जयश्रीताई थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान; पुढील सभांना बंदीची मागणी..
दिनांक २५ ऑक्टोबर २०२४,श्रीगोंदा/संगमनेर:
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या सभेत वसंत देशमुख यांनी काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई थोरात यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधान केले. या वक्तव्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आणि महिला वर्गामध्ये तीव्र अस्वस्थता पसरली आहे. देशमुख यांच्या विधानाने समाजातील महिलांचा अपमान झाला असल्याने, संतप्त कार्यकर्त्यांनी श्रीगोंदा पोलिस निरीक्षकांकडे तक्रार सादर केली आहे.
कार्यकर्त्यांनी वसंत देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करून, भविष्यात त्यांची कोणतीही सभा आयोजित होण्यास बंदी घालण्याची मागणी केली आहे. वसंत देशमुख यांच्या विधानाची क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून, यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपल्या तक्रारीत वसंत देशमुख यांच्या वक्तव्याने महिलांचे मानसिक खच्चीकरण केल्याचा आरोप केला आहे. तसेच, धांदरफळ येथील सभेत वसंत देशमुख यांच्याबरोबर स्टेजवर असलेल्या टाळ्या वाजवणाऱ्या आणि हसणाऱ्या मान्यवरांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, जयश्रीताई थोरात यांनी आयोजित केलेल्या ‘युवा संवाद यात्रा’मध्ये युवकांनी ‘आम्हाला पंजाच हवा’ अशी घोषणा केली होती. त्यावर वसंत देशमुख यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा विरोध करण्यात आला असून, कार्यकर्त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर विश्वास असल्याचे सांगितले आहे.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिसांना या संतप्त भावना लक्षात घेण्याचे आवाहन करत, वसंत देशमुख यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
स्रोत:(निशांत लोखंडे)





