उपरा,लक्ष्मण माने.(भाग ६).

उपरा,लक्ष्मण माने..

देव गप घुमत होता . ओरडत होता . किंचाळत होता . मला मुतायला आलं होतं . आईच्या मागं तिला घट्ट धरून बसलो होतो .

देव म्हणाला ,

‘ हितनं खाली , चार मैलांवर मी वाट बघतुया , इसारलास ? ‘

जयसिंग्याला काही आठवलं . त्याचा चेहरा खुलला . तो म्हणाला ,

‘ गावा पुसी पुनव वांदीर नांग निवद नारु काय शैय्यीरक वाराकिरू ‘ ( देवा , पुसी पुनवंला आम्ही निवद नारळ करू . आम्ही इसरणार न्हाय .)

देवानं नाचायला सुरुवात केली .

सारा गाव झोपला होता . अंधार सारीकडं दाटला होता . मधेच कुत्री केकाटत होती . आमच्या बिराडात हागनदरीत देव आला होता . त्यानं अंगारा दिला . जयसिंग्यानं अंगारा घेतला , समीच्या कपाळाला लावला . साऱ्यान्ला लावला आन् बानं धापकन् अंग जमिनीला टाकलं , ते फोकाचं वझं टाकावं , तसं . मी मनात म्हणत होतो , आता ह्याला आणखीन काय तरी झालं वाटतं . जयसिंग्यानं त्याला उठवला . पाणी दिलं . अंगारा लावला . बानं डोळं उघडलं . अंगाला आळुकेपिळुके दिले . आन् काहीच झालं नसल्यागत पोरीजवळ येऊन बसला . आईनं देव काय काय म्हणाला , ते सांगितलं .

समीनं डोळं उघडलं होतं . पण डोळ्यांवर झांझ २२ होती . तिनं पाणी मागितलं . मी पाणी नेऊन दिलं . आता तिला जरा बरं वाटत होतं . बाच्या अंगात सात आसरांचा खंडुबा , हिरुबा यायचे . लमाण घुमायचा .२३ समीला आता काही होणार नव्हतं . ती बरी होणार . देवानंच तिला धरली होती .

बा दिवरूसपण करायचा . भूतखेत काढायचा . ‘ सालीव सुतांचं येटान तुटल , पर कैकाड्याचं भूत सुटायचं न्हाय ‘ असं त्यो सारखं म्हणायचा . गावातले लोक त्याच्या देवाला , भुतांना भ्यायचे . आम्ही कायम हागनदारीत , मसणवट्यात राह्यचो . आमचा बा आन् त्याचं देव असल्यावर भुताचं भ्या वाटायचं न्हाई . कैकाड्याचे देव आन् त्यांची भुतं लई वाईट असत्यात , घराला बोराटीचा चेपच लावत्यात , म्हणायचा . गावातील माणसं टरकून असायची .

समीला बरं वाटू लागलं . आमचं डोळं केव्हा झाकलं , ते समजलंच न्हाई .

सकाळी बा दिसला न्हाई . आईपण नव्हती . पारी तेवढी बिराडात होती . बाकी सारी आमी पोरं . चा नव्हता . पानी नव्हतं … भाकरी नव्हती . तुकडा नव्हता … सारी बिराडाची राखन करीत बसलो होतो . दिस वर आला . पारीनं गाढवं सोडून दिली . बिराडावर नजर ठेवीत गाढवं राखत होतो.

पालवणाचा डोंगर उतरलो . गायदऱ्यातनं खाली मलवडीला उतरायचं . डोंगर उतरताना गाढवांचे लई हाल झाले . बानं पुन्हा गावाला , गावपांढरीला नमस्कार केला . येणं – देणे अंगावर घेऊन मलवडीला बि – हाडं हालली .

गायदऱ्याचा बराच अवघड घाट उतरून गाढवं मलवडीच्या वढ्याला पाणी प्याली . आम्हाला गाढवावरनं खाली उतरवलं . वढ्याच्या वाळवंटात , झाडाच्या सावलीत बिहाडं थाटली . बा , आई , पारी , जयसिंग्या , सारी मोठी माणसं वढ्याच्या पाण्यात आंघुळ करायला लागली . रामा – रामाऽ ऽ करत बानं हातानंच अंगावर पाणी घ्यायला सुरुवात केली . चिमणीनं अंगावर पाणी घ्यावं , तसं . मी नागवा झालो आणि बेंबीभर पाण्यात पवायला लागलो . इंद्या , खग्या , म्हाद्या , सारीजणं पाण्यात उड्या मारायला लागलो होतो . पाणी पार ढवाळलं होतं . आई – पारी रागावत होत्या आणि आम्ही पाण्यातनं बाहेर येत नव्हतो .

बानं धोतर बदललं . आई दंडाचं नेसू नेसली . मागून आणलेली चोळी घातली. समीला पाटलिनीनं दिलेलं पोलकं घातलं. बिहाडाजवळ खग्याला बसवला आन् सारीजनं गावात निघालो.

