दिनांक २६ ऑक्टोबर २०२४ श्रीगोंदा:
तालुक्यातील आढळगाव येथील एका घरफोडी चोरीचा गुन्हा श्रीगोंदा पोलिसांनी केवळ १२ तासांच्या आत उघडकीस आणला. सदर प्रकरणातील मुख्य आरोपी महिलेला २४ तासांच्या आत अटक करण्यात आली असून चोरी गेलेले सोन्याचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. श्रीगोंदा पोलिसांच्या या जलद कारवाईमुळे परिसरातील नागरिकांत पोलीस दलाबद्दल विश्वास व कौतुकाची भावना निर्माण झाली आहे.
दिनांक २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.५७ वा. सुभद्रा बापुराव शिंदे (वय ६५ वर्षे, व्यवसाय – घरकाम) यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. त्यांनी सांगितले की, दि. १४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६:०० वा ते २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११:३० वा. या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने चोरी केले. चोरट्याने किचनच्या बंद दरवाज्यातून घरात प्रवेश केला आणि बेसिनखालील फर्शीत ठेवलेले ४,८९,८३३/- रुपये किंमतीचे दागिने लबाडीच्या इराद्याने चोरले.
नमुद तक्रार दाखल होताच, श्रीगोंदा पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलिस अधीक्षक श्री. राकेश ओला साहेब, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे साहेब, आणि पोलीस निरीक्षक किरण शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे यांनी तपासाची धुरा सांभाळली.
गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, चोरीचा गुन्हा रा. काळेवस्ती, आढळगाव येथील एका महिलेने केला आहे. या माहितीच्या आधारे गणेश अहिरे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथक (पो.हे.काँ. आप्पासाहेब तरटे, पो.ना. गोकुळ इंगवले, पो.कॉ संदिप राऊत, पो.काँ. सचिन वारे, पो.काँ. संदिप आजबे, पो.काँ. संदिप शिरसाठ, पो.काँ. आनंद मैड, म. पो. काँ आस्मिता शेळके इत्यादीनीं) सदर महिलेला ताब्यात घेतले आणि चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली.
महिलेकडून चोरी गेलेले सर्व ४,८९,८३३/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. तिची रवानगी प्रथमवर्ग न्यायालयात करण्यात आली, जिथे न्यायालयाने तिला दि. २८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्याचा आदेश दिला. सदर प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे आणि पोलीस कर्मचारी सचिन वारे करीत आहेत.
स्रोत:(प्रसिध्दी पत्र)





