दिनांक१० फेब्रुवारी २०२५, श्रीगोंदा/शिक्रापूर (पुणे):
स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने शिक्रापूर येथे चाकूचा धाक दाखवून मोबाईल चोरणाऱ्या चोरट्यांना अटक केली आहे. या आरोपींनी खराडी येथून मोटारसायकल चोरी करून शिक्रापूर येथे मोबाईल चोरीचा गुन्हा केल्याचे उघड झाले आहे.

गणेश कैलास भोसले (वय १८, रा. मावळेवाडी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) व अजय माणिक घेगडे (रा. राजापूर, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांच्यासह त्यांच्या एका साथीदाराने हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे.

पायल लोहार ही तरुणी वडिलांचा डब्बा घेऊन पायोनीर कंपनीकडे पायी जात असताना शिक्रापूर येथील हॉटेल भाऊचा धक्का परिसरात एका अज्ञात व्यक्तीने तिच्याकडील मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्याला तिने विरोध केल्यावर त्याने चाकूचा धाक दाखवून मोबाईल जबरदस्तीने हिसकावला. त्यानंतर तो पाठीमागून आलेल्या मोटारसायकलवरील दोघांबरोबर पळून गेला.

शिक्रापूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास केला. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटली. गणेश भोसले याला ताब्यात घेतल्यावर त्याने खराडी येथून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. पोलीस तपासात चोरी केलेला मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड, पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजय जाधव, राजू मोमीन, मंगेश थिगळे, सागर धुमाळ यांनी ही महत्त्वाची कामगिरी पार पाडली.
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)