मलवडी बऱ्यापैकी खेडं . पुसात मोठी जत्रा भरते . खंडुबाची माणसं लई जमलेली. प्रत्येकाचं आंग भंडाऱ्यानं माकलेलं. माझा हात बाच्या हातात आन् गर्दीतनं वाट काढत काढत आम्ही देवळाजवळ पोचलो. देवळात मोठमोठं आरसं लावलेलं. मंडप मोठाच मोठा . आत गर्दी झालेली . गुदमरायला लागलेलं. घामानं निथळलो होतो . आणि पायावर पाय पडल्यावर इवळत होतो . एकदाच मंडपाजवळ गेलो . बानं खोबरं , भांडारा एका मानसाच्या हातात दिला . त्यातलाच भांडारा त्यानं बाला माघारी दिला . बानं त्यो कपाळाला लावला आन् मागं सरला . ‘ येळकोट येळकोट , जय मल्हार ‘ खंडुबाचा येळकोट चालला होता . भगत हात जोडून पालथं पडून लंगराला बा तसा चांगला माणूस … त्योबी मला सोडून लंगराला झोंबत होता . माणसांच्या रेटारेटीत माझा जीव जायला झालेला . आई , पारी , जयसिंग्या कुठंच दिसत नव्हते .

आम्ही दर्शनास्नं परत आलो . अंगावर भांडाराच भांडारा झाला होता . गावाबाहेर वड्याच्या वाळूत बिहाडं होती . तिथं आलो . वढ्याला जळाण येचायला जायचा बानं हुकूम सोडला . दमलो होतो .

पण गेलोच . हाताला लागलं ते काटूक इचून आनत झटत होते . होतो . आई , पारी , जयसिंग्या – सारी मानसं , काम नव्हतंच … वाळूत बिराडाजवळ बसली होती . चूल पेटवायला जळणं आली आणि आई , पारी उठल्या . चुली पेटवल्या . तीन दगडांच्या . वाऱ्यानं वैर मांडलं होतं . जाळ फाकत होता . तवा तापत नव्हता .आई वैतागली होती . धुरानं डोळं गळत होतं . हातानं नाक पुसत होती आन् कनकीला तिंबत होती . कनीक बराबर झाली . तसी चपात्या हातावर करायला लागली . कनकीचा गोळा हातावर गोल करायचा . पातळ – पातळ – पातळ करायचा . आन् तव्यावर टाकायचा … एक चपाती एका अंगानं भाजली , की दुसरी तिच्यावरच टाकायची . नुसती बाजू बदलायची . तव्यावरच चवड साठवायची . तिच्या मनात आलं , की टोपल्यात टाकायची . आम्हाला भूक लागली होती . तोंडाला पाणी सुटलेलं . मी हळूच आईचा डोळा चुकवून चपातीचा तुकडा घेतला आन् तोंडात घातला . आईनं बघितलं आन् सनसनीत मुस्काटात बसली .

” पेनसुन्या , देवरा भिंगाकास हां ? आजून निवद दाकविकराद किर . याल याल इगुन . ‘ ( मुडद्या ! आजून देवाला निवद दाखवायचाय , आन् उस्टावलंस व्हय ?)

अशाच शिव्या ती मला देऊ लागली . आन् मी मनातनं देवाला !

तवर बा , जयसिंग्या तीन पानांचे पत्ये खेळण्यात गुंगले होते . आईनं मला पिटाळलं . मी गेलो , तर बा , जयसिंग्या एका माणसासंगं हमरातुमरीवर आले होते . मी बाला सांगत होतो , आईनं पावशेर तांदूळ आनायला सांगितल्याती . आन बा त्या तीन पानांच्या रगड्यात अडकला व्हता . मी सांगून सांगून वैतागलो . तरी बा आईकंना . त्याला पैसं येत होतं आन् माझी चिमट तांदूळ आनायला … तशी फाडकन बसली .

“ गप्प खानसी नाई ” ( गप्प बस , कुत्र्या !)

मी गप झालो . बाला बरेच पैसे आले होते .

बानं तांदूळ घेतले , धोतराच्या सोग्यात आन् ‘ झाला महार पंढरीनाथ ‘ करीत बिहाडावर आला . आईनं गुमान तांदूळ चुलीवर घातले . दिवस मावळतीला गेला होता . समीनं राकेल आनलं . बिड्या आन् काड्याची पेटी , मीठ , मिरच्या . बानं रुपाया दिला होता .

बा पाण्यात उतरला . हातपाय धुतले . निवदाची ताटली घेतली , तांब्यात पाणी घेतलं . उदबत्त्या , भंडारा , नारळ , खडीसाखर , पान , आख्खी सुपारी , एक मोठा पैसा निवदावर ठेवला आन् धोतराचा सोगा त्याच्यावर झाकून – लगालगा देवळाकडं गेला . मी रडत मागं लागलो होतो .

