दिनांक १६ एप्रिल २०२५, श्रीगोंदा/पुणे:
चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडेखोरांच्या टोळीने पोलीस उपायुक्तांवर हल्ला केल्याप्रकरणी, मुख्य आरोपीच्या पाच साथीदारांना पोलिसांनी बीड व अहिल्यानगर येथून अटक केली आहे. यासोबतच या दरोडेखोरांकडून चोरीचे दागिने खरेदी करणारा सराफ व आरोपींना आश्रय देणाऱ्या नातेवाईकालाही पोलि1सांनी ताब्यात घेतले आहे. परश्या गौतम काळे, भीमा आदेश काळे, धंग्या चंदर भोसले, राजेश अशोक काळे, अक्षय उर्फ किशोर हस्तलाल काळे अशी असून, एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

या प्रकरणात मुख्य आरोपी सचिन चंदर भोसले याला पोलिसांनी ३ मार्च रोजी अटक केली होती. आरोपींकडून १२ लाख रुपये किमतीचे १३ तोळे सोन्याचे दागिने, रोकड, तीन दुचाकी, हत्यारे असा मिळून १५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस तपासात या टोळीने चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन दरोडे आणि चार घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. चोरीचे दागिने खरेदी करणारा सोनार अभय विजय पंडित (३८, रा. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यालाही अटक करण्यात आली आहे. दागिने चोरीचे असल्याचे माहित असूनही त्याने खरेदी केली होती.
त्याचप्रमाणे आरोपींना गुन्हा केल्यानंतर आश्रय देणारा गणेश शिवाजी काळे (रा. श्रीगोंदा, अहिल्यानगर) यालाही पोलिसांनी अटक केली आहे.

२४ फेब्रुवारी रोजी, खेड तालुक्यातील बहुळ गावातील फुलसुंदर वस्ती येथे, पहाटेच्या सुमारास जयराम लक्ष्मण वाडेकर यांच्या घरी दरोडेखोरांनी घात केला. दरवाजा तोडून घरात घुसून, जयराम यांचा मुलगा अशोक व पत्नी उज्ज्वला यांच्यावर धारदार हत्याराने हल्ला करून, १ लाख ३२ हजार किमतीचे दागिने व १२ हजाराची रोकड लुटून नेली.

घटनेनंतर पोलीस उपायुक्त शिवाजी पवार व सहाय्यक निरीक्षक प्रसन्न जर्हाड यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सापळा रचून आरोपींचा पाठलाग केला. यावेळी दरोडेखोरांनी पोलिसांवर हल्ला चढवला. या झटापटीत उपायुक्त पवार व सहायक निरीक्षक जर्हाड जखमी झाले.

स्वसंरक्षणार्थ उपायुक्त पवार यांनी सचिन भोसलेच्या पायावर गोळी झाडली, यात तो जखमी झाला. सचिन हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी गंभीर स्वरूपाचे नऊ गुन्हे दाखल आहेत.सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून, आणखी काही साथीदारांचा शोध सुरु आहे.
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)
