नातू अशोक . सुभद्रांगीचा मुलगा . ” हे शब्द ऐकताच आजीने अशोकाला कडकडून मिठी मारली . थरथरत्या हाताने डोक्यावरून हात फिरवला. पिठाचा हात तसाच अशोकाच्या अंगावरून फिरला. आजी नातवाला कसले भान राहिले नाही . ” बाळा , मी किती वर्षे झाले तुला पाहीन म्हणत होते. ” ओठातून शब्द बाहेर पडताना अडखळत होते. ती अशोकाला सारखी कुरवाळीत होती . आणि तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते . अशोक कितीतरी वेळ आजीच्या कुशीत विसावला होता . तेवढ्यात आजोबा ओरडले, ” अहो ! अहो ! तुम्हाला काही भान आहे की नाही . ते राजकुमार आहेत . ” एक करडा आवाज आल्याने अशोकाने मागे वळून पाहिले तर एक वृद्ध माणूस झोपडीत शिरत होता .
त्या उंचपु – या , वृद्धत्वाच्या खुणा अंगावर असलेल्या माणसाच्या सुरकुतलेल्या चेह – यावर प्रेम , माया दिसत होती . अशोकाने ओळखले हेच आपले आजोबा . ते झोपडीत शिरले . लांबच लांब केसांच्या जटा डोक्यावर बांधलेल्या आजोबांच्या पायावर अशोकाने पटकन डोके ठेवले . तेव्हा आजोबा मृदू आवाजात म्हणाले , “ धम्मनिष्ट राजा हो ! ” अशोकाला उचलून मिठी मारली , त्यांच्या चेह – यावर आनंद ओसंडत होता . आजी आजोबा गरीब असतील , पण मनाने व स्वभावाने फारच श्रीमंत होते . त्या दिवशी अशोक आपल्या मायच्या ममतेच्या महासागरात न्हाऊन निघाला होता . पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची महान श्रीमंती तो अनुभवत होता . त्यांच्या मायच्या स्पर्शाने तो भारावून गेला होता . ” आजोबा , मी खास आपणास भेटण्यास आलो आहे . आणि मी येथेच रहायला आलो आहे . ” ” नाही , नाही , या झोपडीत ? बाळा , तू राजकुमार आहेस . ” ” म्हणून काय झाले ? माझी आई राणी असली तरी ती याच झोपडीत , याच जागेवर लहानाची मोठी झाली .
तिचं नातं या झोपडीशी , झोपडीभोवतालच्या परिसरातील वृक्षवेलींशी नाही का ? ते काही नाही . मी आज येथे राहणार , जेवणार आणि झोपणारदेखील . ” राधागुप्त म्हणाले , “ पण कुमार …. ” पणबिण काही नाही . तुमची आणि सैन्याची व्यवस्था करा . मी येथेच राहणार .” पण बाळकुमार , येथे गवताच्या चट्यावर गोधडी पांघरून झोपाव लागतं , ते तुम्हाला जमेल ? ” आजोबा काळजीच्या सुरात म्हणाले . तुम्हाला चालतं ते मलाही . हो सगळं जमेल . मी तुमच्या सुभद्रांगीचा मुलगा आणि तुमचा नातू आहे . तुम्हाला जमतं ते मला कसं जमणार नाही . ” रात्री पानात गरम भात , भाकरी , ताक यावर खरोखरच अशोकने समाधानी मनाने जेवण केले . दररोजच्या पक्वान्नांपेक्षा आजच्या आजी – आजोबांच्या प्रेमभरी भोजनाने अशोक खूप समाधानी झाला . रात्री खरोखरीच आजीच्या कुशीत झोपला . आजी आपल्या नातवाच्या अंगावर मायेचा हात फिरवत होती . यात अशोकाला झोप कधी लागली याचे भानही राहिले नाही . सकाळी अशोक उठला . खूपच समाधानी दिसत होता .
झोपडीजवळ टकटक असा आवाज येत होता . अशोकाने त्या दिशेने पाहिले , तर एक १२,१३ वर्षांचा मुलगा हातातील छन्नी , हातोड्याच्या साह्याने दगडावर ठोके टाकत होता . त्यातून तोंड उघडलेल्या सिंहाचा जबडा आकार घेत होता . अशोकाने जवळ जाऊन त्याला विचारले , ” तुझे नाव काय ? तू कोण ? ” ” मी सगुण . ” कोठे राहतोस ? ” ” तुमच्या आजोबांच्या शेजारी . ” ” हे काय करतोस ? ” ” सिंहाची मूर्ती . ” ” तुला सांगेन ते तू दगडात कोरून देशील ? ” ” होय , आमचा पाथरवटाचा हा धंदाच आहे . ” ” मग पाटलीपुत्रला येशील ? मला अगदी सिंहच्या आकाराचा दगडी सिंह बनवायचे आहे . ” ” जरूर येईन पण त्याला थोडावेळ लागेल .

” राधागुप्तांनी सगुणला कोठे , कधी भेटायचे याची सर्व माहिती दिली . सगुण मनोमन आनंदी झाला . अशोक खूपच आनंदी दिसत होता . आल्यापासूनचा वेळ कसा गेला ते कळले नाही . शेवटी पाटलीपुत्रला जाण्यासाठी आजी आजोबांचा निरोप घेण्यासाठी तो गेला , आजी – आजोबांचे आशीर्वाद घेतले . भरल्या डोळ्यांनी आजी म्हणाली , ” बाळा , तुझ्या मातेला एकदा आम्हाला भेटून जा म्हणून सांग , कारण आमचं वय झालं आहे . ” आजोबा म्हणाले , “ खूप खूप मोठा हो . सर्वांचा प्रिय हो. ” परतीचा प्रवास करून अशोक पाटलीपुत्रला आला .
क्रमशः
स्रोत:(श्रीनिवास भालेराव यांच्या प्रजापिता सम्राट अशोक या पुस्तकातुन)