“ निन गामक खेद्या ह्याच्या ! ” ( तुझ्या आईला गाढव लावला !)

म्हणत त्यानं धोंडा उचलला , तसा माझा आवाज नरड्यातच अडकला . मी गप बिराडावर आलो .

बानं येताना मोकळी थाटली आन् कोंबडा आनला होता . कोंबडा पख फडफडीत होता . त्याचं पाय बानं एका हातात घट्ट धरले होते . तोंडानं धोतराचा सोगा आन्चिरगुटं दुसऱ्या हातानं भरलेला तांब्या अशा अवतारात आला . कोंबड्याच्या पायाला बांधली . आईनं निवद भरला .

कडूसं पडलं होतं . बानं देवाच्या टोपल्या उघडल्या . टोपल्याम्होरं पाणी शिपाडलं . निवद थाटलीत फुडं ठेवला . उदबत्त्या लावल्या . गुलाल लावला . तोंडानं काही बडबडत बडबडत कोंबड्याचं दोन पाय एका पायाखाली धरलं . एका हातात त्याचं मुंडकं धरलं . आन् फोका कापायच्या कोयत्यानं कोंबड्याला सोडवलं . कोंबडं फडफडायला लागलं . दोन्ही पाय धरून भिरकावलं . तसं कोंबडं लागलं उड्या मारायला . मी मागं पळत होतो . त्याचा जीव जात नव्हता . मी धरायचो आन् ते उड्या मारायचं . अखेर त्याची धडपड थांबली .

बानं खोचं खवलं , कोंबड्याला चुलीवर ठेवलं तसं कोंबड्याची पखं जळून जायला लागली . सगळीकडं कोंबड्याच्या पखांचा वास घुमत होता . कोंबडंखालीवर करत खरपूस भाजलं . चुलीवरनं खाली घेतलं . आन सोलायला सुरुवात केली . तवर आईनं हाळद , मीठ , वल्या नारळाचं खोबरं , खलात चेचलं होतं . मिरच्या चेचून झाल्या . सारं मटणाला लावलं अन् चुलीवर घातलं . बा चुलीजवळनं हालत नव्हता .

रात बरीच झाली . कोंबडं शिजलं . निवद दावल्याशिवाय काय खायाचं नाही ! डोळ्यांवर झोप होती . लाली , पुष्पी , किसन्या झोपायला लागले होते . बा खेकसत होता . आईनं निवद भरला . त्यात मांस घातलं . बानं निवद देवाच्या टोपल्याम्होरं ठेवला . तांब्यातलं पाणी वाटीत घातलं . कसानुसा वास नाकात जाऊ लागला . तंबाकूसारखी पुडी देवाफुडं ठेवली . दोन अंडी बाजूला काडून मांडली होती . लिंबं फोडली आन् बाच्या अंगात घुमू लागलं . वारं लई उशीर खेळलं . शांत झालं . बाची पूजा झाली होती . सारी पोरं वळीत बसली . खग्या , इंद्या , म्हाद्या , मी , आई , पारी , कुणी परसाद चुकवायचा नाही . नारळाचा तुकडा आन् घोट घोट ‘ काळ्ळ – घोट घोट दारू प्रत्येकानं घेतलीच पाहिजे . नाही म्हणायचं नसतं . साऱ्यानला दिली . मी वाटी तोंडाला लावली , तसं नरडंभाजत , जळतजळत पाणी खाली गेलं . मी वाटी खाली ठेवली . मला प्यावत नव्हतं . मी ते पाणी प्यायला नगं म्हणू लागलो . तसा साऱ्यांनी एकच गिल्ला केला .

‘ नगं म्हणायचं नसतं . डोळं झाक आन् एका घोटात सारं पी . काय होत नाही .

‘ मी कसनुसं तोंड करीत वाटीभर ‘ काळ्ळ ‘ प्यालो . नरडं भाजत , घसा भाजत एकदाचं वाटीतलं पाणी संपलं . बानं फुटानं खायला दिलं . फुटानं खायला लागलो . तसं बरं वाटायला लागलं . आईनं साऱ्यांन्ला वाढलं . माझ्या वाटग्यात मटान होतं , येवढंच आठवतं . पण हात ताटात , तोंडात जातच नव्हता . सारं गरगरत होतं . तोंडाला पाणी सुटत होतं . कसंबसं खाल्लं आन् आडवा आलो . रातची जाग आली , तर आई बा तेच पाणी पीत होते . बा आईच्या अंगाला झोंबत व्हता . मी डोळे झाकत होतो , उघडत होतो . वाळू गार लागत होती . आन् मी निम्मा झोपंत – निम्मा जागा अशा अवस्थेत झोपलो होतो .

क्रमशः
स्रोत:(पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या उपरा पुस्तकातुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading