दिनांक १५ मार्च,अहमदनगर:
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३१ मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक उपाययोजना जारी
नागरी क्षेत्रातील शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या, चित्रपटगृह,नाट्यगृह, जलतरण तलाव बंद राहणार
विविध कार्यक्रमांच्या आयोजनासही प्रतिबंध, शॉपिंग मॉलमधील दुकानेही बंद राहणार
अत्यावश्यक सेवा नेहमीप्रमाणे सुरु राहणार
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात जमू नये, यासाठी उपाययोजना जारी करण्यात आल्या आहे. त्यानुसार, जिल्ह्याच्या महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रातील अंगणवाड्या, सरकारी व खाजगी शाळा तसेच महाविद्यालय व आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांचे आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था तसेच जिल्हयातील सर्व शॉपिंग मॉलमधील दुकाने व आस्थापना (अत्यावश्यक किराणा, दूध व भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तू व औषधालय वगळून), चित्रपटगृह, जलतरण तलाव, व्यायामशाळा आणि नाट्यगृहे ३१ मार्चपर्यंत बंद ठेणण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत. याशिवाय, जिल्हयात सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, क्रीडाविषयक कार्यक्रमांसाठीही परवानगी दिली जाणार नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल द्विवेदी यांनी हे आदेश जारी केले आहेत.
कोरोना विषाणूचा (कोव्हीड १९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ मधील प्राप्त अधिकारानुसार जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी हा निर्णय घेतला आहे.
जिल्हयातील महानगरपालिका, सर्व नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील अंगणवाडया साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार दिनांक ३१ मार्च २०२० पर्यत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.
जिल्हयातील महानगरपालिका, सर्व नगरपालिका, नगरपंचायत, सरकारी व खाजगी शाळा तसेच महाविद्यालय व आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांचे आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था साथ रोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार दिनांक ३१ मार्च २०२० पर्यत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तथापि महानगरपालिका, सर्व नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील १० व १२ वीच्या परीक्षा तसेच विश्व विद्यालयाच्या परीक्षा विहित वेळापत्रकानुसार घेण्यात याव्यात. तसेच, आजारी विद्यार्थी इतर विद्यार्थ्याच्या संपर्कात येणार नाहीत यासाठी आवश्यक ती दक्षता व खबरदारी घेण्याची जबाबदारी संबंधित संस्था प्रमुखाची राहील, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
(वृत्तसंस्था)
