भारतीय संविधान संघर्ष समिती व विविध पुरोगामी संघटनांच्या माध्यमांतून हाथरस घटनेचा निषेध..

दिनांक ५ ऑक्टोबर,श्रीगोंदा:

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेल्या घटनेचा श्रीगोंदा तालुक्यातील विविध पुरोगामी संघटना तसेच फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारा मानणाऱ्या संघटनांनी निषेध नोंदविला आहे. त्याचबरोबर पीडित कुटुंबाचे पुनर्वसन व सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्थानिक प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, हाथरस उत्तर प्रदेश येथे घडलेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. या घटनेत १९ वर्षीय वाल्मीक मेहतर (मागासवर्गीय) समाजाच्या तरुणीवर झालेल्या गैरकृत्यातून तिचा मृत्यू झाला आहे. पीडिता मागासवर्गीय प्रवर्गातील असल्याने, तिच्या अत्याचार व मृत्यू प्रकरणावर काही सत्ताधारी संघटनांनी राजकारण करण्याचा गलिच्छ प्रकारही केला आहे. ही गोष्ट तिच्या बरोबर झालेल्या दुशकृत्या इतकीच निंदनीय असून, उत्तर प्रदेश शासन आणि त्यांचे बाहुले असलेल्या पोलिसांनी पीडितेचे शव अपरात्री जबरदस्तीने जाळणे, माध्यमांवर लावलेली बंधने, आंदोलकांवर केलेल्या लाठीहल्ला आणि पीडित कुटुंबातील व्यक्तींचा केलेला मानसिक व शारीरिक छळ हे सर्व निषेधार्य आहे. याबाबत श्रीगोंदा तालुक्यातील विविध पुरोगामी विचारांच्या संघटना तसेच भारतीय संविधान संघर्ष समितीच्या वतीने या घटनेसह अत्याचाराचा निषेध नोंदवला आहे.

याचबरोबर निवेदनात म्हटले आहे की, नमूद पिडीत कुटुंबाचे शासनामार्फत मदत व पुनर्वसन व्हावे, संपूर्ण कुटुंबाला संरक्षण मिळावे, आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी इत्यादी मागण्या करण्यात आलेल्या आहेत.

श्रीगोंद्याचे तहसीलदार चारुशीला पवार व पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. सदर निवेदन देतांना भारतीय संविधान संघर्ष समिती, ऑल इंडिया पँथर सेना, वंचित बहुजन आघाडी, भारिप बहुजन महासंघ, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले), आयकॉन फाउंडेशन, लोकाधिकार आंदोलन, बामसेफ, मानवी हक्क अभियान, संभाजी ब्रिगेड सह समाजबांधव उपस्थित होते.

यावेळी श्रीगोंदा तहसील कार्यालयाबाहेर निषेध सभा घेण्यात आली. महापुरुषांच्या जयघोषासह पीडितेच्या न्यायासंदर्भात घोषणा देण्यात आल्या. याठिकाणी ऍड. प्रकाश लोंढे, प्रा.नितीन घोडके, अमर घोडके, अरुण जाधव, राहुल साळवे, संतोष जौजांळ, योगेश शिंदे, राजा जगताप, अशोक मोरे, कांतीलाल कोकाटे, जिवा घोडके, संतोष शिंदे, संतोष भोसले, टिळक भोस, प्रमोद काळे सह महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.

स्रोत:(प्रशासनास सादर केलेले निवेदन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading