दिनांक २४ सप्टेंबर(पेडगाव/श्रीगोंदा):
तालुक्यातील पेडगाव येथील नितीन सकट या ३३ वर्षीय मागासवर्गीय तरुणाला गावातील रस्ते वाळू वाहतुकीने खराब होत असून, तुम्ही येथून तुमच्या वाळूच्या ट्रक नेऊ नका. असे सांगितल्याचा राग अनावर झाल्याने त्याला वाळू माफिया पप्पू उर्फ महेश कोथिंबीरे आणि मुख्तार काझी यांनी श्रीगोंदा शहरातील हॉटेल सृष्टी येथे बोलावून अन्य २ साथीदारांच्या मदतीने जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच, जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात मंगळवार दिनांक २२सप्टेंबर रोजी रात्री उशिरा अनुसूचित जातीजमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला.
गुन्हा दाखल होताच, चारही आरोपी फरार झाले. मात्र, पोलिसांनी तत्काळ तपासाची सूत्रे हलून या गुन्ह्यातील मुख्य आरोपी वाळू माफिया पप्पू उर्फ महेश कोथिंबीरे याला दौंड येथील पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले.तर, उर्वरित ३ जणांना पेडगाव येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे कि, श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव वापरीसातील भीमा नदी पात्रातून अनधिकृत व बेसुमार, बेकायदेशीर वाळू उपसा व वाहतूक सुरु असून, या वाळू वाहतुकीने पेडगाव परीसरातील रस्ते खराब झाले असल्याने, पेडगावचे ग्रा.पं.सदस्य इरफान काझी, नितीन सकट, पिनु कापसे व इतर काही लोकांनी वाळू माफिया पप्पू उर्फ महेश कोथिंबीरे आणि मुख्तार काझी यांना मंगळवार दि.२२ रोजी आमच्या गावातील रस्ते वाळू वाहतुकीने खराब होत असून, तुम्ही येथून तुमच्या वाळूच्या ट्रक नेऊ नका असे सांगितले होते.
त्याचा राग आल्याने रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पप्पू उर्फ महेश कोथिंबीरे याने फोन करून नितीन सकट या तरुणाला श्रीगोंदा शहरातील हॉटेल सृष्टी येथे बोलावून घेतले. त्याठिकाणी नितीन सकट गेला असता तेथे वाळू माफिया पप्पू उर्फ महेश कोथिंबीरे रा.श्रीगोंदा, मुख्तार काझी, आसीफ तांडेल रा.पेडगाव, जालिंदर घोडके रा.बेलवंडी कोठार, यांनी तू आमच्या वाळूच्या गाड्या का अडवितो रस्ता तुझ्या बापाचा आहे का? असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ करून तुझी विकेटच पडतो असे बोलून जीवे मारण्याची धमकी देऊन, बेदम मारहाण केली. यावेळी सृष्टी हॉटेलचे मालक व सोबत असलेल्या मित्राने त्याची सोडवणूक करत घरच्यांना झालेला प्रकार सांगितला.
या झालेल्या घटनेवरून श्रीगोंदा पोलिसांनी नितीन सकट या तरुणाच्या फिर्यादीवरून महेश कोथिंबीरे, मुख्तार काझी, आसीफ तांडेल, जालिंदर घोडके यां चौघांच्याविरोधात अनुसूचित जातीजमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच चारही आरोपी फरार झाले होते. मात्र, पोलिसांनी तत्काळ तपासाची सूत्रे हलून गुन्ह्यातील मुख्य आरोपी महेश कोथिंबीरे याला दौंड येथील पोलिसांच्या ताब्यातून घेतले.तर, उर्वरित ३ जणांना पेडगाव येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
यातील मुख्य आरोपी पप्पू उर्फ महेश कोथिंबीरे हा फरार होऊन दौंड येथे गेला असता त्याला दौंड येथे एका ट्रक चालकाला विनाकारण बेदम मारहाण केल्या प्रकरणी दौंड पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली होती. त्याच्यावर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल असल्याचे समजताच, त्यांनी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्याशी संपर्क साधत त्याला श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात दिले. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव हे करत आहेत.
स्रोत:(पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा)
