“साखर कारखान्यांतील ऊस वाहतुकीसाठी रिफ्लेक्टिव्ह टेप अनिवार्य.. – सहाय्यक निरीक्षक श्री. महेश भोजने”

दिनांक ५ डिसेंबर २०२४, श्रीगोंदा:

साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सध्या सुरू असून ऊस वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. ट्रॅक्टर, ट्रेलर, बैलगाडी आणि ट्रक या वाहनातून ऊस वाहतूक केली जात असली तरी, अशा वाहनांना मागे व पुढे रिफ्लेक्टिव्ह टेप लावले जात नाही. यामुळे रात्रीच्या वेळी अपघात होण्याची दाट शक्यता असते, असे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक श्री महेश भोजने यांनी सांगितले.

सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर गुरुवारी आयोजित वाहन चालकांच्या मेळाव्यात भोजने यांनी ऊस वाहतूक करत असताना वाहन चालकांनी घेतलेली काळजी महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन केले. भोजने म्हणाले, “रात्रीच्या वेळी वाहनांचा अंदाज घेतला जात नाही, त्यामुळे ब्रेकिंग डिस्टन्स आणि स्टॉपिंग डिस्टन्स यांचा समन्वय साधता येत नाही, ज्यामुळे ट्रेलरला मागून धडक बसण्याचा धोका वाढतो.”

त्यामुळे, वाहन चालकांनी हे सुनिश्चित करणे अत्यंत गरजेचे आहे की, ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना मागे आणि पुढे रिफ्लेक्टिव्ह टेप लावले जावे. याशिवाय, वाहनांचा वेग मर्यादित ठेवावा, ऊस वाहतुकीचे वाहन चालवताना मोठ्या आवाजाचे म्युझिक सिस्टीम वाजवू नयेत, चुकीच्या ठिकाणी वाहने उभी करू नयेत आणि ऊस ट्रायली बाहेर भरणे टाळावे, असे महत्त्वाचे निर्देश भोजने यांनी दिले.

यावेळी, नागवडे कारखान्याचे शेतकी अधिकारी सचिन बागल, बी. जी. काटे, राजेंद्र भुजबळ, वसंतराव गिरमकर, भाऊसाहेब बांदल आणि राहुल नागवडे उपस्थित होते.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading