श्रीगोंद्यात एकलव्य संघटनेची आढावा बैठक संपन्न..

दिनांक १४ सप्टेंबर, श्रीगोंदा:

सार्वजनिक बांधकाम उप विभागाच्या विश्रामगृहावर दिनांक १२ सप्टेंबर रोजी एकलव्य संघटनेच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. यावेळी संघटनेचे राज्य पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. समाजाच्या विविध प्रश्नांबाबत याठिकाणी चर्चा करण्यात आली. रेशन कार्ड, जाती दाखला, मतदार नोंदणी, समाज बांधवांना मच्छीमारीसाठी सरकारी तलावांमध्ये प्राधान्य मिळावे व शेतजमिनी अतिक्रमण नियमानुकूल करणे बाबत बैठकीत संवाद साधण्यात आला.

या बैठकीचे अध्यक्ष शिवाजीराव गांगुर्डे (महाराष्ट्र राज्य अध्यक्ष) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी समाजातील विविध प्रश्नांबरोबरच समाजाला लाभलेला ऐतिहासिक वारसा नमूद केला. त्यांनी सांगितले की, महाराणा प्रतापानां पूजा भिलाने संरक्षण दिले होते, इंग्रजांच्या विरुद्ध स्वातंत्र्य लढ्यात हनुमंत भिल्ल लढला, काळू नाईक हे इंग्रज अधिकाऱ्याच्या विरुद्ध लढले, शाहू महाराजांच्या विश्वासू रक्षकांमध्ये कान्ह्या भिल्ल होता. असा समाजाचा इतिहास आहे. याचबरोबर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अजूनही समाजाचे कूपन, जाती दाखला, मतदार नोंदणी या सारख्या सामान्य गोष्टी पूर्ण झालेल्या नाहीत. ज्या शेतजमिनी आदिवासी भिल्ल समाज अतिक्रमण करून वास्तव्यास आहे. त्या जमिनीतील अतिक्रमण नियमाकुल करणे बाबत चर्चा येथे करण्यात आली.

यानंतर दत्ता माळी (महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष) बोलतांना म्हणाले की, समाजाचे अजूनही बरेच प्रश्न प्रलंबित आहेत. समाजातील अनेक लोकांचे जातीचे दाखले नाहीत, मतदार यादीत नोंद नाही, रेशन कार्ड अजून मिळालेले नाही. सरकारी तलावांमध्ये मच्छीमारी करणाऱ्यांना स्थानिकांकडून पीळवले जाते. समाज बांधवांना सरकारी तलाव मच्छीमारीसाठी प्राधान्याने उपलब्ध व्हावे. असे माळी यांनी यावेळी बोलतांना सांगितले. समाजातील काही जन राज्यमंत्री पदाचा दर्जा असल्याचे भासवत समाजाची दिशाभूल करत आहेत. मात्र, वस्तुस्थिती वेगळीच असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कोकाटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी समाजाच्या वेगवेगळ्या विषयांबाबत चर्चा करत, सामाजिक प्रक्रियेत सक्रिय राहून, समाजाच्या विविध प्रश्नांबाबत संघर्ष करणार असल्याचे सांगितले. सर्व उपेक्षित, वंचित समाजाने एकत्रित येत, एकमेकांच्या समस्या सोडवण्यासाठी सक्रिय झाले पाहिजे. यासाठी बारा बलुतेदार, मागासवर्गीय, दलित, आदिवासी, वंचित घटकांनी एकत्र येण्याची काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीसाठी उत्तम आप्पा रोकडे, कांतीलाल कोकाटे, दत्ता माळी, शिवाजी गांगुर्डे, नंदू भाऊ ससाने, नानासाहेब पवार (ग्रामपंचायत सदस्य), नारायण जाधव, गणेश जाधव, धनु जाधव, चॅम्पियन सचिन पवार, माणिकराव वाघ, संदीप काळे, श्लोक काळे, राजाभाऊ धुळे, सागर गायकवाड, सोमनाथ जाधव सह तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी राजाभाऊ धुळे यांना तालुकाध्यक्ष, सागर गायकवाड यांना एकलव्य टायगर तर, सोमनाथ जाधव यांना तालुका संघटक पदी नियुक्त करण्यात आले. बैठकीत प्रस्ताविक, सूत्रसंचालन व आभार कांतीलाल कोकाटे यांनी मानले.

स्त्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply