दिनांक २ सप्टेंबर २०२५ श्रीगोंदा:
पायी दिंडी वारीसाठी शासनाकडून पंचायत समितीमार्फत ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या लाखो रुपयांच्या निधीत मोठ्या प्रमाणात अफरातफर झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. सदर खर्चाचा हिशोब सादर करण्यासाठी मागणी करत संभाजी ब्रिगेड पक्षाचे तालुकाध्यक्ष इंजि. शामभाऊ जरे यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण आंदोलन सुरू केले.

आंदोलनाची पार्श्वभूमी
दोन महिन्यांपूर्वी पंढरपूर पायी दिंडी वारीसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने निधी दिला होता. वारीनंतर १५ ते २० दिवसांच्या आत ग्रामपंचायतींनी खर्चाचा हिशोब पंचायत समितीकडे सादर करणे बंधनकारक होते. मात्र एकाही ग्रामपंचायतीने तो हिशोब सादर न केल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत ३ ऑगस्ट २०२५ रोजी संभाजी ब्रिगेडने पंचायत समितीकडे निवेदन दिले होते. तसेच ११ ऑगस्ट रोजी गजर आंदोलनही झाले होते. तरीसुद्धा खर्चाचा तपशील उपलब्ध न झाल्याने अखेर तालुकाध्यक्ष शामभाऊ जरे यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला.

आंदोलनास उपस्थिती
या उपोषण आंदोलनाला संत नामदेव तुकाराम वारकरी आघाडी जिल्हाध्यक्ष माऊली होरे, शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष दिलीप आबा वाळुंज, उपाध्यक्ष दिलीप लबडे, प्रफुल्ल उर्फ बापु जगताप, संदिप जगताप, मुख्यसचिव सुयोग धस, अल्पसंख्याक आघाडी तालुकाध्यक्ष सद्दाम शेख, शेतकरी आघाडी उपाध्यक्ष पांडुरंग खोरे, संघटक संतोष आरडे मेजर तसेच अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता.

प्रशासनाचे आश्वासन
या आंदोलनावेळी श्रीगोंदा पंचायत समिती प्रशासनातील थोरात साहेब, मुकुंद पाटील साहेब तसेच विस्तार अधिकारी यादव साहेब व हराळ मॅडम यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून खर्चाचा दोन ग्रामपंचायत चा काही हिशोब उपलब्ध करून दिला. तसेच, उर्वरित तपशील हिशोब लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचे लेखी आश्वासन दिले. यानंतर उपोषण आंदोलन तात्पुरते स्थगित करत असल्याचे शामभाऊ जरे यांच्याकडून सांगण्यात आले.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
